मुख्यमंत्र्यांची मुले, जावई, भाचे यांचाही राजयोग

वडील मुख्यमंत्री अन् मुलगा, मुलगी आमदार-मंत्री, सासरे मुख्यमंत्री अन् जावई मंत्री, काका मुख्यमंत्री अन् पुतण्या मंत्री अशी अनेक उदाहरणेआहेत.
मुख्यमंत्र्यांची मुले, जावई, भाचे यांचाही राजयोग
The discussion of dynasticism in Indian politics has resurfaced

पुणे : राजकारणातील (Politics) घराणेशाहीवरून सतत वाद-प्रतिवाद होतात. त्यात डाव्या पक्षांसह कोणताच पक्ष मागे राहिलेला नाही. केरळमध्ये मुख्यमंत्री पी. विजयन (P. Vijayan) यांचे जावई पी. ए. मोहम्मद रियास यांचाही मंत्रीमंडळात समावेश करण्यात आला आहे. त्यावरून पुन्हा एकदा घराणेशाहीच्या चर्चेला तोंड फुटले आहे. भारतीय राजकारणात अशी अनेक उदाहरणे पहायला मिळतात. वडील मुख्यमंत्री (Chief Minister) अन् मुलगा, मुलगी आमदार-मंत्री, सासरे मुख्यमंत्री अन् जावई मंत्री, काका मुख्यमंत्री अन् पुतण्या मंत्री अशी अनेक उदाहरणे आहेत. (The discussion of dynasticism in Indian politics has resurfaced)

महाराष्ट्राच्या राजकारणातही सध्या हेच पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे कॅबिनेट मंत्री. आदित्य ठाकरे हे पर्यावरण मंत्री असून पहिल्यांदाच आमदार झाल्यानंतर लगेच मंत्रीपदही मिळाले आहे. महाराष्ट्राने यापूर्वी काका-पुतण्याची जोडी विधीमंडळात पाहिली आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री पदाचा राजीनामा देत शरद पवार 1993 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी अजित पवार यांच्याकडे जलसंधारण व ऊर्जा खात्याचे राज्य मंत्रीपद होते. 

तमिळनाडूमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत वडील आणि मुलगा निवडून आले आहे. एम. के. स्टॅलिन मुख्यमंत्री झाले असून त्यांचा मुलगा उदयनिधी स्टॅलिन हे
पहिल्यांदाच विधीमंडळात बसले आहेत. तर 2009 मध्ये एम. करूणानिधी मुख्यमंत्री असताना त्यांचे पुत्र एम. के. स्टॅलिन यांना उमुख्यमंत्री करण्यात आले होते. तमिळनाडूसह इतिहासात असा योगायोग पहिल्यांदाच जुळून आला होता. 

तेलंगणामध्ये के. चंद्रशेखर राव हे मुख्यमंत्री आहेत. त्यांचे पुत्र के. के. रामा राव हे माहिती तंत्रज्ञान खात्याचे मंत्री आहेत. तसेच टी. हरीश राव हे मुख्यमंत्र्यांचे भाचे असून ते अर्थ हे महत्वाचे खाते सांभाळत आहेत. घराणेशाहीवरून सतत काँग्रेस व इतर पक्षांवर टीका करणाऱ्या भाजपची सत्ता असलेल्या कर्नाटकमध्येही असेच चित्र दिसते. मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे पुत्र बी. वाय. रुघवेंद्र हे शिमोगा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. 

पश्चिम बंगालमध्ये विजयाची हॅट्रिक करणाऱ्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी हेही खासदार आहेत. तमिळनाडूप्रमाणेच पंजाबमध्येही वडील मुख्यमंत्री
तर मुलगा उपमुख्यमंत्री पदी विराजमान होते. प्रकाश सिंग बादल हे मुख्यमंत्री असताना त्यांचे पुत्र सुखबीर सिंग बादल हे उपमुख्यमंत्री होते. तर त्यांच्या पत्नी हरसिम्रत कौर बादल या केंद्रीय मंत्री होत्या. शेतकरी आंदोलनानंतर त्यांनी मागील वर्षी मंत्रीपदाचा राजीनामा दिला.

जम्मू काश्मीरमध्ये फारूख अब्दुल्ला मुख्यमंत्री असताना त्यांचे पुत्र ओमर अब्दुल्ला हे खासदार होते. तसेच वाजपेयी सरकारमध्ये मंत्री राहिले आहेत. त्यानंतर 2009 मध्ये ओमर मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. तर फारूख अब्दुल्ला खासदार म्हणून निवडून गेले. बिहारमध्ये लालु प्रसाद यादव यांनी अनेक वर्ष सत्ता गाजवली. पण चारा घोटाळ्यामध्ये नाव आल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर त्यांच्या पत्नी राबडी देवी मुख्यमंत्री झाल्या. त्यांच्या कार्यकाळात लालु प्रसाद यादव खासदार होते. तसेच त्यांनी रेल्वेमंत्रीपदाही सांभाळले आहे.

आसामचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले तरूण गोगोई यांचा मुलगा गौरव गोगोई हे 2014 मध्ये राजकारण आले. तरूण गोगोई मुख्यमंत्री असताना त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. मोदी लाटेतही त्यांनी विजय मिळवला. कर्नाटकमध्ये एच. डी. कुमारस्वामी मुख्यमंत्री असताना त्यांचे बंधू एच. डी. रेवण्णा यांनी महसूल खातं सांभाळलं आहे.  

Related Stories

No stories found.