पवार-शहा भेटीवर जितेंद्र आव्हाड म्हणतात, '...ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ' 

भेटीबाबत संदिग्ध उत्तर दिल्याने गोंधळ आणखी वाढला आहे.
Jitendra Awhad's explanation on the meeting between Sharad Pawar and Amit Shah
Jitendra Awhad's explanation on the meeting between Sharad Pawar and Amit Shah

मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कथित भेटीचे कवित्व काही केल्या संपायला तयार नाही. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून या विषयांवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून या भेटीचा इन्कार करण्यात येत आहे. मात्र, भारतीय जनता पक्षाकडून सस्पेन्स वाढविणारी वक्तव्ये होत आहेत. याबाबत आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली असून पवारसाहेब आणि अमित शहा यांची भेट झाली नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

शरद पवार, खासदार प्रफुल्ल पटेल यांनी अहमादबादमध्ये केंद्रीय गृहमंत्री शहा यांची भेट घेतल्याचे वृत्त एका गुजराती दैनिकाने दिले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत शहा यांना विचारले असता त्यांनी "प्रत्येक भेटीतील चर्चा सार्वजनिक करता येत नाही,' असे सांगून भेटीबाबत संदिग्ध उत्तर दिल्याने गोंधळ आणखी वाढला आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी मात्र ही भेट झाली नसल्याचे म्हटले होते. या कथित भेटीच्या वृत्ताने राज्यात मात्र एकच वादळ उठले आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांच्याही याबाबत प्रतिक्रिया येत आहेत. 

याच भेटीवर जितेंद्र आव्हाड यांनी ट्‌विटच्या माध्यमातून भाष्य केले आहे. त्यांनी ट्‌विटमध्ये म्हटले आहे, की पवारसाहेब - अमित शहा भेट झाली नाही. ही काळ्या दगडावराची पांढरी रेघ आहे. तरीदेखील आमचे काही पत्रकार मंडळी रंग उधळत आहेत. माझ्या सर्व पत्रकार बांधवांना होळीच्या शुभेच्छा! बुरा ना मानो होली है. 

कोण काय म्हणाले? 

प्रत्येक भेटीमधील चर्चा सार्वजनिक करता येत नाही -अमित शहा  

शरद पवार-अमित शहा यांची भेट झाली नाही. भेटीची अफवा पसरवून संभ्रम निर्माण करण्यात आला आहे. ज्या बातम्या पसरविण्यात आल्या आहेत, त्या खोट्या आहेत. अशी कोणतीही भेट झालेली नाही आणि भेटण्याचा उद्देश किंवा कारण असू शकत नाही  - नवाब मलिक 

महाराष्ट्रातील ठाकरे-पवार सरकारचे शरद पवार हे निर्माते आहेत. त्यामुळे असल्या भेटीच्या बातम्यांमध्ये कुठलेही तथ्य नाही. ठाकरे-पवार सरकार स्थिर आहे, त्याला कोणताही धोका नाही - प्रफुल्ल पटेल 

पवारसाहेब-अमित शहा भेट झाली नाही. ही काळ्या दगडावराची पांढरी रेघ आहे. तरीदेखील आमचे काही पत्रकार मंडळी रंग उधळत आहेत. माझ्या सर्व पत्रकार बांधवांना होळीच्या शुभेच्छा! बुरा ना मानो होली है - जितेंद्र आव्हाड 

मी ठामपणे सांगतो, अशी गुप्त भेट वगैरे अजिबात झालेली नाही. आता तरी रहस्यकथेचा शेवट करा. अफवांची धुळवड थांबवा. हाती काहीच लागणार नाही  - संजय राऊत 

शरद पवार साहेब जर अमित शहा साहेबांना भेटले, तर त्यात नवल वाटायचं कारण नाही. कारण, शरद पवार साहेब कधी कोणाला भेटतील याचा नेम नसतो - नीलेश राणे 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com