नवी दिल्ली : केंद्र सरकारने केलेल्या कायद्यानुसार प्रत्येक वाहनाचा विमा असणे बंधनकारक आहे. विमा असल्याशिवाय वाहनाशी संबंधित कोणतीही कामे परिवहन विभागाकडून केली जात नाहीत. त्यामुळे सध्या वाहनांचा विमा काढण्याचे प्रमाण वाढले आहे. याचाच गैरफायदा घेतला जात असल्याचे समोर आले आहे. बेंगलुरू येथील एक कंपनी मान्यता नसताना वाहन विमा ग्राहकांच्या माथी मारत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दि इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी अॉफ इंडिया (आयआरडीएआय) ने याबाबत सावधानतेचा इशारा दिला आहे. 'डिजिटल नॅशनल मोटर इन्शुरन्स' असे या बोगस कंपनीचे नाव आहे. या कंपनीने आतापर्यंत अनेक वाहनांचा विमा काढल्याचे समोर आले आहे. मात्र, या कंपनीला विम्याची विक्री करण्याची मान्यताच नसल्याचे 'आयआरडीएआय'ने स्पष्ट केले आहे.
'आयआरडीएआय'ने याबाबत निवेदन प्रसिध्द केले आहे. 'डिजिटल नॅशनल मोटर इन्शुरन्स' या संस्थेकडून बोगस विमान विक्री केली जात आहे. ही संस्था कृष्णा राजा पुरम, बेंगलुरू येथील आहे. कंपनीचे संकेतस्थळ व ई-मेलद्वारे विमा पॉलिसीची विक्री होत आहे. पण या कंपनीला कोणत्याही प्रकारचा विमा विक्री करण्याची मान्यता किंवा परवाना नाही. त्यामुळे या कंपनीकडून ग्राहकांनी त्यापासून सावध रहावे. या कंपनीशी कोणतेही व्यवहार करू नयेत, असे आवाहन 'आयआरडीएआय'ने केले आहे.
'आयआरडीएआय' ही नियामक संस्था आहे. विमा ग्राहकांची हित जपणे हे संस्थेचे काम आहे. पण 'आयआरडीएआय'कडून खाजगी कंपन्यांचेच हित साधले जात आहे, असा आरोप आम आदमी पार्टी ट्रान्सपोर्ट विंग महाराष्ट्रचे अध्यक्ष श्रीकांत आचार्य यांनी केला आहे. तसेच ग्राहकांना फसविणाऱ्यांना अटक करण्याची कायदेशीर अधिकारी 'आयआरडीएआय'ला नाही का? त्यांनी काढलेली जाहीर नोटीसमुळे धक्का बसला आहे, असेही आचार्य म्हणाले.
विमा घेण्याच्या प्रमाणात वाढ
भारतीय विमा प्राधिकरणाच्या अहवालानुसार, देशात मोटार वाहन व्यवसायामध्ये वेगाने वाढ होत चालली आहे. केंद्र सरकारकडून वाहनांना विमा बंधनकारक केला आहे. विमा असल्याशिवाय वाहनांची खरेदी-विक्री किंवा परिवहन विभागाशी संबंधित कोणतेीही कामे केली जात नाही. त्यामुळे वाहनचालकांकडून विमा काढण्याची मागणी वाढली आहे. त्यातही अनेकांचा अॉनलाईन विमा खरेदीकडे कल असल्याचे आढळून आले आहे.
Edited By Rajanand More

