मोठी बातमी : ठाकरे सरकार नागरिकांना मोफत लस देणार

लशींच्या किंमतीवरुन गदारोळ सुरू असतानाच आता महाराष्ट्र सरकारने लसीकरणाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
Maharashtra Government to vaccinate all its citizens free of cost
Maharashtra Government to vaccinate all its citizens free of cost

मुंबई :  केंद्र सरकारने राज्ये आणि खासगी रुग्णालयांना लस उत्पादकांकडून थेट कोरोना लस घेण्याची परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोव्हिशिल्ड ही लशीची किंमत जाहीर केली होती. या किंमतीवरुन गदारोळ सुरू असतानाच आता महाराष्ट्र सरकारने लसीकरणाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रातील नागरिकांना मोफत लस दिली जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. भारत बायोटेकने कोव्हॅक्सिन लशीची किंमत जाहीर केली आहे. सिरमच्या लशीच्या तुलनेत ही किंमत राज्यांसाठी दीडपट आणि खासगी रुग्णालयांसाठी दुप्पट आहे. 

राज्य सरकारांना कोव्हॅक्सिन प्रतिडोस ६०० रुपयांना मिळेल. खासगी रुग्णालयांना ही लस १ हजार २०० रुपयांना मिळेल. इतर देशांसाठी या लशीचा दर १५ ते २० डॉलर असेल, अशी माहिती भारत बायोटेकने दिली आहे. सिरमने राज्य सरकारांना 400 रुपयांना तर खासगी रुग्णालयांना 600 रुपयांना देण्याचे जाहीर केले आहे. याचवेळी केंद्र सरकारला मात्र, ही लस 150 रुपयांतच ही लस मिळत आहे. केंद्राच्या दुप्पट किंमत राज्यांना का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. 

या प्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी ट्विटरवर प्रश्न उपस्थित केला होता. ते म्हणाले होते की, कोव्हिशिल्ड लशीची किंमत राज्यांसाठी 400 रुपये आहे. अमेरिका, ब्रिटन, युरोपीय समुदाय, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेला यापेक्षा कमी किमतीत लस दिली जात आहे. मग मेड इन इंडिया लस आणि भारतीयांनाच सर्वांत जास्त किंमत का? सिरमनेच म्हटले आहे की 150 रुपयांत लस विकूनही त्यांना नफा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी लशीची किंमत कमी करायला हवी. 

याला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ट्विटरवरच उत्तर दिले आहे. भारत सरकारचा दोन्ही लशींचा खरेदीदर 150 रुपयेच राहणार आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या लशी राज्यांना मोफतच देण्यात येईल, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. परंतु, राज्ये आणि खासगी रुग्णालयांसाठी लशीची किंमत कमी करण्याबाबत मंत्रालयाने काहीच उल्लेख केलेला नाही. त्यानंतर आज मलिक यांनी राज्य सरकारकडून नागरिकांना मोफत लस दिली जाणार असल्याचे वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले आहे. 

देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे. आता रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीच्या आपत्कालीन वापरासही केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com