'सिरम'कडून महाराष्ट्राला झटका; लशींच्या पुरवठ्याबाबत दिलं स्पष्टीकरण... - Serum Institute can supply Covishield vaccine after May 20 | Politics Marathi News - Sarkarnama

'सिरम'कडून महाराष्ट्राला झटका; लशींच्या पुरवठ्याबाबत दिलं स्पष्टीकरण...

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 एप्रिल 2021

सध्या देशात महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लसीकरण झाले असून मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे.

मुंबई : केंद्र सरकारने राज्ये आणि खासगी रुग्णालयांना लस उत्पादकांकडून थेट कोरोना लस घेण्याची परवानगी दिली आहे. देशात सध्या सिरम इन्स्टिट्युट व भारत बायोटेक या दोन कंपन्यांकडूनही लशींचा पुरवठा होत आहे. त्यामुळे बहुतेक राज्यांकडून या कंपन्यांशी लशींच्या थेट खरेदीसाठी संपर्क साधला जात आहे. सध्या देशात महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लसीकरण झाले असून मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे.

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोव्हिशिल्ड ही लशीची किंमत जाहीर केली होती. या किंमतीवरुन अजूनही गदारोळ सुरू आहे. अनेक राज्यांनी मोफत लसीकरणाला मंजूरी दिली आहे. महाराष्ट्रात मात्र अजून तळ्यात-मळ्यात सुरू आहे. त्यातच सिरमने महाराष्ट्राला मोठा झटका दिला आहे. कोविशिल्ड लशीचा पुरवठा 20 मेनंतर करता येणार असल्याचे सिरमने महाराष्ट्र सरकारला कळविल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. 

'सिरम'च्या या भूमिकेमुळे महाराष्ट्राच्या लसीकरण मोहिमेला मोठा झटका बसला आहे. केंद सरकारकडून सध्या लशींचा पुरवठा केला जात आहे. आता राज्यांनाही थेट कंपन्यांकडून लस खरेदी करण्यासाठी परवानगी दिली आहे. तसेच केंद्राने 1 मे पासून देशात 18 वर्षांपुढील नागरिकांना लस घेण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणावर लस लागणार आहे. आताच लशींचा तुटवडा जाणवत असल्याने 1 मेपासून पुरवठा कसा होणार याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. त्यातच आता सिरमनेही हात आखडा घेतल्याने संकट उभे राहिले आहे. 

दरम्यान, महाराष्ट्रातील नागरिकांना मोफत लस दिली जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. त्यानंतर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनीही याबाबतचे ट्विट केले. पण ते काहीवेळाने डिलिट केले. त्यामुळे मोफत लसीकरणाबाबत संभ्रम वाढला. राज्य सरकारकडून अद्याप अधिकृतपणे कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे भाजपकडून या गोंधळावरून जोरदार टीका केली जात आहे.

मोफत लसीकरणाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही स्पष्ट सांगितलं नाही. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, मोफत लशीकरणाच्या प्रस्तावावर मी सही केली आहे. पण याचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील. उद्या कॅबिनेटच्या बैठकीत हा प्रस्ताव येणार आहे. यामध्ये त्यावर चर्चा होईल. मोफत लसीकरणावर थेट भाष्य करणार नाही. आर्थिक भाराचे निर्णय मुख्यंत्री घेतात. महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतला जाईल, असे सांगत पवार यांनी मोफत लसीकरणाबाबत संकेतही दिले. लसीबाबत ग्लोबल टेंडरवरही चर्चा केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

अशा आहे लशींच्या किंमती...

राज्य सरकारांना कोव्हॅक्सिन प्रतिडोस ६०० रुपयांना मिळेल. खासगी रुग्णालयांना ही लस १ हजार २०० रुपयांना मिळेल. इतर देशांसाठी या लशीचा दर १५ ते २० डॉलर असेल, अशी माहिती भारत बायोटेकने दिली आहे. सिरमने राज्य सरकारांना 400 रुपयांना तर खासगी रुग्णालयांना 600 रुपयांना देण्याचे जाहीर केले आहे. याचवेळी केंद्र सरकारला मात्र, ही लस 150 रुपयांतच ही लस मिळत आहे. केंद्राच्या दुप्पट किंमत राज्यांना का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख