`दबंग` IPS अधिकारी शिवदीप लांडे `पब्लिक पोस्ट`ऐवजी दहशतवाद विरोधी पथकात - shivdip lande appointed as DIG in ATS Mumbai | Politics Marathi News - Sarkarnama

`दबंग` IPS अधिकारी शिवदीप लांडे `पब्लिक पोस्ट`ऐवजी दहशतवाद विरोधी पथकात

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

जनतेशी थेट संपर्क असलेल्या पदावर लांडे काम करतील, अशी त्यांच्या चाहत्यांची अपेक्षा होती.

पुणे : देशभरात प्रसिद्ध असेलले आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांना राज्य सरकारने दहशतवादविरोधी पथकात मुंबईत नेमणूक दिली आहे. या आधी अमलीपदार्थ विरोधी विभागाचे पोलिस उपमहानिरीक्षक म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी होती. 

मूळचे महाराष्ट्रातील अकोला येथील असलेले शिवदीप लांडे हे बिहार केडरचे 2006 च्या बॅचचे अधिकारी आहेत. महाराष्ट्रात ते प्रतिनियुक्तीवर आले आहेत. त्यांना महाराष्ट्रात जनतेशी थेट संपर्क असलेल्या पदांवर जसे पोलिस उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त किंवा छोट्या शहरांच्या आयुक्त पदावर नेमले जाईल, अशी चर्चा होती. मात्र त्यांना सुरवातीला अमलीपदार्थ विरोधी पथकात नेमण्यात आले. त्यांची काल तेथून बदली करण्यात आली असून दहशतवादविरोधी पथकात नियुक्ती करण्यात आली आहे. 

लांडे यांनी बिहारमध्ये आपल्या कार्यशैलीने खळबळ उडवली होती. त्यांची पहिली पोस्टिंग हे नक्षलवादाने ग्रस्त असलेल्या मुंगेर जिल्ह्यातील जमालपूर येथे झाली होती. त्यानंतर बिहारची राजधानी असलेल्या पाटणाच्या अधीक्षकपदी नेमणूक झाली. तेथे रोडरोमियो विरोधात त्यांनी कडक कारवाई केली. अशा चुकारांना त्यांनी रस्त्यावरच बेदम चोप दिला. लाच घेणाऱ्या पोलिसाला स्वतःच वेष बदलून पकडून दिले. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनीही त्यांना मोकळीक दिली होती. अशा अनेक बाबींमुळे ते देशभर प्रसिद्ध झाले होते. महाराष्ट्रातही अशा रीतीने त्यांना या पद्धतीने काम करता येईल, अशी त्यांच्या चाहत्यांची अपेक्षा होती. मात्र महाराष्ट्रात त्यांची पोस्टिंग जनतेशी थेट संपर्क असलेल्या पदांवर झाली नाही.

माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे जावई असलेले लांडे गेली तीन वर्षे महाराष्ट्रात आहे. आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांना साधारणपणे पाच वर्षांपर्यंत आपल्या मूळ राज्यात प्रतिनियुक्तीवर जाता येते. हा कालावधी आणखी एक वर्षानेही वाढवता येतो. 

अकोला जिल्ह्यातील परसा हे त्यांचे मूळ गाव आहे. खडतर परिस्थितीतून इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी केली. त्यानंतर त्यांची 2006 मध्ये आयपीएस म्हणून निवड झाली आणि त्यांना बिहार केडर मिळाले.  

राज्य सरकारने काल 22 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यात पुण्याचे पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम यांच्याजागी अमिताभ गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय पुणे ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकपदी अभिनव देशमुख यांची बदली झाली आहे. गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना कोल्हापूरला नेमण्यात आले आहे. याशिवाय मुंबई, पुणे, ठाणे या प्रमुख शहरांतील अधिकाऱ्यांच्या बदल्या प्रस्तावित आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख