'बॉर्डरचा राजा' जम्मू-काश्‍मीरला दाखल; आयोजकांसह १५ दिवस क्वारंटाईन राहणार - Ganesh Idol Reached Kashmir From Maharshtra | Politics Marathi News - Sarkarnama

'बॉर्डरचा राजा' जम्मू-काश्‍मीरला दाखल; आयोजकांसह १५ दिवस क्वारंटाईन राहणार

नीलेश मोरे
मंगळवार, 4 ऑगस्ट 2020

दरवर्षी मुंबईतून जम्मू-काश्‍मीरच्या पुंछ गावात रवाना होणाऱ्या बॉर्डरच्या राजाचे भारतीय लष्कराकडून तिरंगा फडकावत, गुलाल उधळत जंगी स्वागत करण्यात येते. मात्र, यंदा लष्कराच्या परवानगीनुसार आणि दिलेल्या नियमानुसार सैनिकांकडून सामाजिक अंतर ठेवत व अत्यंत शांततेने तिरंगा फडकावत गणेशमूर्तीचे स्वागत करण्यात आले

घाटकोपर  : देशाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र सीमेवर तैनात असणाऱ्या भारतीय जवानांनाही गणेशोत्सव साजरा करता यावा, यासाठी मुंबईच्या बांद्रा स्थानकातून विशेष रेल्वेने दोन हजार किलोमीटरचा प्रवास करत पाठवलेली बॉर्डरच्या राजाची गणेशमूर्ती काल जम्मू-काश्‍मीरला दाखल झाली. 

मानवाधिकार कार्यकर्ते किरण बाळा-इशर आणि शिवनेर सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक छत्रपती आवटे यांच्यातर्फे दरवर्षी काश्‍मीर खोऱ्यातील पुंछ गावात सैनिकांसाठी मुंबईहून ही गणेशमूर्ती पाठवली जाते. या वर्षी आर्मी ब्रिगेडमध्ये मराठा रेजिमेंटसोबत गणेशोत्सव साजरा करणार आहोत, असे मानवाधिकार कार्यकर्त्या किरण बाळा-इशर यांनी सांगितले.

जम्मू-काश्‍मीरमधील पुंछ गाव नेहमी अतिरेक्‍यांच्या व पाकिस्तानी लष्कराच्या कारवाईमुळे दहशतीखाली असते. भारतीय सैनिक रात्रंदिवस गावातील सीमेवर डोळ्यांत तेल घालून पहारा देत असतात. मायभूमीच्या रक्षणासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या या सैनिकांना वर्षभर कोणताच उत्सव साजरा करता येत नाही. त्यामुळे मूळचे याच पुंछ गावचे असणाऱ्या किरण बाळा इशर व शिवनेर सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक छत्रपती आवटे गेल्या ११ वर्षांपासून भारतीय सैनिकांसाठी १० दिवसांचा गणेशोत्सव साजरा करतात. 

त्यासाठी ते मुंबईहून मूर्ती पाठवतात. गेल्या वर्षी काश्‍मीरमधील कलम ३७०  रद्द केल्याने तिथे मोठी सुरक्षा तैनात करण्यात आली होती. अनिश्‍चिततेच्या वातावरणामुळे 'बॉर्डरच्या राजा'च्या प्रवासात अडथळे आले होते. यंदाही कोरोना संकटामुळे हे अडथळे कायम आहेत, असेही त्यांनी सांगितले.

१५ दिवस आधी दाखल 
यंदा राज्य सरकारच्या नियमांमुळे 'बॉर्डरच्या राजा'ची दीड फूट गणेशमूर्ती पुंछला पाठवण्यात आली. कोरोनामुळे यंदा बॉर्डरचा राजा गणेशोत्सवाच्या १५ दिवसांआधीच दाखल झाला असून, सरकारच्या नियमाप्रमाणे आयोजकांसह तो १५ दिवस क्वारंटाईन असणार आहे.

तिरंगा फडकात झाले स्वागत
दरवर्षी मुंबईतून जम्मू-काश्‍मीरच्या पुंछ गावात रवाना होणाऱ्या बॉर्डरच्या राजाचे भारतीय लष्कराकडून तिरंगा फडकावत, गुलाल उधळत जंगी स्वागत करण्यात येते. मात्र, यंदा लष्कराच्या परवानगीनुसार आणि दिलेल्या नियमानुसार सैनिकांकडून सामाजिक अंतर ठेवत व अत्यंत शांततेने तिरंगा फडकावत गणेशमूर्तीचे स्वागत करण्यात आल्याचे मानवाधिकार कार्यकर्त्या किरण बाळा इशर यांनी सांगितले.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख