साधे नगरसेवकही नसलेल्या मनसैनिकांच्या शिवसेना प्रवेशासाठी खुद्द उद्धव ठाकरे हजर - uddhav thackeray welcomes mns party workers from Dombiwali | Politics Marathi News - Sarkarnama

साधे नगरसेवकही नसलेल्या मनसैनिकांच्या शिवसेना प्रवेशासाठी खुद्द उद्धव ठाकरे हजर

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021

मनसेतून होणारे इनकमिंग किती महत्वाचे आहे, याचा संदेश उद्धव ठाकरे यांनी दिला.. 

डोंबिवली :  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून शिवसेनेतील इनकमिंग वाढतच आहे. मनसेचा बालेकिल्ला असलेल्या डोंबिवलीत मनसेला मोठे खिंडार पडले आहे. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष तसेच डोंबिवलीचे शहराध्यक्ष राजेश कदम यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या प्रवेशाला महत्व दिले. कोणत्याही पदावर नसलेल्या मनसैनिकांना त्यांनी स्वतः गंडाबंधन केले. डोंबिवलीत शिवसेनेचे ताकद आहे पण तरीही तरुण रक्ताला वाव दिला जाईल, असे सांगत त्यांनी नव्याने प्रवेश करणारांनाही आश्वस्त केले. 

कल्याण- डोंबविली महापालिकेची गेली निवडणूक शिवसेना आणि भाजप यांच्यातील वादामुळे गाजली होती. तरीही शिवसेनेने भाजपपेक्षा काही जास्त जागा जिंकून येथे सत्ता मिळवली. मनसेने येथे आठ-नऊ जागांवर विजय मिळवत आपले अस्तित्व राखले होते. विधानसभेच्या निवडणुकीत राज्यातील मनसेचा एकमेव आमदार याच भागातून निवडून आला होता. आमदार राजू पाटील यांनी येथे मनसेचे इंजिन रोवले. मात्र त्यांच्यात मतदारसंघातील मनसैनिकांना आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. वर्षा या शासकीय निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला. 

मात्र महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर ठाणे, कल्याण-डोंबिवली, वसई विरार, भिवंडी या पट्ट्यात शिवसेनेला आपला विस्तार करायचा आहे. त्यासाठीची तयारी तेथील नेते आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्यातूनच आज डोंबविलीत मनसेला धक्का देण्यात आला. कदम हे मनसेच्या स्थापनेपासूनचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. तसेच राज ठाकरेंसोबत विद्यार्थी सेनेपासून कार्यरत असल्याने त्यांचे शिवसेनेत जाणे हे धक्कादायक मानले जात आहे. डोंबवलीतील शहराध्यक्ष, मनसेच्या विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी यांचेही ठाकरे यांनी स्वागत केले.

या वेळी पत्रकारांनी ठाकरे यांना आज सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाविषयी प्रतिक्रिया विचारली. अर्थसंकल्पावर अवधी देऊन बोेलेन पण हा अर्थसंकल्प निवडणुकीसाठी नसावा, असा टोला त्यांनी मारला. विधानसभा निवडणूक होऊ घातलेल्य काही राज्यांसाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद केल्याबद्दल त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. 

प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांची नावे पुढीलप्रमाणे

1)राजेश शांताराम कदम 
मनसे प्रदेश उपाध्यक्ष तथा डोंबिवली   शहर अध्यक्ष. माजी परिवहन सभापती

२)सागर रवींद्र जेधे 
मनविसे डोंबिवली शहर अध्यक्ष 

३)दीपक शांताराम भोसले 
डोंबिवली शहर संघटक, माजी परिवहन समिती सदस्य 

४) राहुल गणपुले 
प्रदेश उपाध्यक्ष, जनहित कक्ष 

५) कौस्तुभ फकडे 
मनविसे डोंबिवली शहर सचिव  

६) सचिन कस्तुर
मनविसे शहर संघटक

७) स्वप्नील वाणी 
मनसे शाखा अध्यक्ष

८) निखिल साळुंखे 
मनसे उपशाखा अध्यक्ष

९) कुणाल मोर्ये 
मनविसे शाखा अध्यक्ष

१०) महेश कदम

११) राजेश मुणगेकर 
शहर संघटक

१२) प्रथमेश खरात
मनसे विभाग सचिव

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख