उद्धव-आदित्य ठाकरे प्रचारासाठी बिहारमध्ये जाणार नाहीत? - Uddhav Thackeray and Aditya Thackeray to Campaign Bihar Elections through Virtual Rallies | Politics Marathi News - Sarkarnama

उद्धव-आदित्य ठाकरे प्रचारासाठी बिहारमध्ये जाणार नाहीत?

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2020

बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेना ५० उमेदवार देणार आहे. या उमेदवारांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यासह २० नेत्यांची यादी शिवसेनेने निवडणूक आयोगाला सादर केली आहे. मात्र, उद्धव व आदित्य ठाकरे प्रत्यक्ष प्रचाराला जाणार नसल्याचे राऊत यांच्या माहितीवरुन स्पष्ट होत आहे

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रत्यक्ष जाणार नसून ते आभासी सभांतून (Virtual Rally) प्रचार करणार असल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.

बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेना ५० उमेदवार देणार आहे. या उमेदवारांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यासह २० नेत्यांची यादी शिवसेनेने निवडणूक आयोगाला सादर केली आहे. मात्र, उद्धव व आदित्य ठाकरे प्रत्यक्ष प्रचाराला जाणार नसल्याचे राऊत यांच्या माहितीवरुन स्पष्ट होत आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, संजय राऊत, चंद्रकांत खैरे, अनिल देसाई, विनायक राऊत, अरविंद सावंत, गुलाबराव पाटील, राजकुमार बाफना, प्रियंका चतुर्वेदी, राहुल शेवाळे, कृपाल तुमाने, सुनिल चिटणीस, योगराज शर्मा, कुशलेंद्र शर्मा, विनय शुक्ला, गुलाबचंद दुबे, अखिलेश तिवारी, अशोक तिवारी, हे या निवडणुकीत शिवसेनेचा प्रचार करणार आहेत.

शिवसेनेने यापूर्वी २०१५ मध्ये बिहारला ८० विधानसभा मतदारसंघ लढवले आहेत. त्यात ३५ मतदारसंघांत शिवसेनेला भाजपपेक्षा जास्त मते होती; तर ८ मतदारसंघांत तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना ही निवडणूक लढणार असल्याचे देसाई यांनी सांगितले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे बिहारमध्ये यापूर्वीही शिवसेनेला चांगली मते मिळाली आहेत.

बिहार विधानसभेची मुदत २९ नोव्हेंबरला संपत आहे. एकूण तीन टप्प्यांत ही निवडणूक होत आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला होणार असून, यात ७१ मतदारसंघ आहेत. दुसरा टप्पा  ३ नोव्हेंबरला असून, यात ९४ मतदारसंघ आहेत. तिसरा टप्पा ७ नोव्हेंबर असून, यात ७८ मतदारसंघ आहेत. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत. सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू), भाजप आणि लोक जनशक्ती पक्षाच्या आघाडीविरोधात राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस यांची आघाडी असे चित्र दिसत आहे.  
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख