पवारांवर टीका करणाऱ्या राज ठाकरेंचा जयंत पाटलांनी घेतला समाचार  - Raj Thackeray is making baseless allegations for publicity : Jayant Patil | Politics Marathi News - Sarkarnama

पवारांवर टीका करणाऱ्या राज ठाकरेंचा जयंत पाटलांनी घेतला समाचार 

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 7 फेब्रुवारी 2021

फडणवीस यांना मी गांभीर्याने घेत असलो तरी त्यांच्या अशा विधानांना मात्र गांभीर्याने घेत नाही.

अकोला : कोरोना काळातील वाढीव वीजबिल माफीबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. त्याला रविवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अकोला येथे उत्तर देताना राज ठाकरे प्रसिद्धीसाठी असे बेफाम आरोप करीत असल्याचा पलटवार केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे फासे पलटण्याच्या विधानातही गांभीर्य नसल्याचे पाटील यांनी सांगितले. 

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी रविवारी (ता. 7 फेब्रुवारी) अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात जलसंपदा विभागांतर्गत अकोला जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ऊर्जामंत्री राज्य सरकारने टाळेबंदीच्या काळात वीजबिल माफी संदर्भात आश्वासन दिल्यावर घुमजाव केले. याबाबत राज ठाकरे यांनी त्यासाठी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. याबाबत विचारले असता पाटील यांनी राज ठाकरे यांना सध्या प्रसिद्धीची गरज असल्याने ते अशाप्रकारे बेफाम वक्तव्य करीत असल्याचे म्हटले. 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी सत्तांतरणाच्या अनुषंगाने फासे पलटण्याचे विधान केले होते. यावर फडणवीस यांना मी गांभीर्याने घेत असलो तरी त्यांच्या अशा विधानांना मात्र गांभीर्याने घेत नाही, असा टोला पाटील यांनी लगावला. 

जलयुक्त शिवार योजनेच्या कामांच्या चौकशीबाबत बोलताना पाटील म्हणाले की, कामे सुमार दर्जाची झाल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे चौकशी सुरू झाली. ही कामे दर्जेदार व्हावीत, या अपेक्षेने ही चौकशी होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

टाळेबंदीमुळे सामान्यांसह खासगी शिक्षण संस्थाही अडचणीत आल्या आहेत. दोघांचाही विचार करता शाळा शुल्क माफीबाबत मध्यमार्ग काढणे आवश्‍यक असल्याचे जससंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले. 

विधानसभा अध्यक्षपदाबाबत चर्चा करू 

कॉंग्रेसने प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपविल्याने नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, कॉंग्रेस हे तीनही पक्ष एकत्र चर्चा करून निर्णय घेतील, असे जयंत पाटील यांनी सांगितले. 

भाजप नेत्यांनी केंद्राला विचारावे 

यूपीए सरकारच्या काळात इंधनाचे दर थोडेही वाढले की भाजप नेते आंदोनलासाठी रस्त्यावर उतरत असत. आता भाजपचे सरकार असून, केंद्राने इंधनाचे दर वाढल्यास त्या टक्केवारीनुसार राज्यातील कराचे दरही वाढतात. त्यामुळे केंद्रानेच दर कमी करावेत. भाजपच्या नेत्यांनी आम्हाला शहाणपण शिकवण्याऐवजी केंद्र सरकाराला सांगावे, असा सल्लाही पाटील यांनी दिला. 

या वेळी आमदार अमोल मिटकरी, आमदार नितीन देशमुखही उपस्थित होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख