परमबीर सिंग यांनी 3 कोटी 45 लाख रुपये उकळले; क्रिकेट बुकीची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार - Cricket bookies ransom complaint against parambir singh | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

परमबीर सिंग यांनी 3 कोटी 45 लाख रुपये उकळले; क्रिकेट बुकीची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 3 मे 2021

आता परमबीर सिंग यांच्याविरूध्द पैसे उकळल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत.

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचा आरोप केल्यानंतर आता परमबीर सिंग यांच्याविरूध्द पैसे उकळल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच एका पोलिस निरीक्षकाने परमबीर सिंग यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. त्यानंतर एका क्रिकेट बुकीने परमबीर सिंग यांच्यावर 3 कोटी 45 लाख रुपये उकळल्याचा आरोप केला आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. परमबीर सिंग यांनी देशमुखांवर लेटर बॅाम्ब टाकत खळबळ उडवून दिली. या प्रकरणात देशमुखांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. सीबीआयने त्यांच्यावर गुन्हाही दाखल केला आहे. याप्रकरणात राज्य शासनाने परमबीर सिंग यांच्या चौकशीचाही आदेश दिला आहे. त्यावर आक्षेप घेत परमबीर सिंग यांनी नुकतीच उच्च न्यायालयात धाव घेतली. देशमुख यांच्याविरोधातील पत्र मागे घेण्याचा धमकीवजा इशारा पोलिस महासंचालकांनी दिल्याचा आरोप त्यांनी केला. 

एकीकडे परमबीर सिंग राज्य शासनाविरोधात दंड थोपटत असताना आता त्यांच्याविरोधातही पैसे उकळल्याची तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढणार आहेत. क्रिकेट बुकी सोनू जालान याने ही तक्रार केली आहे. परमबीर सिंग यांनी 2018 मध्ये आपल्यावर मोक्का लावत 3 कोटी 45 लाख रुपये वसूल केले होते. तसेच पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा आणि कोथमिरे यांच्यावरही जालान वसुलीचे आरोप केले आहेत. 

केतन तन्ना या व्यक्तीने परमबीर सिंग यांच्यावर आरोप केले आहेत. त्यांनी आपल्याकडून सव्वा कोटी रुपये घेतल्याची तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणात परमबीर सिंग यांच्या गुन्हा दाखल करून चौकशी करावी, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे. आम्हाला न्याय द्या. या प्रकरणात आम्ही दोषी असल्यास आमच्यावरही कारवाई करा, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे. 

परमबीर सिंग यांच्या अकोल्यात गुन्हा 

काही दिवसांपूर्वीच परमबीरसिंग यांच्यासह 27 पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात रात्री उशिरा ॲट्रॉसिटीसह विविध 22 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमबीरसिंग यांच्यावर विविध प्रकारचे आरोप आरोप झाल्यानंतर हा त्यांच्यावर दाखल झालेला पहिला गुन्हा असल्याची माहिती आहे. 

ठाणे शहर पोलिस आयुक्तपदी असताना परमबीरसिंग यांनी हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार ज्येष्ठ पोलीस निरीक्षक भीमराज घाडगे यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलिस महासंचालक तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस महासंचालक यांच्याकडे केली होती. सोबतच परमबीर सिंग यांच्यासह 27 पोलिस अधिकाऱ्यांनी भिमराज घाडगे यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार भिमराज घाडगे यांनी अकोल्यातील  सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात दिली. यामध्ये मुंबईचे पोलिस उपायुक्त, संजय शिंदे, सुनील भारद्वाज, विजय फुलकर या चार पोलिस उपायुक्तांच्या डझनभर पोलिस अधिकार्‍यांचा समावेश आहे. परमबीरसिंग यांच्या जऴलचे पोलिस काॅन्सेबल यांचायी फिर्यादित उल्लेख आहे. या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख