कंगनाच्या अडचणी वाढल्या : न्यायालयाचे १ मार्च पर्यंत हजर राहण्याचे निर्देश  - Court orders Kangana to appear before March 1 | Politics Marathi News - Sarkarnama

कंगनाच्या अडचणी वाढल्या : न्यायालयाचे १ मार्च पर्यंत हजर राहण्याचे निर्देश 

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021

गीतकार जावेद अख्तर यांनी केलेल्या फौजदारी मानहानी दाव्याप्रकरणी दंडधिकारी न्यायालयाने बाॅलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला सोमवारी नोटीस बजावली.

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री कंगना रनौत पुन्हा एकदा अडचणीत आली आहे. जावेद अख्तर यांची मानहानी केल्या प्रकरणी कंगनाला न्यायालयाने नोटीस बाजावली आहे.  

गीतकार जावेद अख्तर यांनी केलेल्या फौजदारी मानहानी दाव्याप्रकरणी दंडधिकारी न्यायालयाने बाॅलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला सोमवारी नोटीस बजावली. रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांनी घेतलेल्या एका मुलाखतीत जावेद अख्तर यांची बदनामी केल्याचे दाव्यात म्हटले आहे. 

दंडाधिकारी आर. आर. खान यांनी या प्रकरणी जूहू पोलिसांना चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. पोलिसांनी त्यानुसार सोमवारी न्यायालयात अहवाल सादर केला. कंगनावर केलल्या आरोपांत तथ्य असल्याने आणखी तपास करावा लागेल, असे पोलिसांनी अहवालात म्हटल्याचे जावेद अख्तर यांचे वकील कुमार भारव्दाज यांनी न्यायालयाला सांगितले. 

अख्तर यांनी केलेल्या दाव्यानुसार, कंगनाने अर्णब यांना दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तर हे बाॅलिवूडमधील सुसाईड गॅंग मध्ये सहभागी होते. काहीही केले तरी ते मोकळे सुटू शकतात, असे म्हटले आहे. तिच्या या आरोपांमुळे जावेद यांची प्रतिमा मलिन झाली असा, आरोप त्यांनी केला आहे. यू-ट्यूबवर ही क्लिप खूप व्हायरल झाली होती, असा युक्तिवाद भारव्दाज यांनी केला.  

कंगनाची चौकशी करण्यासाठी पोलीस तिला वारंवार समन्स बजावत आहेत. परंतु, ती त्याला उत्तर देत नाही, अशी माहिती भारद्वाज यांनी दंडाधिकार्यांना दिली. त्यांचा युक्तिवाद एेकल्यावर न्यायालयाने कंगनाला नोटीस बजावली. १ मार्चपर्यंत न्यायालयात उपस्थित राहण्याचे निर्देश न्यायालयाने कंगनाला दिले. 

Edited By - Amol Jaybhaye      

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख