ईडीच्या कारवाईबाबत आमदार प्रताप सरनाईक म्हणतात...

या छापा सत्रप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याबाबत विचार सुरू आहे.
MLA Pratap Saranaik says about the action of ED
MLA Pratap Saranaik says about the action of ED

मुंबई : सक्तवसुली संचानलयाने (ईडी) सकाळी घरावर छापेमारी केल्यानंतर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सायंकाळी पाच सुमारास माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ईडीने आमच्यावर छापे का टाकले हे मलाच माहीत नाही. मी या कारवाईबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी प्रतिक्रिया ईडीच्या कारवाईनंतर सरनाईक यांनी माध्यमांना दिली. 

आमदार सरनाईक यांच्या मुंबई तसेच ठाणे येथील कार्यालय आणि घरी ईडीने आज सकाळी छापा टाकत कारवाई केली होती. दहा ठिकाणी छापा टाकून कारवाई केल्यानंतर सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीचं पथक पोचलं होतं. त्यानंतर ईडीच्या विहंग सरनाईक यांना ताब्यात घेतले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने एकूण 10 ठिकाणी छापे टाकले आहेत. त्यात प्रताप सरनाईक यांचं घर, मुलांचं घर, ऑफिस ही ठिकाणे असल्याचे समजते. परदेशात पैसे पाठवल्याप्रकरणी ही छापेमारी करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. 

दरम्यान, या कारवाईनंतर सायंकाळी माध्यमांशी बोलताना आमदार सरनाईक यांनी सांगितले की, ईडीने आमच्यावर का छापे टाकले आहेत, हे मलाही माहीत नाही. या छापासत्रप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याबाबत विचार सुरू आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले. 

दरम्यान, या धाडसत्रामुळे शिवसेनेचे नेते प्रचंड संतापले असून त्यांनी भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवर टीका करायला सुरुवात केली आहे. सरनाईक हे अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात आक्रमक होते. रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्याची नोटीसही सरनाईक यांनीच दिली होती. 

कोण काय म्हणाले? 

शरद पवार : लोकांच्या प्रश्नाची उत्तरं देण्याऐवजी राजकीय विरोधकांच्या विरोधात सरकारी तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे. महाराष्ट्रात पुन्हा सत्ता मिळत नाही, या रागातून ईडीची कारवाई करण्यात आली आहे. हा सत्तेचा गैरवापर आहे 

संजय राऊत : ईडी असो की आणखी कुणी, आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही. कितीही प्रयत्न केले तरी राज्यातील महाविकास आघाडी सरकार व या सरकारमधील नेते कुणाला शरण जाणार नाहीत. हे सरकार पुढील चार वर्षे आणि त्यापुढेही पंचवीस वर्ष कायम राहील. ईडीने ज्यांच्या सांगण्यावरून ही कारवाई केली आहे, ज्यांच्या आदेशाचे पालन ही मंडळी करत आहेत, त्यांच्या शंभर जणांची यादी मी पाठवतो. मनी लॉन्ड्रींग, काळे धंदे, उद्योग त्याचे कसे चालतात, निवडणुकीत पाण्यासारखा पैसा कसा येतो, कोण पाठवतो, याची माहिती जर ईडीला नसेल पण आमच्याकडे आहे. 

देवेंद्र फडणवीस : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापे टाकल्यानंतर आगपाखड करून आपल्याकडे भाजपच्या शंभर जणांची यादी असल्याचा कांगावा करणाऱ्या खासदार संजय राऊत यांनी ती यादी सक्त वसुली संचालनालयाकडे द्यावी. मी स्वत: कारवाई करायला भाग पाडेन. ज्यांची कोणतीही चूक नाही. त्यांनी कोणत्याही चौकशीला घाबरण्याचे कारण नाही. वस्तुस्थितीपासून दूर पळण्यासाठी या विषयावरून खासदार राऊत यांनी कांगावा करू नये. 

नारायण राणे : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे साधू, संत नाहीत. कायदेशीर गोष्टींची चौकशी पूर्ण होईपर्यंत प्रतिक्रिया द्यायची नसते. ईडीची ही कारवाई योग्य की अयोग्य हे सांगा, मग त्यावर बोलतो. 

छगन भुजबळ : विरोधी पक्षातील एखादा नेता, जो व्यक्ती केंद्र सरकारच्या विरोधात बोलेल त्याला ईडीची भीती दाखवली जात आहे. मी बोललो म्हणून माझ्यावर केसेस दाखल केल्या. पवार साहेब निवडणुकीच्या काळात बोलले, तर त्यांनाही नोटीस पाठवली आहे. प्रताप सरनाईक हे सातत्याने कंगना आणि अर्णब प्रकरणात महाराष्ट्राच्या बाजूने बोलत होते; म्हणूनच त्यांच्यावर ईडीकडून छापा टाकला गेला आहे. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com