बॅ. अंतुले यांनी पाहिलेली स्वप्ने पूर्ण केली जातील : शरद पवार  - A.R. Antule's dream will come true: Sharad Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

बॅ. अंतुले यांनी पाहिलेली स्वप्ने पूर्ण केली जातील : शरद पवार 

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 21 फेब्रुवारी 2021

त्यांनी कोकणच्या विकासासाठी अनेक योजना आखल्या होत्या, त्या पूर्ण करण्याची जबाबदारी आमच्यावर असल्याचेही त्यांनी सांगितले.

अलिबाग : "सागरी महामार्ग व्हावा, हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांचे स्वप्न होते. त्यामुळे या मार्गाला बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचे नाव उचित ठरेल. एका सामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या बॅ. अंतुले यांनी कोकणच्या विकासाची खूप मोठी स्वप्ने पाहिली होती, त्यांची अपूर्ण राहिलेली कामे पूर्णत्वास नेली जातील,'' अशी ग्वाही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोकणवासीयांना दिली. 

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांनी सुरू केलेल्या वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या बॅ. ए. आर. अंतुले विज्ञान शाखेचे उद्‌घाटन ज्येष्ठ नेते पवार यांच्या हस्ते रविवारी (ता. 21 फेब्रुवारी) पार पडले. याच वेळी म्हसळा येथील पंचायत समितीच्या नव्या वास्तूचे "बॅ. ए. आर. अंतुले भवन' असे नामकरण करण्यात आले. 

या वेळी शरद पवार यांनी आपल्या भाषणात बॅ. अंतुले यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी कोकणच्या विकासासाठी अनेक योजना आखल्या होत्या, त्या पूर्ण करण्याची जबाबदारी आमच्यावर असल्याचेही त्यांनी सांगितले. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, बॅ. अंतुले यांची कन्या नीलम अंतुले आदी या वेळी उपस्थित होते. 

दिघीजवळ लवकर कागदाची सर्वात मोठी कंपनी 

भविष्यात रायगड आणि ठाण्यात मोठ्या बंदराची मागणी होत आहे, त्याला लवकरच मान्यता मिळेल. त्याला राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल. दिघी बंदराजवळ लवकरच कागदाची सर्वात मोठी कंपनी येईल. यामध्ये पाच हजार कोटीची गुंतवणूक होणार असल्याचे शरद पवार यांनी आपल्या भाषणात सांगितले. 

कुंडलिका नदीचे संवर्धन व उद्यान प्रकल्पाचे लोकार्पण 

गाळाने भरलेल्या या परिसराचा कुंडलिका नदीसंवर्धनामुळे चेहरामोहरा बदलणार आहे. औद्योगिक, फलोत्पादन, मत्स्यव्यवसाय व पर्यटनाचा आधारभूत विकास साधल्यास कोकणाचा खऱ्या अर्थाने कायापालट होईल, असे शरद पवार यांनी सांगितले. 

रोहा-अष्टमी नगर परिषदेच्या कुंडलिका नदीचे संवर्धन व उद्यान या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा रविवारी पार पडला, त्या वेळी खासदार शरद पवार बोलत होते. या वेळी खासदार पवार म्हणाले, की मुंबईची बंदरे कमी पडत असल्याने रायगड जिल्ह्यातील न्हावा-शेवा व जेएनपीटी बंदर तसेच दिघी बंदर देशाच्या व राज्याच्या आर्थिक विकासाला कारणीभूत ठरली आहेत. अनेक नद्यांना एक वेगळा इतिहास आहे. मात्र, परिवर्तन करणाऱ्या नद्यांच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष केले जाते. आज कुंडलिका नदीचे चित्र बदलत आहे, ही चांगली गोष्ट आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख