नितीन गडकरी भाऊ असल्याचे सांगून फसवणाऱ्या बाप-लेकांना अटक - Father and son arrested for cheating using Nitin Gadkari's name | Politics Marathi News - Sarkarnama

नितीन गडकरी भाऊ असल्याचे सांगून फसवणाऱ्या बाप-लेकांना अटक

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 10 जून 2021

आनंद गडकरी हे त्यांच्या दोन वर्षांच्या मुलाला डोस देण्यासाठी घेऊन जातो, असे सांगून घराबाहेर पडले होते.

डोंबिवली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी माझे भाऊ असल्याची बतावणी करून डोंबिवलीतील गडकरी पिता-पुत्राने एकाची पाच लाख रुपयांची फसवणूक केली होती. या प्रकरणी बंगळूर येथून दोघांना अटक करण्यात आली आहे. त्‍यांना १४ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे, अशी माहिती विष्णूनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय साबळे यांनी दिली. (Father and son arrested for cheating using Nitin Gadkari's name)
 
डोंबिवलीतील राजन गडकरी यांनी अमोल पळसमकर यांना नितीन गडकरी हे माझे भाऊ असून प्राप्तीकर विभागात पकडलेले सोने कमी किमतीत मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवले. त्‍यानंतर राजन गडकरी व त्यांचा मुलगा आनंद गडकरी यांनी अमोल पळसमकर यांची पाच लाख रुपयांची फसवणूक केली होती. 

हेही वाचा  ः काँग्रेसच्या उपनगराध्यक्षांची आवताडेंशी जवळीक वाढली; आणखी नगरसेवक गळाला लागणार?

या प्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मोबाईल लोकेशनच्या आधारे सहायक पोलिस निरीक्षक महेश जाधव यांच्या पथकाने बुधवारी (ता. ९ जून) पिता-पुत्रांना बंगळूर येथून अटक केली आहे. कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात त्या दोघांना हजर केले असता न्यायालयाने त्यांना १४ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

आईला तिचे बाळ मिळाले

आनंद गडकरी हे त्यांच्या दोन वर्षांच्या मुलाला डोस देण्यासाठी घेऊन जातो, असे सांगून घराबाहेर पडले होते. त्यांच्यासोबत वडील राजन व आई अलका गडकरी याही होत्या. ता. २५ मे रोजी सकाळी ते गेले ते परत आलेच नाहीत. त्‍यामुळे सून गीतांजली गडकरी हिने विष्णूनगर पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यांचे बाळही त्यांच्यापासून दुरावले होते. अखेर पोलिसांनी गडकरी कुटुंबाचा शोध घेतला, त्यामुळे आईला तिचे बाळ मिळाले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख