गोवा : एखाद्या राजकीय पक्षाला स्वबळावर लढविण्याची भूमिका घेण्याचा अधिकार आहे. अनेक ठिकाणी ते (कॉंग्रेस) असा निर्णय घेऊ शकतात. उद्या महाराष्ट्रात ते स्वबळावर लढविण्याची भूमिका घेऊ शकतात, तो त्यांचा अधिकार आहे. पण, यात वास्तवता नाही. आम्हा सगळ्यांना आमची नक्की स्थिती काय आहे. आम्ही किती लोकांमध्ये आहोत. आम्हाला किती लोकांचा पाठिंबा आहे. याचे वास्तव चित्र नजरेसमोर ठेवले नाही, तर भाजपसारख्या पक्षाला आपल्याला आवर घालता येणार नाही,'' अशी भूमिका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडली.
गोवा विधानसभेची आगामी निवडणूक कॉंग्रेस पक्ष स्वबळावर लढविण्याची भाषा करत आहे, याबाबत विचारलेल्या प्रश्नावर पवार यांनी वरील उत्तर दिले. पवार आज (ता. 21 जानेवारी) गोव्याच्या दौऱ्यावर होते, त्या वेळी ते बोलत होते.
ते म्हणाले की, "राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या गोव्यातील प्रमुख नेत्यांशी आज मी चर्चा केली. येत्या वर्षभरात गोवा विधानसभेची निवडणूक आहे. धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येऊन या ठिकाणी भाजपला पर्याय द्यावा. असे या सर्वांचे मत आहे. गोवा आणि गोमन्तक धर्मनिरपेक्ष तत्त्वावर विश्वास ठेवणारे घटक आहेत. या घटकांची अपेक्षा आहे की येथे सेक्यूलर पर्यायी व्यवस्था असायला पाहिजे. ती द्यायची असेल तर सेक्यूलर पक्षांशी बोलायला लागेल.''
"राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गोव्याचे प्रभारी खासदार प्रफुल्ल पटेल हे यासंदर्भात गोव्यातील लोकांशी बोलत आहेत. याबाबत लवकरात लवकर निर्णय व्हावा आणि एकत्रित कामाला सुरुवात करावी, अशी भावना येथील आमच्या स्थानिक नेत्यांची आहे. त्याबाबतचा पोषक निर्णय होण्याची काळजी आम्ही घेणार आहोत,'' असेही पवारांनी नमूद केले.
पवार यांनी सांगितले की, गोवा फॉरवर्ड, एमजीपी या पक्षाबरोबर चर्चा करण्याची आमच्या सहकाऱ्यांची भूमिका आहे, ती भूमिका आम्ही प्रफुल्ल पटेल यांच्या कानावर घालणार आहोत. ते यासाठी पुढाकार घेतील.
"मी गोव्याच्या राजकारणाच्या अभ्यासासाठी आलो नाही'
मी गोव्याच्या राजकारणाचा अभ्यास करण्यासाठी आलो नाही. या देशाच्या पार्लमेंटची सर्वपक्षीय सदस्यांची संरक्षण समिती आहे. या समितीला इंडियन नेव्ही व त्यासंबंधीच्या अन्य संघटना आहेत. त्यांच्या कामाच्या संबंधीचा आढावा घ्यावा आणि देशाचे आणि देशाच्या सीमेचे सागरी मार्गातून संरक्षण करण्यासाठी काय उपाययोजना केली जाते, याची माहिती घ्यावी, या हेतूने ही समिती आली आहे. या समितीचा सदस्य म्हणून मी येथे आलो आहे, असे त्यांनी नमूद केले.

