BUDGET 2021 : निर्मला सीतारामण यांच्या बजेटचे शेअर बाजारात जंगी स्वागत - The market jumped 900 points after investors has strongly welcomed budget | Politics Marathi News - Sarkarnama

BUDGET 2021 : निर्मला सीतारामण यांच्या बजेटचे शेअर बाजारात जंगी स्वागत

वृत्तसंस्था
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर करण्यास सुरूवात केल्यानंतर शेअर बाजारात उत्साह दिसून येत आहे. अर्थमंत्र्यांचे भाषण सुरू असताना सेन्सेक्सने 900 अंकांनी उसळी घेतली.

मुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर करण्यास सुरूवात केल्यानंतर शेअर बाजारात उत्साह दिसून येत आहे. मागील वर्षी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शेअर बाजार घसरला होता. मात्र, यंदा अर्थमंत्र्यांचे भाषण सुरू असतानाच सेन्सेक्सने 900 अंकांनी उसळी घेतली. तर भाषण सुरू होण्यापूर्वीच सेन्सेक्सने 400 अंकांची सलामी दिली.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्सने 47 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. अर्थमंत्र्यांकडून विविध योजना, सवलतींच्या घोषणा होत असतानाही सेन्सेक्स वाढत असल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. त्यामुळे सेन्सेक्स 50 हजारांचा टप्पा ओलांडेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अलीकडील काळातच सेन्सेक्सने 50 हजारांचा टप्पा ओलांडला होता. तर निफ्टीनेही 14 हजार 700 पर्यंत उसळी घेतली होती. मागील काही महिन्यांपासून बाजारात तेजी असल्याने गुंतवणूकदारांनी बाजारात जोरदार खरेदी सुरू केल्याचे दिसते. 

दरम्यान, मागील आठवड्यात प्रचंड विक्री झाल्याने गुंतवणूकदारांचे चांगलेच नुकसान झाले होते. त्यामुळे अर्थसंकल्पावर बाजारातील सर्व घटकांचे लागले असून अर्थमंत्र्यांकडून त्यांना मोठी अपेक्षा आहे. 

नाशिक, नागपूर मेट्रोसाठी भरीव तरतूद

महाविकास आघाडीची सत्ता असलेल्या महाराष्ट्रातल्या दोन शहरांसाठी मोदी सरकारने २०२१ च्या अर्थसंकल्पात मोठी तरतूद केली आहे. नाशिक व नागपूर या दोन शहरांतल्या मेट्रोसाठी अनुक्रमे २ हजार ९२ व ५ हजार ९७६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही वेळापूर्वी संसदेत अर्थसंकल्पाच्या सादरीकरणाला सुरुवात केली.  कोरोनाच्या काळात होरपळलेल्या देशाला सावरण्याचे आव्हान सरकारपुढे आहे. शेती, उद्योग, बांधकाम अशा सगळ्याच क्षेत्राचे लक्ष्य अर्थसंकल्पावर आहे. दरम्यान कोविड लसीकरणासाठी ३५ हजार ४०० कोटींची तरतूद सरकारने अर्थसंकल्पात केली आहे. वाहतूक क्षेत्रासाठी या अर्थसंकल्पा मोठ्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक बस वाहतुकीसाठी १८ हजार कोटी रुपयांची तरतूद आहे. तर ३२ विमानतळांवर अत्याधुनिक यंत्रणा बसविणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. 

अर्थसंकल्पातील काही ठळक तरतुदी

- मुंबई -कन्याकुमारी महामार्गासाठी ६४ हजार कोटींची तरतूद
- राष्ट्रीय रेल्वे योजना - २०३० ची अर्थमंत्र्यांकडून घोषणा
- एलआयसीचा आयपीओ येणार
- बँकांमधील लोकांचा पैसा सुरक्षित रहावा म्हणून तरतूद करणार
- सरकारी बँकांसाठई २० हजार कोटींची तरतूद
- विमा क्षेत्रातील परकीय गुंतवणुकीची मर्यादा वाढवली

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख