प्रवीण परदेशींनी नवीन जबाबदारी न स्वीकारता पाठविला रजेचा अर्ज - prvaeen pardeshi applies for leave instead of taking new charge | Politics Marathi News - Sarkarnama

प्रवीण परदेशींनी नवीन जबाबदारी न स्वीकारता पाठविला रजेचा अर्ज

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 9 मे 2020

मुंबई पालिका आयुक्त पदावरून बदली केल्याने परदेशी नाराज झाले आहेत. 

मुबई : कोरोनाची मुंबईतील वाढत्या रुग्णांचे खापर फोडून तेथील पालिका आय़ुक्त पदावरून बदली करण्यात आलेले प्रवीणसिंह परदेशी यांनी आपल्या नव्या पदाचा कार्यभार न स्वीकारता रजेचा अर्ज पाठवून दिला आहे. परदेशी यांच्या जागी नगरविकास खात्याचे प्रधान सचिव इक्बाल चहल यांची कालच नियुक्ती करण्यात आली आहे. चहल हे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या जवळचे मानले जातात. 

अजोय मेहता आणि परदेशी यांच्यातील वादाची परिणती परदेशी यांच्या बदलीत झाली आहे. परदेशी यांची नियुक्ती नगरविकास विभागाच्या सचिवपदी करण्यात आली. मात्र तेथे रुजू न होता परदेशी यांनी रजेचा अर्ज पाठवून दिला. चहल यांनी शुक्रवारी रात्रीच आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यामुळे आजपासून मुंबईतील सारी सूत्रे त्यांच्याकडे आली आहेत.

परदेशी यांच्या बदलीवरून राजकारणही रंगले आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांनी आपली जबाबदारी झटकण्यासाठी आयुक्तांची बदली हा मार्ग नाही, अशी टीका केली. 

वाचा आधीची बातमी 

ठाण्याचे माजी आयुक्त संजीव जैयस्वाल यांची अतिरिक्त आयुक्त म्हणून मुंबई पालिकेत नियुक्ती देण्यात आली आहे. त्यांची ठाणे महापालिकेतून बदली झाल्यानंतर नेमणूक देण्यात आलेली नव्हती. मुंबईचे अतिरिक्त महापालिका आयुक्त आबासाहेब जराड यांच्याकडे मदत व पुनर्वसन खात्याच्या सचिवपदाचा भार देण्यात आला आहे. पुनर्वसन खात्याची सचिव किशोरराजे निंबाळकर यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे सचिव म्हणून बदली झाली आहे. बांधकाम खात्याच्या सचिवपदाची जबाबदारी अर्थसचिव मनोज सौनिक यांच्याकडेच होती. आता सौनिक हे तेवढेच खाते पाहतील.

कोरोनाच्या परिस्थितीवरून आयएएस लाॅबीमध्ये वाद असल्याची चर्चा होती. मुख्य सचिव अजोय मेहता आणि परदेशी यांच्यात फारसे सख्य नव्हते, असेही सांगण्यात आले.   प्रवीणसिंह परदेशी आणि मुख्य सचिवांमध्ये एका व्हिडीओ कॉन्सरन्समध्ये जोरदार जाहीर शाब्दीक युध्द झाले आणि ते परदेशींसोबत असणाऱ्यां मनपाच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी समोरच पाहिल्याचे सांगण्यात आले होते
जीव जैस्वाल यांच्यासह भूषण गगराणी, अश्विनी भिडे, विनीता सिंघल, राजीव जलोटा, नंदकुमार, अतुल पाटणे हे अधिकारी गेल्या दोन ते तीन महिन्यापासून विना पोस्टींग आहेत. त्यातील जैस्वाल यांना आज जबाबदारी मिळाली. काही आयपीएस अधिकारीही सध्या रिकामे आहेत. २६/११ च्या घटनेत स्वत:चा जीव धोक्यात घालणारे आयपीएस अधिकारी सदानंद दाते दोन महिन्यापासून पोस्टिंगच्या प्रतीक्षेत आहेत. ऊर्जामंत्री नितीन राऊत, दुग्ध विकास मंत्री सुनील केदार, मदत पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि स्वत: विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे काही दिवसापूर्वी मुंबईत येऊन मुख्यमंत्र्यांकडे मुख्य सचिवांबद्दल तक्रारी केल्या होत्या.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख