'मी राहुलजींशी बोलतो...टिकलं पाहिजे…कसंही करुन सरकार टिकलं पाहिजे' - Minister Jitendra Awhad reminisced about Rajiv Satav | Politics Marathi News - Sarkarnama

'मी राहुलजींशी बोलतो...टिकलं पाहिजे…कसंही करुन सरकार टिकलं पाहिजे'

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 16 मे 2021

सर्वपक्षीय नेत्यांनी राजीव सातव यांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त केलं आहे.

मुंबई : ''राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये जरा काही तणाव निर्माण झाला की, राजीव खूप अस्वस्थ व्हायचा. त्याचे 5-50 फोन यायचे. तो मला बोलवताना कधी 'दादा' बोलायचा तर कधी 'बॉस' बोलायचा. त्याचा फोन आला की, त्याचं सुरु व्हायचं. दादा बघ...ताईंशी बोलून घे, साहेबांशी बोलून घे, मी राहुलजींशी बोलतो काही होणार नाही ना…टिकलं पाहिजे…टिकलं पाहिजे…कसंही करुन टिकलं पाहिजे...'' राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राजीव सातव यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. (Minister Jitendra Awhad reminisced about Rajiv Satav)

राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांचे रविवारी खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी सातव यांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त केलं आहे. आव्हाड यांनीही फेसबुक पोस्टमध्ये सातव यांना आदरांजली वाहत अनेक आठवणी सांगितल्या आहेत. ''माझ्या जिवाभावाचा व माझ्या सामाजिक विचारांना नेहमीच साथ देणारा हसतमुख राजीव सातव आज एकटा निघून गेला. राजीव सातव आणि माझी मैत्री ही जवळ-जवळ 20 वर्षे जुनी होती. नेहमी हसतमुख चेहरा…राजीव सातव कोणावर चिडलायं असं मी कधीच बघितल नाही.''

हेही वाचा : पंतप्रधान मोदींवर टीकेचे पोस्टर अन् राहुल गांधीचे अटक करण्याचे 'चॅलेंज'

''एक गोष्ट त्याची मला कायम आठवणीत राहील. ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये जरा काही तणाव निर्माण झाला की, राजीव खूप अस्वस्थ व्हायचा. त्याचे 5-50 फोन यायचे. तो मला बोलवताना कधी 'दादा' बोलायचा तर कधी 'बॉस' बोलायचा. त्याचा फोन आला की, त्याचं सुरु व्हायचं. दादा बघ ताईंशी बोलून घे, साहेबांशी बोलून घे मी राहुलजींशी बोलतो काही होणार नाही ना…टिकलं पाहिजे…टिकलं पाहिजे…कसंही करुन टिकलं पाहिजे. त्याची अस्वस्थता शब्दांतून जाणवायची आणि त्याचा प्रामाणिकपणा त्याहून अधिक जाणवायचां. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण जातीयवादी शक्तींशी लढलं पाहिजे. बहुजनांचा विचार केला पाहीजे. हा विचार त्याच्या मनात कायम असायचा,'' अशी भावना आव्हाड यांनी व्यक्त केली आहे.

गांधी कुटूंबियांबद्दल खूप आत्मीयता

''गुजरातमध्ये थोड्याश्या फरकाने काँग्रेसचे सरकार गेलं तेव्हा त्याला अतिशय वाईट वाटलं होतं. तेव्हा तो गुजरातचा निरीक्षक होता. मला आठवतंय की, लोकसभेची निवडणूक जेव्हा तो जिंकला, तेव्हा शेवटच्या 3 दिवसांमध्ये त्याचा मला फोन आला. दादा कसंही कर आणि तू एकदा तरी फेरी मारुन जा. मी खास विमानाने नांदेडला गेलो आणि नांदेडवरुन गाडी घेऊन हिंगोलीला गेलो. आणि तिथे एक मोठी सभा मी राजीव सातव साठी संबोधित केली. राजीव खासदार झाला. दिल्लीला गेला. दुस-यांदा काय त्याने निवडणूक लढविली नाही. पण, तो गांधी कुटुंबियांच्या अतिशय जवळ होता. त्याला राहुल गांधी यांच्याबद्दल खुप आत्मीयता होती. नेहमी बोलताना सांगायचा, 'तो मनाने खूप चांगला आहे, हुशार आहे. पण, त्याच नशीब काय आहे ते कळतं नाही मला', अशी आठवण आव्हाड यांनी सांगितली.

उद्या कधी उगवतच नाही

राजीवच गांधी कुटूंबीयांवर मनापासून प्रेम होतं. तेवढच प्रेम त्याच शरद पवार साहेबांवर होतं. शरद पवार साहेबांना बोलताना तो 'अद्भुत चमत्कार' हा शब्द वापरायचा आणि शेवटी असंही म्हणायचा की, हे सगळं एकत्र करण्याची एकाच माणसाच्या अंगात ताकत आहे आणि ती म्हणजे शरद पवार साहेब. अनेकवेळा गप्पागोष्टी रंगायच्या. फोन आला कि, 15-20 मिनिटं बोलल्याशिवाय तो फोन ठेवायचाच नाही. खूप आठवणी दाटून येतात. पण, काय करणार…कोणाचं चाललंय त्याच्यापुढे. आपण फक्त उद्याची वाट बघत असतो आणि आज खेळ संपलेला असतो. उद्या कधी उगवतच नाही,'' असं आव्हाड यांनी नमूद केलं आहे.

जादूगाराची जादू चालली नाही

''राजीव हॉस्पिटलमध्ये असताना डॉ. राहुल पंडीत यांनी औषधोपचार केल्यानंतर त्याचं वेंटिलेटर काढण्यात आलं. वेंटिलेटर काढल्यावर आता काय राजीव आला बाहेर. असंच माझं मत होतं. त्याच्या घरच्यांचा भ्रमणध्वनी आला. आणि सहजच माझ्या तब्येतीची चौकशी केली. मी आजारी असताना काय काय झाले त्यांना फक्त मनोमन खात्री करायची होती तेव्हा मी त्यांना सांगितले की, डॉ. राहुल पंडीत येऊन गेलेत. हा जादूगार माणूस आहे. त्याने सांगितलं म्हणजे काही होणार नाही. पण, हे माझं वाक्य जे त्यांना उभारी देणारं होतं हे खोटं ठरलं. कारण मी स्वत: डॉ. राहुल पंडीत यांच्याशी बोललो होतो. तेव्हा ते मला म्हणाले होते की, वेंटिलेटर वरुन बाहेर आला आहे. आता थोड्या दिवसांत आपण त्याला सगळ्यातून बाहेर काढू. पण, या जादूगाराचीही जादू राजीववर चालली नाही. राजीव हे तुझं जाण्याचं वय नव्हतं,'' अशा शब्दांत आव्हाड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख