सचिन तेंडूलकर, अक्षय कुमारने अडविले रुग्णालयातील बेड - Akshay Kumar Sachin Tendulkar not need to get admitted says Minister aslam shaikh | Politics Marathi News - Sarkarnama

सचिन तेंडूलकर, अक्षय कुमारने अडविले रुग्णालयातील बेड

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 एप्रिल 2021

मागील काही दिवसांत राजकीय नेत्यांसह अनेक सेलिब्रिटीही कोरोनाबाधित झाले आहेत.

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे रुग्णालयांमध्ये गरजूंना बेड मिळणेही कठीण झाले आहे. पुणे, मुंबई व इतर शहरांमध्येही बेडसाठी कोरोना बाधितांना वणवण भटकावे लागत असल्याचे वास्तव आहे. पण काही सेलिब्रिटी कोणतीही लक्षणे नसताना विनाकारण बेड अडवून ठेवत असल्याचे वक्तव्य मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केले आहे. 

मागील काही दिवसांत राजकीय नेत्यांसह अनेक सेलिब्रिटीही कोरोनाबाधित झाले आहेत. त्यामध्ये सचिन तेंडूलकर, अक्षय कुमार आदींचा समावेश आहे. लक्षणे नसलेल्या किंवा किरकोळ लक्षणे असलेल्यांनी घरीच उपचार घ्यावे, असा नियम आहे. पण अनेक जण कोरोना रिपोर्ट पॅाझिटिव्ह आल्यानंतर थेट रुग्णालय गाठतात. त्यामुळे गरजूंना बेड मिळत नाही. अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. 

याच पार्श्वभूमीवर अस्लम शेख यांनी थेट सचिन तेंडूलकर व अक्षय कुमार यांची नावे घेत टीका केली आहे. दोघेही उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले होते. आता दोघांनाही घरी सोडण्यात आले आहे. ''लक्षणे नसलेल्या सेलिब्रिटींनी घरीच उपचार घ्यायला हवेत. त्यांनी रुग्णालयातील बेड अडवू नयेत. अक्षय कुमार, सचिन तेंडूलकर यांच्यासारख्या सेलिब्रिटींना रुग्णालयात दाखल होण्याची गरज नाही. गरजूंना बेड सोडायला हवे,'' असे वक्तव्य शेख यांनी केले आहे. शेख यांच्या वक्तव्यावरून वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. अनेक नेटकऱ्यांनी सोशल मीडियावरही शेख यांच्या वक्तव्यावर टीका सुरू केली आहे. 

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यात कडक नियम लागू करण्याबाबत आजच निर्णय घेतील, असे शेख यांनी स्पष्ट केले. कोरोना संसर्गाची साखळी तोडायची आहे. कोरोना रुग्ण कमी असते तर आपल्याला लॅाकडाऊन टाळता येईल. लोकांचे जीव वाचविण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, असेही शेख म्हणाले. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री साडे आठ वाजता सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधणार आहे. राज्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या चिंतेचा विषय बनली आहे. त्यामुळे आज मुख्यमंत्री राज्यात कडक लॅाकडाऊन जाहीर करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यासाठी मुख्यमंत्री मागील काही दिवसांपासून विरोधी पक्षनेत्यांसह विविध घटकांशी चर्चा करत आहेत. आज त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख