`एनडीआरएफ` जवानाचा पाय वाचविण्यासाठी रायगडच्या पोलिसांची शिकस्त! - green corridor by raigad police to save leg of NDRF jawan | Politics Marathi News - Sarkarnama

`एनडीआरएफ` जवानाचा पाय वाचविण्यासाठी रायगडच्या पोलिसांची शिकस्त!

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 6 जून 2020

एनडीआरएफचे जवान हे नेहमीच इतरांच्या मदतीसाठी धावून जातात. त्यांच्यावर संकट आल्यानंतर पोलिसांनीही वेगाने प्रतिसाद दिला...

पुणे : निसर्ग चक्रिवादळामुळे रायगड जिल्ह्यात मोठे नुकसान झाले. येथे मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथके तैनात करण्यात आली होती. हे काम करत असताना अपघात होऊन या पथकातील एक जवान इंद्रजितसिंह चौहान यांच्या उजव्या पायाची दोन बोटे मुळापासून तुटली. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने `ग्रीन काॅरीडाॅर`द्वारे चौहान यांना तातडीने मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात हलविणे गरजेचे होते. रायगड, नवी मुंबई आणि मुंबई पोलिसांनी तातडीने कार्यवाही करून 207 किलोमीटरचे अंतर दोन तास चाळीस मिनिटांत पूर्ण करून चौहान यांना रुग्णालयात सुरक्षितपणे पोहोचविले.

श्रीवर्धन येथे हे पथक काम करत होते. चौहान हे झाड कापत असताना कटरने त्यांच्या उजव्या पायाची दोन बोटे  मुळापासू कापली गेली. त्यांना तातडीने श्रीवर्धन येथील रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे रक्तस्त्राव थांबविण्यात आला. त्यांचा पायाचा तुटलेला भाग आइस बाॅक्समध्ये ठेवून त्यांना तातडीने मुंबईत हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. तेथील ब्रीच कॅंडी रुग्णालयात आॅर्थोपेडिक, व्हॅस्कुलर आणि प्लास्टिक सर्जरी करणाऱ्या डाॅक्टरांची टीम तयार ठेवली होती. रायगडचे पोलिस अधीक्षक अनिल पारसकर यांच्या टिमसह नवी मुंबई आणि मुंबई पोलिसांनीही त्यासाठी रस्ते मोकळे केले. पोलिसांनी एनडीआरएफच्या जवानांसाठी केलेल्या या धडपडीचे सर्वत्र कौतुक होत आहे. सहायक पोलिस निरीक्षक शेवाळे यांनी कंट्रोल रुममधून वाहतुकीचे नियोजनाची व्यवस्था पाहिली तर पीएसआय वाघ हे पायलट कारमध्ये होते. 

रायगड  पोलिसांना माहिती कळवा!

रायगड जिल्हा पोलिस दलातर्फे #ConnectingPeople ही सुविधा सुरू करण्यात येत असून, चक्रीवादळ प्रभावित क्षेत्रामध्ये आपले कुटुंबियांची माहिती जाणुन घेण्यासाठी आम्हास टॅग करा.  आपल्या कुटुंबातील प्रमुख व्यक्तिचे नाव व घरचा पूर्ण पत्ता कळवावा, असे आवाहन अधीक्षक पारसकर यांनी केले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख