धक्कादायक : कोरेगाव भीमा प्रकरणातील सामाजिक कार्यकर्त्यांची 'ती' पत्रे नव्हतीच! - Shocking: There were no 'she' letters from social workers in Koregaon Bhima case | Politics Marathi News - Sarkarnama

धक्कादायक : कोरेगाव भीमा प्रकरणातील सामाजिक कार्यकर्त्यांची 'ती' पत्रे नव्हतीच!

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 10 फेब्रुवारी 2021

पुण्यातील कोरेगाव-भीमा येथे दोन वर्षापुर्वी दंगल घडली होती. आता या प्रकरणाला धक्कादायक वळण लागले.

मुंबई : पुण्यातील कोरेगाव-भीमा येथे दोन वर्षापुर्वी दंगल घडली होती. आता या प्रकरणाला धक्कादायक वळण लागले. या दंगली संदर्भात अमेरिकेतील एका सायबर कंपनीने केलेल्या दाव्यानंतर केंद्र सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दंगली संदर्भात अमेरिकेतील वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राने धक्कादायक खुलासा केला आहे, त्यावरुन अटक करण्यात आलेल्या आंदोलकांना या प्रकरणात गोवण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. 

 काय घडल होत?

दोन वर्षांपूर्वी पुणे पोलिसांनी दिल्लीमध्ये रोना विल्सन या कार्यकर्त्याच्या घरी छापा टाकला होता. त्यावेळी विल्सनचा लॅपटॉप जप्त केला होता. पोलिसांना या कार्यकर्त्यांच्या लॅपटॉपमध्ये १० आक्षेपार्ह पत्रे मिळाली होती. या पत्रांमध्ये बंदी असलेल्या एका संघटनेसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचल्याचा दावा पोलिसांनी केला होता.

तसेच या पत्रांमध्ये नक्षलवादी संघटनेकडे बंदूका आणि दारूगोळ्याची मागणी करणारे पत्र होते, असंही पोलिसांनी सांगितले होते. विल्सन याच्या बरोबर २०१८ मध्ये झालेल्या एल्गार परिषदेतील १५ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा या प्रकरणाचा तापास करत आहे. 

अर्सेनल डिजिटलचा दावा काय?

अमेरिकेतील मॅसेच्युसेट्समधील अर्सेनल डिजिटल कन्सल्टिंग फर्मने विल्सन याच्या लॅपटॉपमधील त्या १० पत्रांविषयी शंका घेतली आहे. या कंपनीच्या म्हणण्यानुसार, विल्सनला अटक होण्यापूर्वी सायबर हॅकर्सीनी त्याच्या लॅपटॉपचा ताबा घेतला होता. एका सॉफ्टवेअरच्या मदतीने, १० पत्रे विल्सनच्या लॅपटॉपमध्ये 'प्लँट' करण्यात आली.

विल्सन यांच्या वकिलांच्या माध्यमातून अर्सेनल कंपनीला त्याचा लॅपटॉप मिळाला असल्याचे कंपनीचे प्रमुख मार्क स्पेंसर यांनी सांगितले. मागील वर्षी 31 जुलैला लॅपटॉपची माहिती मिळवण्यात आली. विल्सनच्या लॅपटॉपशी छेडछाड करण्यासाठी सायबर हल्लेखोरांकडे पुरेसा वेळ व हॅकिंगची साधने होती. हल्लेखोरांचा मूळ उद्देश विल्सनवर लक्ष ठेवणे आणि आक्षेपार्ह पत्रे प्लँट करण्याचाच होता, असे अर्सेनल कंपनीने म्हटले आहे. 

रोना विल्सनची न्यायालयात धाव 

कोरेगाव-भीमा दंगली प्रकरणी अटक करण्यात आलेल्या विल्सन याने याप्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. अर्सेनल डिजिटल कंपनीने केलेल्या  खुलाशानंतर विल्सन विरोधातील खटला रद्द करावा, अशी मागणी विल्सनच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयाकडे केली. हॅकरने विल्सनचा लॅपटॉपची छेडछाड करुन त्यात १० पत्रे 'प्लँट' केली होती, असे स्पष्ट झाल्यामुळे विल्सन यांनी न्यायालयात धाव घेतली.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख