धनंजय मुंडेंकडे माझे आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ : रेणू शर्मा - My offensive videos and photos are with Dhananjay Munde: Renu Sharma | Politics Marathi News - Sarkarnama

धनंजय मुंडेंकडे माझे आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ : रेणू शर्मा

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 15 जानेवारी 2021

विविध आमिषे दाखवून त्यांनी माझा वापर केला

मुंबई : धनंजय मुंडे यांनी 2006 पासून (मधील चार वर्षे थांबल्यानंतर पुन्हा 2013 पासून) माझ्यावर जबरदस्ती केली. त्यांनी माझा फक्त उपयोग केला आहे. मुंडे यांच्याकडे माझे आक्षेपार्ह फोटो, शारीरिक संबंधांचे व्हिडिओ आहेत. विविध आमिषे दाखवून त्यांनी माझा वापर केला आहे, त्यामुळेच मी आता त्यांच्याविरोधात तक्रार दिली आहे, असा खळबळजनक आरोप रेणू शर्मा यांनी पुन्हा केला आहे. 

एका वृत्तवाहिनीशी बोलताना रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर अमिष दाखवून बलात्कार केल्याचे आरोप पुन्हा केले आहेत. 

भारतीय जनता पक्षाचे नेते कृष्णा हेगडे, मनसेचे मनीष धुरी, रिझवान शेख यांच्या आरोपालाही रेणू शर्मा यांनी उत्तरे दिली. त्या म्हणाल्या की, रिझवान शेख हा माझ्या मागे लागला होता. माझे तुझ्यावर प्रेम आहे, असे सांगून तो माझ्याशी लग्न करायचे आहे, असे म्हणत होता. मीही त्याच्याशी लग्न करण्याच्या विचारात होते. मात्र, त्याची दोन लग्न झाली आहेत. शिवाय तो काही मुलींशी संबंध ठेवून असल्याचे मला समजले. तो माझ्याशी खोटे बोलत असल्याचे पाहून मी त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली. रिझवानच्या विरोधात तक्रार कोणी द्यायला लावली, हेही जाणून घ्या. मुंडे यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी मला 5 ते 6 तास थांबावे लागले होते. पण, रिझवान याच्याविरोधात एका मिनिटात तक्रार घेतली गेली होती. 

कृष्णा हेगडे हेच मला पहिल्यांदा बोलले 

कृष्णा हेगडे यांच्या आरोपावर रेणू शर्मा यांनी सांगितले की, धनंजय मुंडे यांनी म्हटल्याप्रमाणे ब्लॅकमेल हा शब्द माझ्या जीवनाला चिकटला आहे. कृष्णा हेगडे यांच्याशी माझी भेट प्रताप सरनाईक यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात झाली होती. त्यावेळी ते स्वतःहून माझ्याशी बोलले होते. तेच मला मेसेज पाठवायचे. पण, ते आता असे आरोप का करत आहेत, हे समजत नाही. 

मनीष धुरी दारू पिऊन फोन करायचे 

मनीष धुरी हे माझ्या संपर्कात आले नव्हते. माझ्या एका म्युझिक व्हिडिओसंदर्भात मदत मिळविण्याठी मी धुरी यांना भेटले होते. त्यानंतर ते दारू पिऊन रोज संध्याकाळी मला फोन करत होते. माझे भाऊजी धनंजय मुंडे असल्याचे सांगितल्यानंतर धुरी यांनी मुंडे यांना शिव्या दिल्या होत्या. तेच धुरी आज मुंडेंची पाठराख करत आहेत. तसेच मी धुरी यांना घरी बोलावले होते, ते त्यांनी सिद्ध करावे, असे आव्हानही त्यांनी दिले. 

आरोपांना उत्तर 

स्टेटमेंटसाठी आज मला पोलिस ठाण्यात बोलावले होते. मात्र, मी गेले नाही. कारण, राज्यात मी एकटे लढत आहे. माझ्यावर खोटे आरोप लावले जात आहेत. नागरिक माझ्याकडे संशयाने पाहत आहेत. म्हणून मी या व्हिडिओच्या माध्यमातून आरोपांना उत्तर देत आहे, असे शर्मा यांनी नमूद केले. 

मुंडे हीच माझी तक्रार 

तक्रार करणारांचे दुःख समजून घेऊन तक्रार देण्यामागचे कारण समजून घ्यावे. पोलिस, सरकार यांच्याबाबत माझी काहीही तक्रार नाही. माझी धनंजय मुंडे ही एकच तक्रार आहे, असा आरोप पुन्हा मुंडे यांच्यावर केला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख