अन्वय नाईक आत्महत्या : तपास अधिकाऱ्यास निलंबित करण्याची शिफारस - Konkan Deputy IG recommends suspension of Anvay Naik Suicide Case IO | Politics Marathi News - Sarkarnama

अन्वय नाईक आत्महत्या : तपास अधिकाऱ्यास निलंबित करण्याची शिफारस

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 11 नोव्हेंबर 2020

अलिबाग येथे आर्किटेक्ट अन्वय नाईक यांनी व त्यांच्या आईने केलेल्या आत्महत्या प्रकरणात तपासात कसूर केल्याप्रकरणी अलिबाग पोलिस ठाण्याचे तत्कालिन पोलिस निरिक्षक एच. एस वराडे यांना निलंबित करण्याची शिफारस कोकण परिक्षेत्राचे पोलिस उप महानिरिक्षक संजय मोहिते यांनी मीरा-भाईंदरच्या पोलिस आयुक्तांना पत्राद्वारे केली आहे. 

मुंबई : अलिबाग येथे आर्किटेक्ट अन्वय नाईक यांनी व त्यांच्या आईने केलेल्या आत्महत्या प्रकरणात तपासात कसूर केल्याप्रकरणी अलिबाग पोलिस ठाण्याचे तत्कालिन पोलिस निरिक्षक एच. एस वराडे यांना निलंबित करण्याची शिफारस कोकण परिक्षेत्राचे पोलिस उप महानिरिक्षक संजय मोहिते यांनी मीरा-भाईंदरच्या पोलिस आयुक्तांना पत्राद्वारे केली आहे. 

वराडे १७ जून २०१५ ते ११ जानेवारी २०२० या कालावधीत रायगड जिल्ह्यात नेमणुकीस असताना अलिबाग पोलिस स्टेशनला कार्यरत होते. याच काळात ५ मे २०१८ रोजी अन्वय मधुकर नाईक व त्यांच्या मातुश्री कुमुद मधुकर नाईक यांनी आत्महत्या केली. अन्वय नाईक यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी व अन्य दोघे आपल्या मृत्यूस जबाबदार असल्याचे लिहिले होते. हे प्रकरण वराडे यांनी नंतर दप्तरी दाखल केले. 

अन्वय नाईक यांची पत्नी व मुलीने जून महिन्यात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन तक्रार केल्यानंतर देशमुख यांनी या प्रकरणात सीआयडी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर अर्णब गोस्वामी व अन्य दोघांना अटक करण्यात आली. अर्णब गोस्वामी न्यायालयीन कोठडीत आहेत. सुरुवातीला त्यांना अलिबाग पोलिस ठाण्याजवळील तात्पुरत्या कारागृहात ठेवण्यात आले होते. मात्र, तेथे त्यांनी मोबाईल वापरल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना तळोजा कारागृहात हलवण्यात आले आहे.

वराडे हे सध्या मीरा-भाईंदर पोलिस आयुक्तालयाच्या अंतर्गत असलेल्या विरार पोलिस स्टेशनला कार्यरत आहेत. त्यांच्या विरोधात रायगड पोलिस अधिक्षकांनी कसुरी अहवाल ठेऊन चौकशी सुरु केली आहे. या काळात ते पदावर राहणे योग्य नसल्याने त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी शिफारस कोकण परिक्षेत्राच्या उप-महानिरिक्षकांनी मीरा-भाईंदरच्या पोलिस आयुक्तांना केली आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख