देवेंद्र फडणविसांना पुन्हा मिळाला मूळचा आत्मविश्वास!

देवेंद्र फडणविसांना पुन्हा मिळाला मूळचा आत्मविश्वास!

काहीही असो ठाकरे सरकारविरोधात वातावरण निर्मिती करण्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यशस्वी झाल्याचे दिसून येते. म्हणजेच सरकारला सळो की पळो करून सोडले आहे. भाजपमधील खणखणीत नाणं म्हणजे फडणवीस. सत्तेत असो की नसो ते लढत असतात. सरकारला वाकवत असतात. दमदार विरोधी पक्षनेताच महाराष्ट्राला पाहायला मिळाला नव्हता. तो फडणवीस यांच्यामुळे दिसून येत आहे.

राज्यावर करोरोनाचे संकट असताना विरोधकांनी राजकारण न करता सहकार्य करावे अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सर्वच सत्ताधाऱ्यांनी केली. तर विरोधी पक्षांचे म्हणणे असे आहे, की आम्ही सरकारला कोरोनाला सुरवात झाल्यापासून म्हणजे 70 दिवस सहकार्य केले. मात्र सरकार हे संकट हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे, असा आरोप करत फडणवीस पुन्हा आता जोमात आले आहेत.

सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर फडणवीस आणि भाजपची मंडळी सोशल मिडियावर टार्गेट झाले आहेत. त्यांनी कोणताही मुद्दा मांडला की सोशल मिडियात त्यांची खिल्ली उडविली जाते. भाजप विरुद्ध तीन पक्ष असा सामना असल्याने सोशल मिडियात भाजपची कधी नव्हे ती माघार होण्याची वेळ आली होती. भाजपची सोशल मिडियातील खेळी त्यांच्यावरच उलटविण्यात महाआघाडीची सोशल मिडिया फौज यशस्वी झाली होती.

जनताही नवीन सरकारला वेळ देत असते. लगेच टीकाटिप्पणी करून सरकारविरोधात बोलले तर त्याकडे जनता दुर्लक्ष करते. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सौम्य देहबोली आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे जमिनीवर पाय असणे जनतेला आवडले होते. त्यामुळे कोरोनाचे संकट आले तरी  सरकारविषयी नाराजी जनतेत नव्हती. मात्र कोरोना येऊन 70 दिवस झाले तरी त्यावर नियंत्रण येत नसल्याचा मुद्दा फडणवीस यांनी योग्य वेळी पकडला. राज्यपालांकडे जाऊन सरकारविषयी तक्रारी करून त्याची सुरवात केली.

सरकार गेल्यानंतर आणि पक्षांतर्गत लाथाळ्यांमुळे भाजपची खिल्ली उडविली जात होती. विधान परिषद निवडणुकीतून जनाधार असलेले नेते बाहेर फेकले गेल्यानंतर सबकुछ पुन्हा फडणवीस असाच मामला भाजपमध्ये झाला आहे. सत्ताधारी तीन पक्षांच्या ताकदीपुढे भाजप कमकुवत ठरल्याचे दिसून येत होते. पण पुन्हा फडणवीस यांचा आत्मविश्वास आता दिसून आला आहे. 

तीन मंत्री मैदानात उतरले

राज्यात विरोधी बाकावर बसलेल्या भाजपने सरकारला आता धारेवर धरले आहे. फडणवीस यांनी केंद्राने केलेल्या मदतीची आकडेवारी जाहीर करून ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. त्यापाठोपाठ जयंत पाटील, बाळासाहेब थोरात आणि अनिल परब या सरकारमधील तीन मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन फडणवीस यांचा समाचार घेतला. फडणविसांनी दिेलेली आकडी आभासी आहे असे परब यांचे म्हणणे आहे. केंद्राकडून म्हणावे तसे सहकार्य मिळत नसल्याची ओरडही आघाडी सरकारने सुरू केली आहे.

म्हणजेच ठाकरे सरकार आणि विरोधी पक्षामध्ये खरा सामना रंगला आहे. ठाकरे सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी भाजप सज्ज झाल्याचे चित्रही निर्माण करण्यात आले. मात्र तसे आम्ही काही करणार नाही. हे फडणवीस यांनीच स्पष्ट केले. काहीही असो ठाकरे सरकारविरोधात वातावरणनिर्मिती करण्यास फडणवीसांनी योग्य संधी साधल्याचे दिसून आले. 

दरेकर कमी पडले

फडणविसांप्रमाणे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर असेच आक्रमक असते तर सरकारची अधिक कोंडी झाली असती पण, फडणविसांना तोड नाही. लोकशाहीत विरोधी पक्षनेत्याची ताकद काय असते हे पुन्हा एकदा दिसून आले.

2014 मध्ये भाजपशी न पटल्याने शिवसेना विरोधी बाकावर बसली होती पण, ती काही दिवसच. त्यानंतर ती पुन्हा सत्तेत गेली. ती 2019 पर्यंत. म्हणजेच भाजपच्या खांदाला खांदा लावला. पुढे 2019 मध्ये राज्यात भलतीच आघाडी झाली. कोणी स्वप्नातही विचार केला नव्हता ते घडले. दोन कॉंग्रेस आणि शिवसेनेचे सरकार आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बनले.

2014 ते 2019 पर्यंत शिवसेना-भाजपमध्ये काय घडले. हे उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. जो पक्ष सत्तेवर होता. ज्या दोन पक्षांना जनतेने बहुमत दिले होते. त्यांच्यामध्ये मतभेद झाले आणि ज्यांना बहुमत नव्हते ते सत्तेवर आले. अर्थात शिवसेनेच्या सहकार्याने. जे फडणवीस मुख्यमंत्री होते ते विरोधी बाकावर आले.

विरोधी बाकांची फडणविसांना सवय

विरोधी बाकावर बसताना ते म्हणाले होते, की आम्हाला याच खुर्चीवर बसण्याची सवय आहे. अनेक वर्षे आम्ही विरोधी बाकावरच होतो. पण, विरोधी पक्षनेतेपदाची ताकद काय असते हे आपण सरकारला दाखवून देऊ अशी, त्यांची देहबोली सांगत होती आणि पुढे झालेही तसेच.


मुळात येथे सरकार बरोबर की विरोधी पक्ष. हा मुद्दा नाही तर लोकशाहीत विरोधीपक्ष सत्ताधाऱ्यांना योग्य प्रश्न विचारून जनतेला दिलासा देऊ शकतो. तो सत्ताधाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयावर किंवा धोरणावर प्रहार करून जनतेचे लक्ष स्वत:कडे वेधून घेतो. सरकार विरोधी वातावरण निर्मिती करून पुन्हा सत्तेवर येण्याची तयारी करू लागतो. शेवटी जनमत फिरविण्याची जादू विरोधी पक्षनेत्याकडे असावी लागते.

फडणवीस यांनी 26 मे रोजी एकट्यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारच्या अब्रुची लक्तरे वेशीला टांगली. त्यांच्या बोचऱ्या टीकेने सरकार पुन्हा खडबडून जागे झाले आणि त्यांनी आपली बाजू जनतेसमोर मांडली. म्हणजे विरोधी पक्षनेत्याकडे डोळेझाक करून चालणार नाही. हे सत्ताधाऱ्यांच्या लक्षात आलेले दिसते.

अशी आहे विरोधी नेत्यांची यादी

पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण तर पहिले विरोधी पक्षनेते रामचंद्र धोंडीबा भंडारे (1960-62) होते, त्यानंतर कृष्णराव धुळूप, दिनकर पाटील, गणपतराव देशमुख, उत्तमराव पाटील, प्रभा राव, प्रतिभा पाटील, शरद पवार (तीनवेळा 1980 ते81,1983-85,1985ते 1986) बबनराव ढाकणे, निहाल महमद, दत्ता पाटील, मृणाल गोरे,मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडे,मधुकर पिचड, नारायण राणे, रामदास कदम, एकनाथ खडसे, एकनाथ शिंदे (एक महिना), राधाकृष्ण विखे पाटील (लोकसभा निवडणुकीच्या (2019) राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश), विजय वडेट्टिवार अशी यादी आहे. 2019 मध्ये शिवसेनेने भाजपशी काडीमोड घेऊन थेट दोन्ही कॉंग्रेसशी हातमिळविणी करून मुख्यमंत्रीपद मिळविले त्यामुळे देवेंद्र फडणविसांना विरोधी पक्षनेतेपदाच्या खुर्चीवर बसावे लागले.

माहोल बदलवणारे नेते

सत्तेत असो की विरोधीबाकावर शरद पवार काय किंवा गोपीनाथ मुंडे काय त्यांना काहीच फरक पडत नसे. ते नेहमी वादळ घेऊनच यायचे. 2019 ची महाराष्ट्राची निवडणूक डोळ्यासमोर आणल्यास असे दिसून येईल की जर श्री. पवार हे मैदानात नसते तर भाजपने स्वबळावर सत्ता मिळविली असती. विरोधी पक्षात असलेल्या श्री. पवार यांनी निवडणूक फिरवून टाकली. तशी ताकद नेत्यामध्ये असावी लागते.

म्हणजे श्री. पवार यांच्यासारखे नेते मुख्यमंत्रीही होते आणि विरोधी पक्षनेतेही. त्यामुळे सरकारविरोधात कसे रणशिंग फुंकायचे हे त्यांना ठाऊक होते. पावसात भिजत सभा घेतली आणि निवडणुकीचा रंगच बदलला. म्हणजे माहोल निर्माण करण्याची धमकही नेत्यांमध्ये असावी लागते. जे बलाढ्य नेते विरोधी बाकावर बसले होते त्याच बाकावर आज फडणवीस आहेत. ते आज रणांगण गाजवत आहे. म्हणजेच विरोधी नेते हे सत्तेला हादरा देऊ शकते हे त्यांनी दाखवून दिले आहे.

`मी पु्न्हा येईन`चा आत्मविश्वास

2014 मध्ये विरोधी बाकावरून सत्तेत गेलेल्या शिवसेनेविषयी एकदा बोलताना संजय राऊत म्हणाले होते, की शिवसेना विरोधी बाकावर असती तर बरे झाले असते. अल्पमतातील सरकारची कोंडी केली असती. तर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते, की ज्या कॉंग्रेसने विरोधी पक्षनेत्यावर जबाबदारी टाकली.

तेच पहिल्या दिवसापासून सत्ताधाऱ्यांचे काम करीत होते. त्यामुळे कॉंग्रेसचे मोठे नुकसान झाले. याचा अर्थच असा की या दोन्ही नेत्यांना विरोधी पक्षनेतेपदाची ताकद माहिती होती. देवेंद्र फडणवीस यांना तर या पदात किती ताकद आहे हे चांगले ठाऊक आहे.

फडणविसांचे एक वैशिष्ठ्य असे आहे, की ते सत्तेत असो की विरोधी बाकावर. ते नाऊमेद होत नाही. मुख्यमंत्री असताना सर्व निवडणुकांची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेतली होती. महानगरपालिका असो की ग्रामपंचायत भाजपला यश कसे मिळेल हे ते पाहत आले.

यंत्रणा कामाला लावली. अर्थात त्यामुळे विजयाचे आणि पराभवाचे श्रेय त्यांनाच जायचे. आज विरोधीबाकावर असतानाही ते सरकारविरोधात डरकाळ्या फोडत आहेत. शिवसेनेने साथ सोडली असली तरी फडविसांनी आशा सोडली नाही. "मी पुन्हा येईन' असा त्यांना जबर आत्मविश्वास आहे. स्वच्छ प्रतिमा आणि खणखणीत नाणं आज भाजपकडे आहे.

लोकशाहीत मुख्यमंत्र्याला जितके महत्त्व असते तितकेच विरोधीप पक्षनेत्याला असते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. ते यापूर्वीा कोणत्याच सभागृहाचे सदस्य नव्हते. त्यामुळे विधिमंडळ कामकाजाचा अनुभव नाही हे वास्तव आहे. आता तेही सदस्य बनले आहेत. तेही अनुभव घेता आहे. तर विरोधी बाकावर फडणविसांसारखा तावूनसुलाखून निघालेला नेता आहे. त्यामुळे ते सरकारवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करीत  आहेत.

सरकारही कमजोर नाही... 

याचा अर्थ ठाकरे सरकार कमजोर आहे असा नव्हे. सरकारमध्येही विरोधी बाकावरून सत्तेत आलेले दिग्गज नेते आहेत. अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टिवार आदी ज्येष्ठ आणि अनुभवसंपन्न नेते आहेत.

त्यामुळे सरकार कसे चालवायचे त्यांना माहित आहे. सरकारमध्ये असले की अधिक आरडाओरड करता येत नाही. संयम ठेवावा लागतो. अधिक काम करावे लागेत. सध्या सरकार तेच करीत असले तरी ज्या चुका होतात किंवा दिसतात त्या हेरण्याच फडणवीस यशस्वी झाले आहेत असे म्हणावे लागेल.

कोण चुकते सरकार की विरोधी पक्ष याचे गणित मात्र जनता मांडत असते. शेवटी जनताच ठरवत असते कोणाला सिंहासनावर बसवायचे आणि कोणाला विरोधी बाकावर! विरोधी बाकांवरून फडणविसांनी सिंहासन दिसत असेल पण त्यासाठी विरोधी पक्षनेते म्हणून चांगली कामगिरी करावी लागेल, हे फडणविसांना कळाले ही चांगली गोष्ट आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com