जाग आणि शुद्ध दोन्ही ठेऊन काम करा; मुंडे भगिनी धनुभाऊवर बरसल्या... - Pankaja And Pritam Munde criticise Dhananjay Munde on corona situation | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

जाग आणि शुद्ध दोन्ही ठेऊन काम करा; मुंडे भगिनी धनुभाऊवर बरसल्या...

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 16 एप्रिल 2021

धनंजय मुंडे व आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे व खासदार प्रितम मुंडे यांच्यातील ट्विटर वॅार अधिकच धुमसत चालले आहे.

मुंबई : बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे व आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे व खासदार प्रितम मुंडे यांच्यातील ट्विटर वॅार अधिकच धुमसत चालले आहे. धनंजय मुंडे यांच्या प्रत्युत्तरानंतर मुंडे भगिनी ट्विटरवरून त्यांच्यावर चांगल्याच बरसल्या. जाग आणि शुध्द दोन्ही ठेऊन काम करावे, बीडमध्ये दमडीही आणली नाही, माफिया मात्र आणले, असे म्हणत दोघींनीही धनुभाऊवर टीकास्त्र सोडले. 

बीड जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीवरून पालकमंत्री धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे व खासदार प्रितम मुंडे यांच्या जोरदार ट्विटर वॅार सुरू झाले आहे. सुरूवातीला बीडमध्ये कमी प्रमाणात मिळालेल्या लशीचा मुद्दा पुढे करून पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर टीका केली. प्रितम मुंडे यांनी हा मुद्दा उपस्थित करून टोला लगावला. धनंजय मुंडे यांनीही मग एकामागोमाग सहा ट्विट करून मुंडे भगिनींना प्रत्युत्तर दिले. 

त्यानंतर आज धनंजय मुंडे यांनी ट्विटरवर जिल्ह्याला मिळालेल्या लशींची आकडेवारी देत मुंडे भगिनींना प्रत्युत्तर दिले. अनेक महिने विश्रांतीनंतर अचानक जाग आली की बाहेरच्या अनेक गोष्टीची माहितीच नसते.आपल्या अचानक आलेल्या जागृतीतून जनतेमध्ये संभ्रम निर्माण होत असून त्याचा परिणाम लसीकरण प्रक्रियेवर देखील होऊ शकतो, असे मुंडे यांनी म्हटले आहे. 

त्यावर पलटवार करताना पंकजा मुंडे म्हणाल्या, ''राज्याच्या भल्यासाठी PM, जिल्ह्याच्या CM आणि पवार साहेबांना ही पत्र लिहीन. दखल ही घेतली जाईल! तुम्ही त्यांनी दिलेल्या संधीचा तरी सन्मान करा. तुम्ही बीडमध्ये दमडीही आणली नाही. विमा, विकास निधी ,अनुदान काही नाही, माफिया मात्र आणले. जुन्या निधीचे काम तरी करा, उद्घाटन करा हक्क तुम्हाला आहेच भाऊ!, '' असा टोला त्यांनी लगावला आहे. तसेच प्रीतम मुंडे यांचे पीपीई कीट घालून रुग्णालयाला भेट दिल्याचे काही फोटोही त्यांनी ट्विट केले आहेत. पेशंट जागे, खासदार जाग्या, डॅाक्टर जागे, आरोग्य सेवक जागे..मग.. असे म्हणत त्यांनी धनंजय मुंडेंना पुन्हा निशाणा साधला.

प्रितम मुंडे यांनीही ट्विटरवरून टीका केली. त्या म्हणाल्या, Vaccine देखील पुरेसे दिले नाहीत..जाग आहेच कारण पीपीई किट परिधान करून पाहणी मी स्वतः केली आहे..जाग आणि शुद्ध दोन्हीही ठेऊन काम करावे अधिकार्‍यांना घरी बोलावून माफियांच्या पाया पडायला लावण्यापेक्षा कोविड वार्डमध्ये जा, असे आव्हान त्यांनी धनुभाऊंना दिले. 

तत्पुर्वी, धनंजय मुंडे यांनी एकामागोमाग सहा ट्विट करून मुंडे भगिनींना लक्ष्य केले होते. ताई साहेब, मा. मुख्यमंत्र्यांना व मा. आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहिण्याऐवजी पूर्ण माहिती घेऊन एखादे पत्र मा. पंतप्रधानांना पाठवावे व लसींचा पुरवठा वाढविण्याबाबत आग्रह धरावा, जेणेकरून कोरोनाविरुद्धच्या या लढाईत खरोखरच आपली मदत होईल. जिल्ह्यात कोव्हिशिल्डचे 6800 व कोव्हॅक्सिनचे 13290 डोस शिल्लक आहेत व कोव्हॅक्सिन केवळ दुसऱ्या डोससाठीच वापरावे असे केंद्राचे निर्देश आहेत. ऑक्सिजन, रेमडीसीवर तसेच लसीकरण यापैकी कोणत्याही उपाययोजनेत अडसर येऊ नये यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत, असेही मुंडे म्हणाले. 

जिल्ह्यात लसीकरणाचे दोन्ही कंपन्यांचे मिळून 149473 नागरीकांना पहिले तर 19732 नागरिकांना दुसरे डोस देण्यात आले आहेत.हे प्रमाण अन्य जिल्ह्याच्या सरासरीच्या तुलनेत अधिक आहे, हेही आपल्याला ज्ञात नसेलच! राजकारण इतरत्र जरूर करा,पण कृपया जिथे लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे तिथं नको. कोव्हॅक्सिनच्या नव्याने प्राप्त 2 लाख लसींचा वितरणासह शिल्लक असलेल्या व आवश्यक असलेल्या लसींची सविस्तर आकडेवारी आपल्यासाठी देत आहे! आपण शेअर केलेल्या 20 लसींच्या यादीत जालना-सोलापूर शून्य आहे,आरोग्यमंत्री स्वतःच्या जिल्ह्यात लस मिळवू शकले असते हा साधा प्रश्न आपल्याला पडू नये, असे मुंडे यांनी नमुद केले आहे. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख