आव्हाड म्हणतात...रिहानाच्या मधूर आवाजालाही धार आहे!

या नव्या जगात इंटरनेट बंद ठेवणं हा मुस्कटदाबीचाच एक अवतार आहे. दुर्दैवाने भारत आज यात जगात पहिल्या क्रमांकावर आहे.
Jitendra Awhad, Rihanna .jpg
Jitendra Awhad, Rihanna .jpg

मुंबई : दिल्लीत शेतकरी आंदोलनाला हाॅलिवूडची प्रसिद्ध गायिका रिहानाने पाठिंबा दिल्या पासून देशात राण उठले आहे. रिहानाच्या टि्विटवर देशातील अनेक दिग्जांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. विदेशींनी भारतात ढवळाढवळ करु नये, असा सल्ला रिहानाला दिला आहे.  त्यावर राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे गृहविकास मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी रिहाना विषयी एक पोस्ट लिहून चांगलाच समाचार घेतला आहे. 

जितेंद्र आव्हाड आपल्या पोस्टमध्ये म्हणातात... 'या नव्या जगात इंटरनेट बंद ठेवणं हा मुस्कटदाबीचाच एक अवतार आहे. दुर्दैवाने भारत आज यात जगात पहिल्या क्रमांकावर आहे. (आणि आपण 'डिजिटल इंडिया' करणार म्हणे), तुम्ही ही मुस्कटदाबी केलीत, तरी जगात कुठे ना कुठे तरी आवाज उठणार आणि तुमची नाचक्की होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आपला आवाज सुमधूर असला तरी त्याला धार सुद्धा आहे', हे रिहानाने दाखवून दिलं, असल्याचे आव्हाड म्हणाले. 

कोण आहे रियाना...

''रॉबिन रिहाना फेन्टो, तथा रिहाना, ही वेस्ट इंडिजच्या बार्बाडोस शहरात जन्मलेली एका फेरीवाल्याची मुलगी. लहानपणी ती आपल्या वडिलांसोबत रस्त्यावर कपडे विकायची. त्यात वडील मद्यपी. आई सोडून गेलेली. शिवाय रिहानाला डोकेदुखीचा प्रचंड त्रास होता आणि त्यावर सतत उपचार सुरू होते''.

''रिहानाला आवाजाची निसर्गदत्त देणगी होती. तिच्या शाळेत तिने गायलेलं गाणं एका अमेरिकन म्युझिक कंपनीच्या मालकाने ऐकून तिला तिथे बोलावली. "म्युझिक ऑफ द सन" हा तिचा पहिला अल्बम २००३ साली प्रसिद्ध झाला तेव्हा ती फक्त १५ वर्षांची होती. तो इतका गाजला आणि खपला की तिथून तिने मागे वळूनच पाहिलं नाही. आज वयाच्या ३२ व्या वर्षी ती अब्जोपती आहे. जगभरात तिचे कोट्यवधी चाहते'' असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. 

आपले जुने दिवस मात्र रिहाना विसरलेली नाही. गरीब मुलांना शिक्षण, एड्स आणि कर्करोगाचे रुग्ण यासाठी ती खूप दानधर्म करते. एकूणच दुबळ्या घटकांबद्दलची तिची आस्था, पैसा आणि प्रसिद्धीमुळे संपलेली नाही, असे आव्हाड म्हणाले आहेत. 

आपण यावर का बोलत नाही?

''दिल्ली, हरयाणा, उत्तर प्रदेश इथे शेतकरी आंदोलनाला चिरडण्यासाठी इंटरनेट बंद ठेवलं आहे. अमेरिकेच्या सीएनएन वृत्तसंस्थेने यावर एक सविस्तर बातमी दिली. तिचा दाखला देऊन, "आपण यावर का बोलत नाही?", असं ट्वीट तिने काल केलं आणि भारतातील सोशल मीडियावर रान उठवलं. दोन महिन्यांहून अधिक काळ सुरु असलेल्या या आंदोलनात, ज्यात सुमारे ६० शेतकरी अद्यापपर्यंत मरण पावले आहेत, त्यावर भारतातील तमाम सेलिब्रिटी तोंडात मिठाची गुळणी धरून बसले असताना, अमेरिकेतली एक प्रख्यात गायिका आवाज उठवते, हे विलक्षण आहे. नव्हे, कित्येकांच्या तोंडात मारणारं आहे''. 

भक्तांची गोची झाली..

''भक्तांची तर पार गोची झाली. तिला देशद्रोही म्हणता येत नाही की नक्षलवादी. पाकिस्तानात जा म्हणूनही सांगता येत नाही. "तू आमच्या अंतर्गत बाबीत कशाला ढवळाढवळ करतेस" असा दुबळा प्रतिकार काहींनी केला. त्यावर, "अबकी बार ट्रंम्प सरकार" बोंबलत आपले नेते तिथे कशासाठी गेले होते? ती अमेरिकेच्या अंतर्गत प्रश्नात ढवळाढवळ नव्हती का? अशा तीव्र प्रतिक्रिया स्वाभाविकपणे आल्या. असल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे''. 

''हा वैश्विकीकरणाचा जमाना आहे. मानवतेशी निगडीत घटनांचे पडसाद आता त्या देशापुरते मर्यादित रहात नाहीत. ते जगभर उमटतात. जॉर्ज फ्लॉईड या काळ्या माणसाची अमेरिकेत पोलिसाकडून हत्या झाल्यानंतर अख्ख्या जगाने गुडघा टेकवून त्याला श्रद्धांजली वाहिली होती. त्यात जो बायडन होते तसेच मैदानावरचे क्रिकेटपटू सुद्धा होते'', याची आठवण आव्हाड यांनी करुन दिली आहे. 

Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com