Blog by Dr. Jitendra Awhad about Indira Gandhi and Bangladesh War | Sarkarnama

'त्या इतिहासाची पुनरावृत्ती व्हायला हवी!

डाॅ. जितेंद्र आव्हाड
बुधवार, 17 जून 2020

तेच १९७० - ७१ चं भारत पाकिस्तान युद्ध, ज्यातून पाकिस्तानचे दोन तुकडे पडले आणि जगाच्या नकाशावर बांगलादेश हे स्वतंत्र राष्ट्र निर्माण झालं. त्यावेळी तत्कालिन पंतप्रधान (स्व.) इंदिरा गांधी यांनी जो कणखरपणा दाखवला तसाच आज भारत-चीन दरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर निर्माण झालेल्या परिस्थितीत सध्याच्या पंतप्रधानांनी दाखवला हवा..असं लिहित आहे राज्याचे गृहनिर्माण मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डाॅ. जितेद्र आव्हाड

'ब्लड टेलिग्राम" या नावाचं एक अजरामर पुस्तक आहे. बांगलादेश निर्माण व्हायच्या आधी तो पूर्व पाकिस्तान होता. तेव्हा ढाक्यात आर्चर ब्लड हे अमेरिकन सनदी अधिकारी अमेरिकेचे कॉन्सुल जनरल म्हणून काम पहात होते. पश्चिम पाकिस्तानच्या 'पंजाबी' दादागिरीला आणि अत्याचारांना विटलेल्या 'बंगाली' भाषिक पूर्व पाकिस्तानात पुढे उठाव झाला. अत्याचारांनी परिसीमा गाठली. रक्ताचे पाट वाहिले. लाखो निर्वासित पळून भारतात आले. 'आमार बांगला, सोनार बांगला' ही घोषणा देत 'बांगलादेश मुक्ती बाहिनी'ची स्थापना झाली. 

निर्वासित भारतात आल्यामुळे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना हस्तक्षेप करणं क्रमप्राप्त होतं. तेच १९७० - ७१ चं भारत पाकिस्तान युद्ध, ज्यातून पाकिस्तानचे दोन तुकडे पडले आणि जगाच्या नकाशावर बांगलादेश हे स्वतंत्र राष्ट्र निर्माण झालं.

आर्चर ब्लड यांनी त्यावेळी या संपूर्ण घडामोडींबाबत आपले अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांना वेळोवेळी पाठवलेले अहवाल, संदेश, टेलिग्राम, यातून त्या काळाचा जो रक्तरंजित, थरारक, राजकीय आणि लष्करी इतिहास दिसतो, त्याचं यथार्थ संकलन म्हणजे गॅरी बास यांनी लिहिलेलं, ब्लड टेलिग्राम हे पुस्तक.

आज त्यातील दोन गोष्टी सांगणं, आजच्या घडीला समर्पक होईल.

पाकिस्तानचे तत्कालीन हुकूमशहा याह्याखान यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत आहे हे इंदिराजींनी ताडलं होतं. आपले सहकारी स्वर्णसिंग यांच्या मदतीने त्या पद्धतशीरपणे याह्याखान विरोधात जगभर जनमत तयार करत होत्या. पण अमेरिकेकडून प्रचंड शस्त्रे खरेदी करणारा याह्याखान, निक्सन यांचा दोस्त होता. तशातच इंदिराजींचा अमेरिका दौरा ठरला. त्यांना घाबरवण्यासाठी दबावतंत्राचा वापर करायचं अमेरिकेत ठरलं. परराष्ट्रमंत्री हेन्री किसिंजर त्यात मोठी भूमिका बजावणार होते. ठरल्याप्रमाणे जेवणावेळी निक्सन यांनी अमेरिकेची आर्थिक, लष्करी ताकद, याचं भयप्रद वर्णन केलं. तिच्याशी पंगा घेणं किती महागात पडू शकतं हे सांगितलं. किसींजर त्यांची री ओढत होते. 

अमेरिकन सिनेटर वारंवार टाळ्या वाजवून वातावरण निर्मिती करत होते. अखेर इंदिराजी बोलायला उभ्या राहिल्या. जगातील दोन डझन सार्वभौम देशांमध्ये अमेरिकेने कशी लुडबुड चालवली आहे, याचा पाढाच त्यांनी वाचला. छोट्या राष्ट्रांना अकारण त्रास देणारी ही ताकद काय कामाची असा खडा सवाल करून त्यांनी किसींजर यांना विचारलं, "तुम्ही धर्माने ज्यू अहात. हिटलरने तुमच्यावर केलेले अनन्वित अत्याचार तुम्ही विसरलात? माझ्या देशात आज असेच अत्याचारग्रस्त निर्वासित आले आहेत. त्यांना सन्मानाने जगू देणं हे माझं मानवतावादी कर्तव्य आहे. त्यात मला मदत केलीत तर ठीक. पण नाही केलीत तर तुमच्याविना मी ते पार पाडेन." 

इंदिराजींच्या भाषणानंतर तिथे स्मशान शांतता पसरली. प्रत्येकाचं तोंड कसं झालं असेल याची फक्त कल्पना करावी.

दुसरा किस्सा आहे युद्धाला तोंड फुटल्यानंतरचा. बंगालच्या उपसागरात नांगर टाकलेल्या भारताच्या विक्रांत विमानवाहू नौकेवरून अथकपणे झेपावणाऱ्या विमानांनी चितगांव बंदर भाजून काढलं होतं. पाकिस्तानी आरमाराचा पार निःपात होत होता. अशावेळी व्हिएतनामजवळ असलेलं आपलं बलाढ्य सातवं आरमार बंगालच्या उपसागरात पाठवायचा निर्णय अमेरिकेने घेतला. तो इंदिराजींपर्यंत पोहोचेल याची खात्री केली. ही खरोखरीच चिंताजनक गोष्ट होती. आणि इंदिराजी खरंच काळजीत पडल्या. काही मिनिटात त्यांनी संसदेत येऊन ही माहिती दिली. भारताचा निर्णय मी उद्या रामलीला मैदानावर जाहीर करेन असं त्यांनी संसदेत सांगितलं. 

निक्सन आणि मंडळी खुष झाली. भारत उद्या युद्धातून माघार घेणार असा त्यांचा समज झाला असावा. तरीही उद्याच्या भाषणात त्या काय म्हणणार याची उत्सुकता होतीच. ऐनवेळी आयोजित केलेल्या लाखोंच्या सभेत, अमेरिकेच्या मानवी हक्कांचे वाभाडे काढत त्या गरजल्या, "सातवं आरमार येवो की अमेरिका युद्धात उतरो, भारत आता मागे हटणार नाही. जगाने पाहिलं नसेल असं युद्ध आम्ही लढू. पण बांगलादेश मुक्त होणारच." अमेरिकेला मुळात युद्धात उतरायचं नव्हतच. फक्त भीती दाखवायची होती. पण इथे तर मैदानात उतरायचं आव्हानच मिळालं. आता उरलीसरली अब्रू कशी वाचवायची ही विवंचना निक्सन, किसींजर कंपनीला पडली.  नशीब चांगलं की पुढच्या दोनतीन दिवसात पाकिस्तानी जनरल नियाझींनी बिनशर्त शरणागती पत्करली आणि युद्ध संपलं.

डोळ्याला डोळा भिडवून बोलणं आणि त्याप्रमाणे वागणं हे कणखर नेत्याचं वेगळेपण असतं आणि इंदिराजींनी ते पुराव्यानिशी सिद्ध केले. 

इतिहासाची पुनरावृत्ती व्हायला हवी!

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख