उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकरांना कोरोना - Usmanabad Collector Kaustubh Divegaonkar Found Corona Positive | Politics Marathi News - Sarkarnama

उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकरांना कोरोना

सरकारनामा ब्युरो
रविवार, 21 फेब्रुवारी 2021

जिल्हाधिकारी दिवेगावकर यांची प्रकृती स्थिर असून ते कोरोना झाल्यानंतर ही पूर्णपणे सुट्टी घेणार नसून शासकीय कामे रखडू नयेत यासाठी वर्क फ्रॉम होम म्हणजे घरातून काम करणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना अंगात ताप असल्याने डॉक्टरांनी कोरोना चाचणीचा सल्ला दिला होता त्यानुसार चाचणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आला आहे

उस्मानाबाद : जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर कोरोना पॉझिटिव्ह आले असून ते प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून घरी उपचार घेत आहेत. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी यांनी कोरोनाच्या कोवॅक्सिन लशीचा पहिला डोस या महिन्याच्या सुरुवातीला घेतलेला होती. संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी व काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. 

जिल्हाधिकारी दिवेगावकर यांची प्रकृती स्थिर असून ते कोरोना झाल्यानंतर ही पूर्णपणे सुट्टी घेणार नसून शासकीय कामे रखडू नयेत यासाठी वर्क फ्रॉम होम म्हणजे घरातून काम करणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना अंगात ताप असल्याने डॉक्टरांनी कोरोना चाचणीचा सल्ला दिला होता त्यानुसार चाचणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्राथमिक तपासणी व उपचाराची दिशा ठरवून दिल्यानंतर ते आता विलगिकरणात गेले आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रात सुरू असलेले मेळावे आणि लग्नसमारंभांतील गर्दी हाताबाहेर जात असल्याने लवकरच दररोज कोरोनाबाधित होणाऱ्यांची संख्या १० हजारांच्या आसपास पोहोचण्याची भीती निर्माण झाली आहे. संभाव्य रुग्णवाढ आटोक्‍यात ठेवण्यासाठी महाराष्ट्राच्या काही भागांत अंशत: लॉकडाऊन करण्याशिवाय कोणताही पर्याय राहिला नसल्याचे मत सरकारमधील काही उच्चपदस्थ व्यक्त करीत आहेत. 

गर्दीला सावरण्यासाठी लागू केलेले नियम प्रत्यक्षात आणले जात नसतील, तर रात्रीची संचारबंदी किंवा काही बाधित जिल्ह्यांमध्ये प्रवेशबंदीसारखे निर्णय प्रत्यक्षात आणावे लागतील काय, याची चर्चा सुरू झाली आहे. गेले ४२ दिवस नियंत्रणात असलेली करोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढते आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी रुग्णालयातील स्थितीचा आढावा घेणे आणि प्राणवायूच्या बेगमीकडे लक्ष देण्याचे काम सुरू झाले आहे. 

रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवता आली नाही, तर प्रकोप होईल काय, अशा भीतीने नागरिकांना पछाडले असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही महत्त्वाच्या तज्ज्ञांशी संपर्क साधला आहे. त्यांच्या सल्ल्यानुसार पुढील खबरदारी घेतली जाईल. आरोग्य खात्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होईल हे लक्षात घेत तयारी चालवली असतानाच संसर्गाचे प्रमाण मोठे असले तरी विषाणू जीवघेणा नाही, असा प्राथमिक निष्कर्ष काढला आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख