Meteorological Department Extremely Severe Cyclonic Storm Tauktae
Meteorological Department Extremely Severe Cyclonic Storm Tauktae

तौते चक्रीवादळाचं रौद्र रुप; गुजरातमध्ये उडणार हाहाकार...कोकण, मुंबईलाही तडाखा

मागील दोन दिवसांत केरळ, कर्नाटक व गोव्याला वादळाने जोरदार तडाखा दिला आहे.

मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौते चक्रीवादळाने आता रौद्र रुप धारण केलं आहे. हे चक्रीवादळ पुढेल सरकत असतानाच अधिक तीव्र होत असल्याने गुजरातचा धोका वाढत चालला आहे. आज रात्री हे वादळ गुजरात किनापट्टीवर धडकण्याची शक्यता असून अनेक जिल्ह्यांना त्याचा तडाखा बसण्याची भीती व्यक्त केली आहे. तर मुंबई व कोकणात काल रात्रीपासूनच जोरदार वारे वाहत असून अनेक भागात पाऊसही पडत आहे. तसेच काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. (Meteorological Department Extremely Severe Cyclonic Storm Tauktae)

मागील आठवड्यात अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. त्यानंतर त्याचे रुपांतर चक्रीवादळात झाले. सुरूवातीला या वादळाची तीव्रता कमी होती. पण पुढे सरकत असतानाच वादळाची तीव्रता वाढत चालली असून आता वादळाने रौद्र रुप धारण केले आहे. मागील दोन दिवसांत केरळ, कर्नाटक व गोव्याला वादळाने जोरदार तडाखा दिला आहे. हे वादळ आता महाराष्ट्राच्या किनारपट्टीजवळून जात आहे. मुंबईच्या अधिक जवळ येत असल्याचे हवामा विभागाकडून सांगितले जात आहे.

मुंबई, कोकण, ठाणे या भागांसह पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दोन दिवसांपासून जोराचे वारे वाहत होते. आज अनेक भागात जोरदार पाऊस झाला. कोकण व मुंबईला याचा जोरदार फटका बसला आहे. काही भागात अजूनही जोरदार वारे व पाऊस पडत आहे. त्यामुळे काही ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. विजेचे खांब पडले असल्याने काही भागातील वीजपुरवठा बंद झाला आहे. पावसाने सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साठले आहे. हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत असले तरी त्याचा फटका या भागालाही बसणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

विमानतळ, सी लिंक बंद

मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ दुपारी दोनवाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण वादळाची तीव्रता वाढू लागल्याने आता हे विमानतळ चार वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच सी लिंकही वादळाची तीव्रता कमी होईपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहील. दक्षता म्हणून महापालिकेने आज लसीकरण केंद्रही बंद ठेवली आहेत.

सर्वाधिक धोका गुजरातला

तौते चक्रीवादळ वेगाने गुजरातच्या दिशेने पुढे सरकत आहे. आज रात्री 8 ते 11 च्या दरम्यान हे वादळ गुजरात किनारपट्टीवरील पोरबंदर आणि महुवादरम्यान धडकण्याची शक्यता आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी 155 ते 165 किलोमीटर असण्याची शक्यता आहे. तसेच किनारपट्टीवर हा वेग ताशी 185 किलोमीटरपर्यंत वाढू शकतो, असा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. या कालावधीत उत्तर महाराष्ट्र व किनारपट्टीवरही वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com