ते आले, त्यांनी पाहिले आणि ते गेले  ः दादा भुसेंच्या दौऱ्यावर आमदारांची टीका 

पालकमंत्र्यांनी ‘वातानुकूलित' बैठकीतून काय साध्य केले?
Criticism from local MLAs on Guardian Minister Dada Bhuse's visit to Palghar
Criticism from local MLAs on Guardian Minister Dada Bhuse's visit to Palghar

विरार : वसई विरार आणि पालघर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री मात्र या सर्वापासून कोसो दूर होते. एका बाजूला कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. दुसऱ्या बाजूला रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता असताना ऑक्सिजन टँकर पाठविले जात आहेत. या सर्व पार्श्ववभूमीवर पालकमंत्री मात्र त्यांच्या मतदार संघात बसून होते. वृत्तपत्रातून टीका होऊ लागल्यावर पालकमंत्री काही तासांसाठी वसई विरारला भेट देतात आणि येथील परिस्थितीचा आढावा घेतात, हे म्हणजे ते आले, त्यांनी पाहिले आणि ते गेले, असेच म्हणावे लागेल, अशा शब्दांत पालघरचे पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर स्थानिक आमदारांनी टीकेची झोड उठवली जात आहे. 
      
ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हर इंजक्शन अभावी गेल्या पंधरा दिवसांत जवळपास २५० लोकांचा मृत्यू झाल्यानंतर पालकमंत्री भुसे यांनी पालघरचा केलेला दौरा म्हणजे ‘वराती मागून घोडे’ आणि उपलब्धीशून्य ठरल्याने त्यांच्यावर सर्वत्र टीका होत आहे. त्यातच वसईतील स्थानिक आमदारांना भुसे यांच्या विरार येथील बैठकीस बोलविले नसल्याची बाब समोर आली आहे.  

वसई  बोईसरचे आमदार राजेश पाटील यांनी आपणास पालकमंत्री बैठकीचे निमंत्रण नव्हते, असे सांगितले. तर याबाबत आमदार हितेंद्र ठाकूर यांना विचारले असता ते म्हणाले की, ‘पालकमंत्री भुसे यांच्या बैठकीची दुपारी 3 ची वेळ देण्यात आली होती. परंतु मंत्री त्या आधीच 12 वाजता येऊन गेले होते’, असे त्यांनी सांगितले. वसई विरारचे माजी महापौर प्रवीण शेट्टी यांना आधी बैठकीची वेळ दुपारी 3 वाजताची देण्यात आली. परंतु त्यांना सकाळी 11.30 वाजता अचानकपणे दुपारी 12 वाजताच बैठकीला या म्हणून निरोप देण्यात आला. त्यामुळे प्रश्न मांडायची इच्छा असूनही आपण जाऊ शकलो नसल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

नियोजित वेळेच्या काही काळ विलंबाने होणाऱ्या बैठकी वा दौरे समजण्यासारखे असू शकतात. पण केवळ स्वतःची सोय साधून नियोजित वेळेच्या आधीच बैठक उरकणे अनाकलनीय असल्याचे अनेक पक्ष पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 

वसई विरारसह पालघर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची परिस्थिती भयावह आहे. सामान्य रुग्णांना बेड आणि गंभीर रूग्णांना ऑक्सिजन बेड, तथा व्हेंटिलेटर बेड मिळेनासे झाले आहेत. रुग्ण उपचारासाठी तडफडत असून नातेवाईकांची सुविधा आणि औषधोपचारासाठी फरफट सुरू आहे. आम्ही दिवसरात्र बाहेर पडून जनतेच्या मदतीसाठी फिरतो आहोत. त्यांचे हाल बघवत नाहीत.

येथील जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासनास कोविड उपाय योजना करण्यात अपयश आले आहे. प्रदीर्घ काळ जिल्ह्याचा विसर पडलेल्या पालकमंत्र्यांनी ‘वातानुकूलित' बैठकीतून काय साध्य केले? जिल्हावासीयांना कमतरता असलेल्या रेमडेसिव्हिर इंजेक्शन किंवा पुरेशा ऑक्सिजन उपलब्धतेसाठी येऊन कोणते दिवे लावले? असा प्रश्न बोईसरचे आमदार राजेश पाटील यांनी विचारला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com