लशीच्या तुटवड्यावर अदर पूनावालांनी सोडले मौन...केला महत्वाचा खुलासा

सिरमने आतापर्यंत २० कोटींहून अधिक लशींच्या डोसचे वितरण केलं आहे.
Serum Institute CEO Adar Poonawala gives clarification on covid19 vaccine shortage
Serum Institute CEO Adar Poonawala gives clarification on covid19 vaccine shortage

पुणे : देशभरात लशींचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा (Vaccine Shortage) जाणवत आहे. लशींअभावी लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागत आहेत. अनेक राज्यांनी लस उपलब्ध नसल्याने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंद केले आहे. ४५ वर्षापुढील नागरिकांना दुसऱ्या डोससाठी प्राधान्य दिले जात आहे. देशात निर्माण झालेल्या लस टंचाईवर सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी पहिल्यांदाच मौन सोडले आहे. (Serum Institute CEO Adar Poonawala gives clarification on covid19 vaccine shortage)

अदर पूनावाला यांनी आज एक निवेदन प्रसिध्दीस दिले असून त्यामध्ये त्यांनी लस तुटवड्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. केंद्र सरकारने भारतातील लोकांना प्राधान्य न देता लस निर्यात केल्याने तुटवडा निर्माण झाल्याची टीका होत आहे. यावर पूनावाला म्हणाले, भारतातील नागरिकांना वेठीस धरून आम्ही कधीच लशींची निर्यात केली नाही. देशाच्या लसीकरण कार्यक्रमासाठी सर्वतोपरी मदत करण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत. आम्ही सरकारसोबत अथकपणे काम करत आहोत. ही वेळ सर्वांनी एकत्र येऊन कोरोना महामारीला हरवण्याची आहे. 

जानेवारी २०२१ मध्ये कंपनीकडे लशीचा मोठा साठा होता. देशातील लसीकरणाचा कार्यक्रमही यशस्वीपणे सुरू झाला. त्यावेळी कोरोना रुग्णांची संख्या आतापर्यंत सर्वात कमी होती. भारत महामारीची दिशा बदलत असल्याचा विश्वास अनेक तज्ज्ञांना होता. त्यावेळी जगातील काही देश महामारीचा सामना करत होते. त्या काळात आपल्या सरकारने मदतीचा हात पुढे केला. लशीची निर्यात आणि हायड्रॅाक्सीक्लोरोक्वीनची मदत भारताने केली. आता अन्य देश भारताला मदत करत आहेत, असे पूनावाला यांनी सांगितले.  

लसीकरणाला दोन ते तीन वर्ष लागतील

जगातील दोन सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांपैकी आपला देश एक आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येचे लसीकरण दोन ते तीन महिन्यात करणे शक्य. नाही. त्यामध्ये अनेक आव्हाने आहेत. जगातील प्रत्येकाचे पूर्ण लसीकरण करण्यासाठी दोन ते तीन वर्ष लागतील. ही महामारी कोणत्याही विशिष्ट भूभागापुरती किंवा राजकीय सीमांपुरती मर्यादीत नाही, हे समजून घ्यायला हवे. जागतिक पातळीवर प्रत्येक जण विषाणुला हरवेपर्यंत आपण सुरक्षित नाही. जागतिक पातळीवर आमची कोव्हॅक्सला सहकार्यासाठी कटिबध्दता आहे. जेणेकरून ते जगभरातील देशांना लशी वितरित करू शकतील, असेही पूनावाला म्हणाले. 

२० कोटी डोसचे वितरण

मेरिकेतील औषध कंपनीनंतर आपत्कालीन वापराची परवानगी मिळाली असली तरी सिरमने आतापर्यंत २० कोटींहून अधिक लशींच्या डोसचे वितरण केल्याची माहिती पूनावाला यांनी दिली आहे. लशींच्या एकूण डोसचे उत्पादन व वितरण पाहिले तर जगात सिरम पहिल्या तीन कंपन्यांमध्ये आहे. आम्ही उत्पादन क्षमता वाढविण्याचा प्रयत्न करत आहोत. तसेच भारताला प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाहीही पूनावाला यांनी दिली आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com