गृहमंत्र्यांची शरद पवारांशी दीड तास चर्चा; बैठकीनंतर देशमुख म्हणाले... - Home Minister Anil deshmukh meets Sharad Pawar in delhi | Politics Marathi News - Sarkarnama

गृहमंत्र्यांची शरद पवारांशी दीड तास चर्चा; बैठकीनंतर देशमुख म्हणाले...

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 19 मार्च 2021

सुमारे दीड तास पवार व देशमुखांमध्ये चर्चा झाली. सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी गाजत असल्याने या भेटीला महत्व प्राप्त झाले होते.

नवी दिल्ली : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. सुमारे दीड तास पवार व देशमुखांमध्ये चर्चा झाली. सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या घडामोडी गाजत असल्याने या भेटीला महत्व प्राप्त झाले होते. बैठक संपल्यानंतर देशमुख यांनी चर्चेबाबत माहिती दिली.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर कारमध्ये सापडलेल्या जिलेटीनच्या कांड्या, मनसुख हिरेन यांचा मृत्यू तसेच सचिन वाझे प्रकरण राज्यात गाजत आहे. त्यावरून विरोधकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सरकारवर जोरदार टीका केली आहे. या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नाराज असल्याची चर्चाही आहे. त्यातच आज देशमुख दिल्लीत पवारांची भेट घेतली.

या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना देशमुख म्हणाले, मुंबईतील घडामोडींविषयी शरद पवार यांना माहिती दिली आहे. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटके व मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपास एनआयए व एटीएस करत आहे. राज्य सरकारकडून त्यांना पूर्ण सहकार्य केले जात आहे. तपासामध्ये जे दोषी आहेत, त्यांची नावे यायला हवीत. एनआयएच्या अंतिम चौकशी अहवालानतर पुढील कारवाई केली जाईल, असे देशमुख यांनी स्पष्ट केले. विरोधकांकडून होत असलेल्या राजीनाम्याच्या मागणीसह इतर मुद्यांवर बोलण्यास देशमुख यांनी नकार दिला. 

विदर्भातील मिहान प्रकल्पामध्ये येणार असलेल्या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या गुंतवणूकीसंदर्भातही पवारांशी चर्चा झाल्याचे देशमुख यांनी सांगितले. केंद्रीय उद्योग मंत्रालयाशी याबाबत बोलण्याची विनंती पवारांना केल्याचे देशमुख यांनी सांगितले. 

दरम्यान, देशमुख यांनी काल एका मुलाखतीत अँटिलिया स्फोटक प्रकरणात आमच्या अधिकार्‍यांकडून गंभीर चुका झाल्याची कबुली दिली आहे. एटीएस (ATS) आणि एनआयएकडून (NIA) याचा तपास सुरू आहे. चौकशीतून जे समोर येईल त्यानुसार जो दोषी असेल त्यांच्यावर कारवाई होईल,'' असे सांगत देशमुख यांनी पोलिस खात्यात सारे काही आलबेल नसल्याची कबूलीही दिली.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख