लस देता का लस! राज्यात तुटवडा अन् केंद्राकडून कासवगतीने पुरवठा - Dont have enough vaccine doses at vaccination centres says rajesh tope | Politics Marathi News - Sarkarnama

लस देता का लस! राज्यात तुटवडा अन् केंद्राकडून कासवगतीने पुरवठा

वृत्तसंस्था
बुधवार, 7 एप्रिल 2021

लस नसल्याने नागरिकांना लसीकरण केंद्रावरून परत जावे लागत आहे.

मुंबई : देशात कोरोना लसीकरणामध्ये महाराष्ट्र राज्य आघाडीवर असले तरी केंद्र सरकारकडून लशींचा अपेक्षित पुरवठा होत नसल्याची स्थिती आहे. लस नसल्याने नागरिकांना लसीकरण केंद्रावरून परत जावे लागत असल्याची कबुली खुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दर आठवड्याला किमान 40 लाख डोसची केंद्राकडे मागणी केल्याचेही टोपे यांनी सांगितले.

राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याने लसीकरणाचा वेग वाढविण्यात आला आहेत. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, सध्या दररोज सुमारे 4 लाख लोकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसी दिली जात आहे. भारतात एका दिवसातील राज्याचा हा आकडा सर्वाधिक आहे. आतापर्यंत राज्यातील 82 लाख लोकांना लस देण्यात आली आहे. राज्याला कालपर्यंत एक कोटी सहा लाख डोस मिळाले असून त्यापैकी 88 लाख लसींचा वापर झाला आहे. सुमारे 3 डोस राज्यात वाया जात आहेत. देशामध्ये हे प्रमाण सुमारे 6 टक्के एवढे आहे.

राज्यातील लसीकरणाचा वेग पाहता केंद्र सरकारकडून होणारा पुरवठा तोकडा पडत असल्याचे चित्र आहे. याविषयी माहिती देताना टोपे म्हणाले, राज्याला पुढील तीन दिवसांत 14 लाख डोस मिळतील. आम्ही दर आठवड्याला सुमारे 40 लाख डोसची मागणी केली आहे. केंद्र सरकारकडून राज्याला लस मिळत नाही, असे आमचे म्हणणे नाही. पण लशींचा पुरवठ्याचा वेग कमी आहे.

लसीकरण केंद्रांवर लशींचा पुरेसा साठा नाही. त्यामुळे लोकांना लशींच्या तुटवड्यामुळे केंद्रावरून परत पाठवावे लागत आहे. राज्यातील 20 ते 40 वयोगटातील लोकांनाही प्राधान्याने लस देण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे, असेही टोपे यानी स्पष्ट केले.

कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाल्याने राज्यात अाॅक्सीजनची मागणीही वाढू लागली आहे. याविषयी बोलताना टोपे म्हणाले, राज्यात 12 मेट्रीक टन अक्सीजनचे उत्पादन होत आहे. त्यापैकी 7 टनांहून अधिक अाॅक्सीजन दररोज लागत आहे. त्यामुळे शेजारील राज्यांतून वैद्यकीय अाॅक्सीजनचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे. गरज भासल्यास अाॅक्सीजनचा वापर करणारे उद्योग बंद करू, पण रुग्णांसाठी अाॅक्सीजनचा पुरवाट कमी पडू दिला जाणार नाही. पुणे, मुंबई, नाशिक आणि राज्यातील इतर भागात बेडची संख्या वाढविण्यासाठी युध्दपातळीवर काम सुरू आहे, असेही टोपे यांनी स्पष्ट केले.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख