भाजपला जोरदार चपराक : विरोधी पक्षनेत्याबरोबच सभागृह नेतेपदही काढून घेतले  - In Bhiwandi, BJP corporator was removed from the post of House Leader | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

इंदापूरला उजनीतून पाणी देण्याचा निर्णय रद्द : जयंत पाटील यांची घोषणा
मंत्रीमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीसाठी महाविकास आघाडीतील प्रमुख नेते सह्याद्रीवर दाखल. एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि मुख्य सचिव सिताराम कुंटे हेही उपस्थित आहेत.
मराठा आरक्षणासाठीची भाजपची महत्वाची बैठक आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी होत आहे. यासाठी रविंद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, गिरीश बापट, प्रवीण दरेकर उपस्थित आहेत.

भाजपला जोरदार चपराक : विरोधी पक्षनेत्याबरोबच सभागृह नेतेपदही काढून घेतले 

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 17 मार्च 2021

अवघे चार नगरसेवक असलेल्या आरपीआय इंदिसे गटाकडे महापौरांनी सभागृह नेतेपद सोपविल्याने महापालिकेतील प्रस्थापित भाजप, शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांच्या नगरसेवकांमध्ये खळबळ उडाली आहे. 

भिवंडी : भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात असलेले भिवंडी महापालिकेचे सभागृह नेतेपद महापौर प्रतिभा पाटील यांनी काढून घेत आरपीआय इंदिसे गटाचे नगरसेवक विकास निकम यांच्याकडे सोपवले आहे. महापौर पाटील यांनी मंगळवारी (ता. 16 मार्च) झालेल्या विशेष अर्थसंकल्पीय ऑनलाइन महासभेत निकम यांची सभागृह नेतेपदी नियुक्ती केली आहे. ते उद्या (गुरुवारी, ता. 18 मार्च) सभागृह नेतेपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. 

अवघे चार नगरसेवक असलेल्या कोणार्क विकास आघाडीकडे महापौरपद आले आहे. त्यानंतर आता अवघे चार नगरसेवक असलेल्या आरपीआय इंदिसे गटाकडे महापौरांनी सभागृह नेतेपद सोपविल्याने महापालिकेतील प्रस्थापित भाजप, शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांच्या नगरसेवकांमध्ये खळबळ उडाली आहे. 

भिवंडी महापालिकेत कॉंग्रेसची 47 नगरसेवक असल्याने एकहाती सत्ता होती. मात्र, कॉंग्रेस पक्षाच्या 18 नगरसेवकांनी पक्षाला रामराम करीत महापौरपदाच्या निवडणुकीत कोणार्क विकास आघाडीस पाठिंबा दिला होता. त्यामुळे कॉंग्रेसचे नगरसेवक इमरान खान यांना उपमहापौरपद देऊन कोणार्क विकास आघाडीने कॉंग्रेस पक्षासोबत आपले संबंध कायम ठेवले आहेत. 

असे असताना भिवंडीतील कॉंग्रेस पक्षात आता मोठ्या प्रमाणात गटबाजी उफाळली आहे. येथे पक्षाची मोठी वाताहत झाली आहे, त्यामुळे राजकीय वातावरण तापलेले आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वी कॉंग्रेसच्या 18 नगरसेवकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केल्यामुळे आणखी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. महापालिकेत भाजपच्या असलेल्या 20 नगरसेवकांनी महापौर निवडणुकीत अवघ्या चार नगरसेवक असलेल्या कोणार्क विकास आघाडीला पाठिंबा दिला होता. त्यानंतर कॉंग्रेस पक्षाला शह देण्यासाठी भाजपला सभागृह नेते आणि विरोधी पक्षनेते पद दिले होते. 

पण, महापौर प्रतिभा पाटील यांनी भाजपकडे असलेले विरोधी पक्षनेतेपद प्रथम काढून घेतले. त्यानंतर बुधवारच्या सभेत सभागृह नेते पदावरही भाजपला पाणी सोडावे लागले. आता सभागृह नेतेपदी आरपीआय इंदिसे गटाचे प्रदेश सरचिटणीस, नगरसेवक विकास निकम यांची वर्णी लावण्यात आली आहे. त्यामुळे भाजपला जोरदार चपराक बसली आहे. विशेष म्हणजे चार नगरसेवक असलेल्या कोणार्क विकास आघाडीकडे महापौरपद, तर चार नगरसेवक असलेल्या आरपीआय इंदिसे गटाकडे सभागृह नेतेपद सोपविल्याने आरपीआय इंदिसे गटात उत्साहाचे वातावरण आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख