आंबेडकर महासभेकडून राम मंदिरासाठी चांदीची वीट दान... - Ambedkar mahasabha Donate silver brick for ram mandir | Politics Marathi News - Sarkarnama

आंबेडकर महासभेकडून राम मंदिरासाठी चांदीची वीट दान...

वृत्तसंस्था
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी निधी समर्पण अभियान सुरू आहे. याअंतर्गत आतापर्यंत सुमारे १५०० कोटी रुपयांचा निधी जमा झाला आहे.

अयोध्या : अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी निधी समर्पण अभियान सुरू आहे. याअंतर्गत आतापर्यंत सुमारे १५०० कोटी रुपयांचा निधी जमा झाला आहे. तसेच रामभक्तांकडून सोने आणि चांदीही दान दिली जात आहे. आंबेडकर महासभा ट्रस्टनेही राम मंदिर उभारणीसाठी चांदीची वीट दान दिली आहे. 

श्रीराम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा यांच्याकडे रविवारी चांदीची वीट सोपविण्यात आली. अनुसूचित जाती वित्त आणि विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. लालजी प्रसाद निर्मल यांनी कारसेवक पुरम येथे चांदीची वीट दान केली.

समाजातील सर्व घटकांप्रमाणेच दलित समाजही मंदिर उभारण्याबाबत उत्साहित असल्याचे निर्मल यांनी सांगितले. तसेच राम मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा केल्याबद्दल दलित समाज न्यायालय, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानतो, असेही निर्मल यावेळी म्हणाले.

मिश्रा म्हणाले, लालजी प्रसाद निर्मल यांनी चांदीची वीट समर्पित केली आहे. देशात १५ जानेवारीपासून निधी समर्पण अभियान राबविले जात आहे. सर्व समाजातून व्यापक स्वरूपात यामध्ये सहभाग मिळत आहे. राम मंदिर उभारणीसाठी मिळत असलेले चांदीचे दान ठेवण्यासाठी जागा नसल्याचे मिश्रा यांनी सांगितले. 

बँकेचे लॉकर भरले आहेत. त्यामुळे चांदीचे दान घेणे बंद करावे लागले होते. पण याची जेव्हा गरज लागेल, तेव्हा मंदीर उभारणीत त्याचा वापर केला जाईल. चांदी ठेवण्याची अडचण असल्याने ते दान स्वरूपात देऊ नये, असे आवाहन मिश्रा यांनी केले आहे. भविष्यात त्याची गरज भासल्यास आवाहन केले जाईल, असेही ते म्हणाले.

राम मंदिराचे काम प्रगतीपथावर...
अयोध्येतील राम मंदिराचे काम प्रगतीपथावर आहे. मंदिर परिसरात पाया खोदण्याचे काम सुरू आहे. जवळपास ९ मीटरपर्यंत खोदाईचे काम पुर्ण झाले आहे. ७० दिवसांमध्ये पाया खोदाईचे काम पुर्ण होण्याची शक्यता आहे. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख