च्रकीवादळाची तीव्रता वाढली; गोव्यासह कर्नाटकला झोडपले, महाराष्ट्रालाही तडाखा बसणार - Goa and Karnataka have been hit by Tauktae cyclone | Politics Marathi News - Sarkarnama

च्रकीवादळाची तीव्रता वाढली; गोव्यासह कर्नाटकला झोडपले, महाराष्ट्रालाही तडाखा बसणार

वृत्तसंस्था
रविवार, 16 मे 2021

महाराष्ट्रासह पाच राज्यांवर तौते या चक्रीवादळाचे संकट घोंघावत आहे.

मुंबई : अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या तौते (Tauktae) चक्रीवादळाची तीव्रता आता वाढली असून गोव्यासह कर्नाटकातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक झाडे व विजेचे खांब उन्मळून पडले असून वादळाचा मोठा तडाखा बसला आहे. कर्नाटकात चार जणांचा मृत्यू झाला असून सहा जिल्ह्यांतील जवळपास ७३ गावांना झोडपून काढले आहे. हे वादळ आता गुजरातच्या दिशेने पुढं सरकत आहे. (Goa and Karnataka have been hit by Tauktae cyclone)
 
महाराष्ट्रासह पाच राज्यांवर तौते (Tauktae) या चक्रीवादळाचे (Cyclone) संकट घोंघावत आहे. या वादळाची तीव्रता वाढली असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे. सध्या वादळाचा केंद्रबिंदू गोवा किनारपट्टीच्या जवळ असल्याने गोवा व कर्नाटकला सध्या जास्त धोक आहे. मागील २४ तासांपासून दोन्ही राज्यांतील अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. गोव्याच्या किनारपट्टी भागाला जोरदार तडाखा दिला असून सध्या प्रतितास १२० किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. कर्नाटकलाही वादळी पावसाने झोडपून काढले आहे. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक झाडे उन्मळून पडली असून घरांच्या भिंतीही कोसळल्या आहेत. 

महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवर सध्या तुलनेने कमी तीव्रता असली तरी प्रशासनाकडून दक्षता घेतली जात आहे. हे वादळ रत्नागिरीतील राजापूर तालुक्याच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने तेथील ६५२ नागरिकांचे स्थलांतर केले आहे. राज्याच्या अनेक भागात वेगाने वारे वाहत असून किनारपट्टीवर हलक्या वाऱ्यासह पाऊस पडत आहे.

हेही वाचा : इस्त्रायलसोबत उभे राहणाऱ्यांनी वाजपेयींचे 'हे' भाषण ऐकावे! आव्हाडांनी शेअर केला व्हिडिओ

तौते वादळ उद्या गुजरात किनारपट्टीला धडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढील १२ तासांत वादळाची तीव्रता आणखी वाढण्याची भिती हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे गुजरात किनारपट्टी भागात अधिक दक्षता घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातसह महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची संवाद साधता आवश्यक सुचना दिल्या. तसेच तयारीची माहिती घेतली. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख