बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या आधीच भाजपकडून लोकार्पण 

येत्या सोमवारी (ता. 21 सप्टेंबर) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या उड्डाणपुलाचे ऑनलाइन लोकार्पण करणार होते.
BJP inaugurates Balasaheb Thackeray flyover before the Chief Minister
BJP inaugurates Balasaheb Thackeray flyover before the Chief Minister

भिवंडी : भिवंडी शहरातील कल्याण नाका ते साईबाबा या रस्त्यावरील दुहेरी मार्ग असलेल्या (स्व.) बाळासाहेब ठाकरे हा उड्डाणपूल पूर्ण होऊन दोन महिने झाले. तरीही एमएमआरडीएकडून तो वाहतुकीसाठी खुला केला जात नव्हता. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीची भावना होती. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या उड्डाणपुलाचे उद्‌घाटन व्हावे, अशी मागणी शहराच्या महापौर प्रतिभा पाटील यांनी केली होती. त्यानुसार येत्या सोमवारी (ता. 21 सप्टेंबर) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या उड्डाणपुलाचे ऑनलाइन लोकार्पण करणार होते. मात्र, भिवंडी पश्‍चिम विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार महेश चौघुले व शहराध्यक्ष संतोष शेट्टी यांनी शनिवारीच या उड्डाणपुलाचे उद्‌घाटन केले. त्यानंतर वाहनांना हिरवा झेंडा दाखवित हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. 

या वेळी नगरसेवक सुमीत पाटील, महेंद्र गायकवाड, भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा ममता परमानी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उड्डाणपुलाच्या श्रेयवादाच्या लढाईत शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये चांगलीच जुंपली आहे. 

शहरातील कल्याण रोड महामार्गावरील उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी खासदार कपिल पाटील, भाजप आमदार महेश चौघुले यांनी पुढाकार घेतला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उड्डाणपुलास मंजुरी देऊन भूमिपूजन केले होते. असे असताना स्थानिक आमदारांना डावलून एमएमआरडीए या पुलाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने करणार होते.

मुख्यमंत्री ठाकरे यांना दीड महिन्यापासून उड्डाणपुलाच्या उदघाटनासाठी वेळ मिळाला नाही, त्यामुळे येथील नागरीकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत होता. उड्डाणपुलाचे लोकार्पण भिवंडीकर जनतेसाठी केले असून शिवसेना सरकार जाणून बुजून नागरिकांना वेठीस धरत आहे, असा आरोप आमदार महेश चौघुले यांनी या वेळी केला. 

दरम्यान, हा उड्डाणपूल सुरुवातीपासूनच शिवसेना भाजपच्या श्रेयवादाने वादग्रस्त ठरला आहे. सुरुवातीला भूमिपूजन सोहळ्यावर शिवसेनेने बहिष्कार टाकला होता. सन 2019 मधील विधानसभा निवडणुकीनंतर समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख व शिवसेनेचे माजी आमदार रूपेश म्हात्रे यांनी या उड्डाणपुलावरील एक मार्गिकेचे उद्‌घाटन केले होते. 

त्यानंतर शिवसेनेचे माजी आमदार रुपेश म्हात्रे यांनी या उड्डाणपुलाचे लोकार्पण करून श्रेय घेतले. त्यामुळे भाजप आमदार महेश चौघुले तीव्र नाराज होते. त्यानंतर आता उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर भाजपचे आमदार महेश चौघुले यांनी शनिवारी या उड्डाणपुलाचे लोकार्पण करून श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com