#SSRSuicide बिहारच्या अधिकाऱ्याला 'आॅनलाईन' तपासाची 'परवानगी' - Bihar Police can continue SSR Case probe online BMC sends letter | Politics Marathi News - Sarkarnama

#SSRSuicide बिहारच्या अधिकाऱ्याला 'आॅनलाईन' तपासाची 'परवानगी'

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 6 ऑगस्ट 2020

पाटण्याचे पोलिस अधिक्षक विनय तिवारी सुशांतसिंह राजपूत प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आले आहेत. या प्रकरणात बिहारमध्ये दाखल झालेल्या तक्रारीचा तपास ते करत आहेत. तिवारी मुंबईत आल्यावर लगेचच मुंबई महापालिकेने त्यांना क्वारंटाईन केले. यावरुन राजकीय वादळ सुरु झाले आहे. महाराष्ट्र विरुद्ध बिहार असे चित्र यातून निर्माण झाले आहे

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात बिहारमध्ये दाखल झालेल्या तक्रारीचा तपास करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्याला 'आॅनलाईन तपास' करण्याची 'परवानगी' मुंबई महापालिकेने दिली आहे. बृहन्मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी तसे पत्र बिहारच्या पोलिस महानिरिक्षकांना पाठवले आहे.

पाटण्याचे पोलिस अधिक्षक विनय तिवारी सुशांतसिंह राजपूत प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आले आहेत. या प्रकरणात बिहारमध्ये दाखल झालेल्या तक्रारीचा तपास ते करत आहेत. तिवारी मुंबईत आल्यावर लगेचच मुंबई महापालिकेने त्यांना क्वारंटाईन केले. यावरुन राजकीय वादळ सुरु झाले आहे. महाराष्ट्र विरुद्ध बिहार असे चित्र यातून निर्माण झाले आहे. या प्रकरणी विरोधी पक्षांनीही प्रश्न उपस्थित केले आहेत. तुमचा अधिकारी झूम, गुगल मिट किंवा जिओ मिट अशा माध्यमांद्वारे आपले कामकाज सुरु ठेऊ शकतात, असे महापालिकेने बिहार पोलिसांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. 

बिहारच्या महासंचालकांची नाराजी

दरम्यान, बिहारच्या आयपीएस अधिकाऱ्याला क्वारंटाईन करण्याचे मुंबई पोलिसांचे कृत्य हे नितीमत्तेला धरून नाही, अशी टीका बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी केली आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सूचना करुनही मुंबई पोलिसांकडून कुठलाही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. तिवारी यांना अद्यापपर्यंत मुक्त करण्यात आलेले नाही, असे पांडे यांनी म्हटले आहे. 

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर मोठे वादळ उठले आहे. या प्रकरणाच्या तपासावरुन महाराष्ट्र आणि बिहार सरकारमध्ये जुंपली आहे. या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) चौकशी करण्याची बिहार सरकारने केलेली मागणी केंद्र सरकारने मान्य केली आहे. दरम्यान, तपासासाठी मुंबईत आलेल्या बिहारच्या आयपीएस अधिकाऱ्याला क्वारंटाइन करण्याचा मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारचे कान टोचले आहेत. 

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी त्याचे पिता के.के.सिंह पाटण्यातील राजीवनगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. यात त्यांनी रिया चक्रवर्तीसह तिच्या कुटुंबीयांवर धक्कादायक आरोप केले आहेत. हा एफआयआर दाखल झाल्यानंतर बिहार पोलिसांचे पथक तपासासाठी मुंबईत दाखल झाले आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी जमा केलेले पुरावे आणि नोंदविलेले जबाबही बिहार पोलीस तपासत आहेत. 

सुशांतच्या आत्महत्येच्या तपासावरून महाराष्ट्र आणि बिहार सरकार एकमेकांविरोधात उभे राहिल्याचे चित्र निर्माण झाले आहे. बिहार पोलिसांच्या कार्यपद्धतीला महाराष्ट्र सरकारने आक्षेप घेतला आहे. दोन राज्यांचे पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असताना यात सक्त वसुली संचालनालयानेही (ईडी) उडी घेतली आहे. सुशांतची आत्महत्या, आर्थिक अनियमतिताप्रकरणी ईडीने रिया हिच्यासह सहा जणांवर करचुकवेगिरी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. 

रिया चक्रवर्ती हिने सुशांतचे पिता के.के.सिंह यांनी बिहारमध्ये दाखल केलेला एफआयआर मुंबईत वर्ग करावा, अशी मागणी याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयात केली आहे. यावर काल झालेल्या सुनावणीवेळी सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी केंद्र सरकारच्या वतीने म्हणणे मांडले. बिहार सरकारने या प्रकरणी सीबीआय चौकशीची शिफारस केली होती. केंद्र सरकारने ही शिफारस मान्य केली आहे, असे त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. 

या प्रकरणाच्या तपासासाठी आलेले बिहारचे पोलीस अधिकारी विनय तिवारी यांना मुंबईत क्वारंटाइन करण्यात आले आहे. हा मुद्दा काल सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवेळी उपस्थित झाला. पुरावे नष्ट करण्यासाठी बिहारच्या पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाइन करण्यात आल्याचा आरोप सुशांतच्या वडिलांचे वकील विकाससिंह यांनी केला. या प्रकरणी मुंबई पोलिसांना बिहार पोलिसांना सहकार्य करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली. यावर सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला सुनावले. न्यायालय म्हणाले की, मुंबई पोलिसांची प्रतिमा चांगली आहे हे सत्य असले तरी, बिहारच्या पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाइन करुन तुम्ही चुकीचा संदेश देत आहात. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख