मुख्यमंत्र्यांनी 'सारथी' प्रकरणात लक्ष घालावे : धैर्यशील मोहिते पाटील - Dhairyasheel Mohite Demands CM's Intervention in SAARTHI | Politics Marathi News - Sarkarnama

मुख्यमंत्र्यांनी 'सारथी' प्रकरणात लक्ष घालावे : धैर्यशील मोहिते पाटील

संपत मोरे
बुधवार, 1 जुलै 2020

धोरणात्मक व दर्जात्मक  गुणवत्ता सांभाळता यावी म्हणून महाराष्ट्र शासनाने या संस्थेला स्वायत्त दर्जा देखील दिला होता. परंतु, आता सारथीच्या स्वायत्तते बाबतच प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे, असे  भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी म्हटले आहे.

पुणे : "महाराष्ट्रात ५८ मुक मोर्चे, ४२ मराठा बांधव हुतात्मा झाल्यानंतर मराठा आरक्षण मिळाले व त्याच बरोबर मराठा समाजाचा शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक दृष्टीने विकास व्हावा म्हणून सारथी (छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था) संस्थेची निर्मिती केली होती. धोरणात्मक व दर्जात्मक  गुणवत्ता सांभाळता यावी म्हणून महाराष्ट्र शासनाने या संस्थेला स्वायत्त दर्जा देखील दिला होता. परंतु, आता सारथीच्या स्वायत्तते बाबतच प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे" असे  भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी म्हटले आहे.

"युपीएससी, एमपीएससी सह रिसर्च फेलोशिप, आयबीपीएस कोचिंग, तारदूत प्रकल्प सुरू झाले होते. 'सारथी' च्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या मराठा समाजातील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना मासिक स्टायपेंड देण्यात येत होता. याचा लाभ घेऊन अनेक विद्यार्थी दिल्ली येथे युपीएससी परीक्षेसाठी कोचिंग व अभ्यास करत होते, यातील अनेक मुलं निश्चितच भारतीय प्रशासकीय सेवेत जाऊ शकतील अशी होती. मात्र आता जो काही स्टायपेंड देण्यात येत होता तो बंद करण्यात आला आहे.  मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्किल डेव्हलपमेंट चे कोर्सेस सुरू करणे, शेतकऱ्यांना नवीन पिकांसाठी, आधुनिक शेतीसाठी मोफत प्रशिक्षण देणे असेन अनेक उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणार होते आता हे उपक्रम कधी चालू होतील की नाही यावरच शंका आहे." असे मोहिते पाटील यांनी म्हटले आहे.

मनुष्यबळ केले कमी

"सारथी संस्था कशी बंद पडेल यासाठी अतिशय पद्धतशीर पणे टप्प्याटप्प्याने मनुष्यबळ कमी  करून ज्या सारथी संस्थेत  ८४ कर्मचाऱी होते त्या संस्थेत फक्त १२ कर्मचारी शिल्लक ठेवले आहेत. त्यातील फक्त २ कर्मचारी पर्मनंट आहेत संस्थेतील कर्मचारी संख्या कमी करून, संस्थेचा तारदूत प्रकल्प बंद करणे यासह विद्यार्थ्यांना मिळत असलेल्या शिष्यवृत्ती - स्टायपेंड थांबवून संस्थेच्या कारभारात हस्तक्षेप करण्यात आला आहे'' असेही मोहिते पाटील यांनी म्हटले आहे. 

ते पुढे म्हणाले, ''सारथी फेलोशिप रखडलेली , UPSC दिल्ली विद्यार्थी स्टायपेंड रखडलाय , सारथी तारादूत मानधन बंद व प्रकल्प पण रद्द , MPSC विद्यार्थी स्टायपेंड रखडला, जवळपास ८०% कर्मचारी कपात एवढे करूनही समाधान न झाल्याने महाविकास आघाडी सरकारने मराठा संशोधक, विद्यार्थी , शेतकरी महिला यांचे सर्व उपक्रम बासनात गुंडाळले आहेत,'' 

सारथी बंद करु नये

ते पुढे म्हणाले, "सारथी बंद पडू नये ही समस्त मराठा समाजाची मागणी आहे. तरी  महाविकास आघाडी सरकार ने सारथी विरोधी भूमिका बदलली पाहीजे. सारथी संस्था बंद पडणे हे मराठा समाजाच्या हिताचे नाही, ही संस्था वाचली पाहिजे, ही संस्था वाढली पाहिजे, ह्या संस्थेच्या माध्यमातून गरिबांना शिक्षण, प्रशिक्षण मिळाले पाहिजे. सरकार ने सारथी संस्था बंद करू नये, हे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे जीवंत स्मारक आहे, सारथीच्या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष घालावे व ही संस्था परत कशी सुरू होईल यासाठी प्रयत्न करावेत," 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख