ठाकरेंची बोलाची कढी बोलाचा भात : मनसेचा टोला - Thackeray Bola Curry Bola Rice, criticizes MNS | Politics Marathi News - Sarkarnama

ठाकरेंची बोलाची कढी बोलाचा भात : मनसेचा टोला

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 13 जानेवारी 2021

आदित्य ठाकरे यांनी टेस्ला कंपनीला महाराष्ट्रात येण्याचं निमंत्रण दिलं होतं. यासंदर्भात आदित्य ठाकरे आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी टेस्लाच्या टीमसोबत 22 ऑक्टोबर 2020 रोजी प्राथमिक चर्चाही केली होती.

मुंबई :  इलॉन मस्क यांची इलेक्ट्रिक कार बनवणारी कंपनी 'टेस्ला'ची भारतात एन्ट्री झाली आहे. कंपनीने कर्नाटकातील बंगळुरुमध्ये टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या नावाने नोंदणी केली आहे.

टेस्ला कंपनी महाराष्ट्रात येण्यासाठी पर्यावर्ण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रयत्न केले होते. त्यावरुन मनसेने ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. टेस्ला कंपनी  भारतात लक्झरी इलेक्ट्रिक कारची निर्मिती आणि व्यवसाय करणार आहे. बंगळुरुतील एका रिसर्च अँड डेव्हलपमेंट युनिटसह कंपनी आपल्या कामाला सुरुवात करणार आहे.

आदित्य ठाकरे यांनी टेस्ला कंपनीला महाराष्ट्रात येण्याचं निमंत्रण दिलं होतं. यासंदर्भात आदित्य ठाकरे आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी टेस्लाच्या टीमसोबत 22 ऑक्टोबर 2020 रोजी प्राथमिक चर्चाही केली होती. यानंतर आदित्य ठाकरेंनी ट्वीटद्वारे याची माहिती दिली होती.

परंतु टेस्लाने महाराष्ट्रऐवजी कर्नाटकला पसंती देत बंगळुरुमध्ये नोंदणी केली. त्यानंतर आता मनसेने आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. "टेस्ला कंपनी पळाली कर्नाटकला, पेज 3 मंत्र्यांना झटका. बोलाची कढी बोलाचा भात," अशा शब्दात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरेंवर टीका केली.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी टेस्लाचं स्वागत केलं आहे. टेस्लाची 8 जानेवारी 2021 रोजी बंगळुरुमध्ये नोंदणी झाली आहे. याचा नोंदणी क्रमांक 142975 आहे. वैभव तनेजा, वेंकटरंगम श्रीराम आणि डेविड जॉन फेन्स्टीन कंपनीचे संचालक आहेत. वैभव तनेजा टेस्लामध्ये CFO आहेत, तर फेन्स्टीन टेस्लामध्ये ग्लोबल सीनियर डायरेक्टर, ट्रेड मार्केट अॅक्सेस आहेत. वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या अखेरीस डिलिव्हरीला सुरुवात होऊ शकते

मस्क यांची ट्विटरवर घोषणा

टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यातील ट्वीटमध्य म्हटलं होतं की, कंपनी 2021 मध्ये भारतीय बाजारात प्रवेश करणार आहे. मस्क यांनी एका ट्वीटला दिलेल्या उत्तरात म्हटलं होतं की, निश्चितपणे आमची कंपनी पुढील वर्षात भारतात प्रवेश करेल.

नितीन गडकरी यांच्याकडूनही दुजोरा

केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी डिसेंबर 2020 मध्ये याला दुजोरा देताना म्हटलं होतं की, टेस्ला पुढील वर्षी भारतात आपला उद्योग सुरु करेल.

गडकरी म्हणाले होते की, "अमेरिकेतील ऑटो क्षेत्रातील मोठी कंपनी टेस्ला पुढील वर्षी भारतात आपल्या कारच्या वितरणासाठी केंद्र सुरु करणार आहे. मागणीच्या आधारावर कंपनी इथे वाहन निर्मितीचा कारखाना सुरु करण्याबाबत विचार करेल. पुढील पाच वर्षात जगातील सर्वात मोठा इलेक्ट्रिक वाहन उत्पादक बनण्याची क्षमता भारतात आहे. 

Edited By- Amol Jaybhaye

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख