मिठी नदीत दडलयं काय? NIA ची सचिन वाझेसोबत शोध मोहिम...लॅपटॉप, डीव्हीआर जप्त - Sachin Waze NIA recover important items from Mithi river | Politics Marathi News - Sarkarnama

मिठी नदीत दडलयं काय? NIA ची सचिन वाझेसोबत शोध मोहिम...लॅपटॉप, डीव्हीआर जप्त

वृत्तसंस्था
रविवार, 28 मार्च 2021

NIA च्या हाती अनेक महत्वाचे धागेदोरे लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर कारमध्ये सापडलेली स्फोटकं आणि मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या तपासासाठी आज राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) मिठी नदीत शोध मोहिम राबवली. निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझेला याठिकाणी आणण्यात आले होते. या सर्च अॉपरेशनमध्ये एक लॅपटॉप, (डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर्स) डीव्हीआर, सीपीयू वाहनांच्या दोन नंबर प्लेट यांसह आणखी काही वस्तु एनआयएच्या हाती लागल्या आहेत. त्यामुळे अनेक महत्वाचे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सचिन वाझे हा सध्या एनआयएच्या कोठडीत आहे. वाझेला मनसुख हिरेन हत्या प्रकरणातही नुकतेच एटीएसकडून एनआयएच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यामुळे हिरेन हत्येसह स्फोटक प्रकरणाचा तपास एनआयए करत आहे. या प्रकरणाचे धागेदोरे शोधण्यासाठी एनआयएचे अधिकारी वाझेला सोबत घेऊन ठिकठिकाणी जात आहे. नुकतेच हिरेन यांचा मृतदेह आढळून आला, त्याठिकाणी वाझेला नेण्यात आले होते.

या प्रकरणाच्या तपासादरम्यान धक्कादायक माहिती एनआयएला मिळाली आहे. वाझे राहत असलेल्या इमारतीच्या सीसीटीव्ही फुटेजचा डीव्हीआर वाझेनेच नष्ट केल्याचा संशय एनआयएला आहे. या तपासात वाझेने काही वस्तू नदी पात्रत टाकल्याची कबुली एनआयएलला दिली होती. त्यानुसार आज एनआयएने बीकेसी परिसरातील मिठी नदी पात्रात सर्च अॉपरेशन राबविले. यावेळी वाझेलाही याठिकाणी आणण्यात आले होते.

डायव्हर्सच्या मदतीने राबवलेल्या या शोध मोहिमेत एनआयएला लॅपटॉप, सीपीयू, डीव्हीआर, वाहनांच्या दोन नंबर प्लेट आणि इतर वस्तु मिळाल्या आहेत. मनसुख हिरेन हत्या प्रकरणाशी संबंधित पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने या वस्तू नदीपात्रात टाकल्याचा संशय एनआयएला आहे. त्यामुळे आज हाती लागलेल्या वस्तूंमधून अनेक महत्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे. 

डीव्हीआरमधून मिळणार महत्वाची माहिती

नदीपात्रात सापडलेल्या वस्तू मनसुखची हत्या होईपर्यंत वाझेच्याच ताब्यात असल्याचे एनआयएतील सुत्रांनी सांगितले. नदीपात्रात सापडलेले डीव्हीआर वाझे राहत असलेल्या सोसायटीतील आहे. याच इमारतीच्या आवारात 17 ते 24 फेब्रुवारीदरम्यान स्कॉर्पियो कार उभी करण्यात आली होती. तसेच ज्या ठिकाणी नंबर प्लेट बनविल्या आणि वाझेने ये-जा केलेल्या इतर ठिकाणचे व्हिडिओ असलेल्या डीव्हीआर असल्याची माहिती एनआयएच्या सुत्रांनी दिली. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख