धनंजय मुंडे यांनी अग्निपरीक्षेला सामोरे जावे : दरेकर  - Dhananjay Munde should accept moral responsibility and resign: Praveen Darekar | Politics Marathi News - Sarkarnama

धनंजय मुंडे यांनी अग्निपरीक्षेला सामोरे जावे : दरेकर 

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 14 जानेवारी 2021

तर त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात प्रवेश मिळू शकतो.

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर असतील, तर त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून अग्निपरिक्षेला सामोरे जाऊन राजीनामा देणे योग्य ठरेल, अशी भूमिका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मांडली. 

मुंडे यांच्या प्रकरणा संदर्भात राष्ट्रवादी पक्षामध्येच दोन भूमिका घेतल्या जात आहेत. परंतु धनंजय मुंडे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणे उचित ठरेल, असे दरेकर यांनी सांगितले. 

मुंडे यांच्या प्रकरणासंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हे प्रकरण गंभीर असल्याचे वक्तव्य केले आहे. तर दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अद्याप कसलाही निर्णय झाला नसल्याचे म्हटले आहे. यामधून ते त्यांची बाजू सावरण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. पण हे योग्य नाही, असे दरेकर म्हणाले. 

"अशा प्रकारचे गंभीर आरोप होत असताना प्रसार माध्यमांमधून जनतेच्या मनात एक वेगळं चित्र उभं राहत आहे. त्यामुळे या परिस्थितीत या अग्निपरीक्षेला सामोरं जाण्याची आवश्‍यकता आहे. तसेच, इतरांनी राजीनामा मागण्यापेक्षा मुंडे यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा. जर या प्रकरणात त्यांचे निर्दोषित्व सिद्ध झाले, तर त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात प्रवेश मिळू शकतो,'' असे दरेकर म्हणाले. 

या पूर्वीही शिवसेना-भाजप युतीच्या काळात अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर शिवसेनाप्रमुखांनी तत्कालीन मंत्री शशिकांत सुतार, बबनराव घोलप यांचे राजीनामे घेतले होते. त्यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या मंत्र्यांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते, अशी आठवणही दरेकर यांनी करून दिली. आता राज्यात शिवसेनाप्रमुखांचे सुपुत्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनीही तशाच स्वरूपाचा निर्णय घ्यावा, अशी मागणीही दरेकर यांनी केली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख