महाराष्ट्र नंबर वन; लसीकरणात ओलांडला मोठा टप्पा...मुख्यमंत्र्यांची माहिती

सर्वांत जास्त लशी मिळालेल्या पहिल्या पाच राज्यांमध्येही महाराष्ट्राचा समावेश नाही.
Corona Vaccination Maharashtra crossed the mark of 1 Crore
Corona Vaccination Maharashtra crossed the mark of 1 Crore

मुंबई : लशींच्या पुरवठ्यावरून राज्य व केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्र्यांमध्ये वादविवाद सुरू असतानाच महाराष्ट्राने मोठा टप्पा पार केला आहे. देशामध्ये सुमारे 10 कोटी नागरिकांना लसीकरणाचा टप्पा आज ओलांडलेला असताना महाराष्ट्रही मागे राहिलेला नाही. राज्यानेही एक कोटींचा टप्पा पार करून देशात 'नंबर वन' कामगिरी केली आहे.

देशभरात आता कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली आहे. कोरोना रुग्णसंख्या आणि मृत्यूचे आकडेही विक्रमी पातळीवर पोचले आहेत. देशात कोरोना लशीचा तुटवडा निर्माण झाला आहे. आता केंद्र सरकारने लशीचे वाटप केले असून, सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असताना सर्वांत जास्त लशी मात्र, भाजपची सत्ता असलेल्या राज्यांना मिळाल्या आहेत. त्यावरून केंद्र व राज्य आमनेसामने आले आहे. 

लोकसंख्या व रुग्णसंख्येच्या तुलनेत महाराष्ट्राला लशींचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असले तरी महाराष्ट्रने लसीकरणात देशात आघाडी घेतली आहे. राज्यभरात या लसीकरण मोहिमेअंतर्गत आज एक कोटींचा टप्पा पार केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. देशात एक कोटीचा टप्पा ओलांडणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे. 

दररोज सहा लाख लसीकरणाची तयारी

महाराष्ट्रात दररोज सहा लाख जणांना लस देण्याची क्षमता असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडे दर आठवड्याला 40 लाख आणि महिन्याला 1 कोटी 60 लाख लशींची मागणी करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्राची लोकसंख्या, बाधित रुग्ण, सक्रीय रुग्णांच्या तुलनेत महाराष्ट्राला कमी प्रमाणात लस मिळत असल्याचा पुनर्रुच्चार त्यांनी केला. 

महाराष्ट्राशी दुजाभाव

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पुढील काही दिवसांचे लसवाटप जाहीर केले आहे. यानुसार, एकूण साडेतीन कोटी डोसचे वाटप करण्यात आले आहे. सर्वांत जास्त लशी मिळालेल्या पहिल्या पाच राज्यांमध्येही महाराष्ट्राचा समावेश नाही. पहिल्या पाच राज्यांमधील चार राज्ये भाजपची सत्ता असलेली उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, हरियाना ही आहेत. याचबरोबर पाचव्या स्थानी विधानसभा निवडणूक सुरू असलेल्या पश्चिम बंगालच्या समावेश आहे. 

राज्यनिहाय लसवाटप 
१) उत्तर प्रदेश : ४४.९८ लाख 
२) मध्य प्रदेश  ३३.७६ लाख 
३) कर्नाटक : २९.०६ लाख 
४) हरियाना : २४ लाख 
५) पश्चिम बंगाल : २१ लाख 
६) महाराष्ट्र : १७.४३ लाख 
७) गुजरात : १७.५७ लाख 

महाराष्ट्राला मिळालेला लशीचा साठा अपुरा असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. टोपे म्हणाले की, आम्हाला कोणत्याही अडथळ्याविना लसीकरण सुरु ठेवायचे असेल तर आठवड्याला ४० लाख डोस लागतील. आम्हाला मिळालेला १७ लाख ४३ हजार डोस कमी आहेत. राज्यातील लशीचा साठा संपत चालला आहे. या डोसमधून भागवाभागव करण्याचा मोठा प्रश्न आहे.  

Edited By Rajanand More
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com