योगीजी तुम्ही तुमच्याकडचे जंगलराज रोखा : अनिल देशमुख - Anil Deshmukh Adivices Yogi Adityanath to Look after own state | Politics Marathi News - Sarkarnama

योगीजी तुम्ही तुमच्याकडचे जंगलराज रोखा : अनिल देशमुख

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 ऑक्टोबर 2020

योगी आदित्यनाथ गेल्या काही महिन्यांपासून दुसऱ्यांना सल्ले देताना आम्ही पहात आहोत. योगी आदित्यनाथ यांनी आपल्या राज्याकडे पहावे आणि तिथल्या 'जंगलराज' वर कडक कारवाई करावी, असा सल्ला महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे. 

मुंबई : योगी आदित्यनाथ गेल्या काही महिन्यांपासून दुसऱ्यांना सल्ले देताना आम्ही पहात आहोत. योगी आदित्यनाथ यांनी आपल्या राज्याकडे पहावे आणि तिथल्या 'जंगलराज' वर कडक कारवाई करावी, असा सल्ला महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे. 

उत्तर प्रदेश मधील हाथरस या ठिकाणी एका दलित युवतीवर गावातील सवर्ण तरुणांनी अत्याचार करून तिच्या पाठीचा कणा तोडला व जीभ कापली त्यानंतर तिला शेतात मेली आहे, असे समजून टाकून दिले. १४ सप्टेंबर रोजी झालेल्या घटनेनंतर या तरुणीने या दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. त्यानंतर या युवतीच्या घरच्यांच्या अनुपस्थितीत तिच्यावर पोलिसांनी अंत्यसंस्कारही केले. यावरुन उत्तर प्रदेशच्या सरकारवर आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरी सर्व स्तरांतून टीका होत आहे. 

कालही देशमुख यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली होती. उत्तरप्रदेश मधील हाथरसमधल्या सामुहिक बलात्कारातील पीडितेवर नराधमांनी अमानुष अत्याचार केले. गेले १० दिवस पीडितेच्या कुटुंबीयांची एफआयआर नोंदवून न घेणाऱ्या पोलिसांनी तिच्या अंत्यसंस्काराला देखील कुटुंबीयांना येऊ दिले नाही. ही बाब अत्यंत गंभीर व निंदनीय आहे, असे देशमुख म्हणाले होते. 

प्रकाश आंबेडकर यांनीही या घटनेवरुन योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. यावरून अस स्पष्ट होते की, उत्तर प्रदेश सरकार महिलांना सुरक्षा देऊ शकत नाही, अशा योगी सरकारचा आम्ही धिक्कार करतो. असं प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

महिलांसोबत कोणी काहीही करू शकतो अशी मानसिकता झाली आहे. लोकांनी आता या प्रकरणावर बोलले पाहिजे. या प्रकरणात सरकारने एसआयटीची नेमणूक करायची काहीही गरज नाही. यातील आरोपींची नावे पीडित तरुणीने घेतली आहेत. त्यामुळे या प्रकरणी लोकांची दिशाभूल करण्याची गरज नाही. मुलीच्या जबानीवरुन आरोपींना अटक केली आहे. त्यांना कठोर शिक्षा करा, असेही ते म्हणाले.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख