Will not go to BJP Sachin Pilot Announced | Sarkarnama

भाजप मध्ये जाणार नाही; सचिन पायलट यांनी केले जाहीर

वृत्तसंस्था
बुधवार, 15 जुलै 2020

राजस्थानमध्ये पायलट यांनी बंडाचे हत्यार उपसल्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरूनही हटविण्यात आले आहे. त्यांच्या बंडानंतर कोणताही समझोता करण्यास पक्षाने नकार दिला.

नवी दिल्ली : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या विरोधात बंड केलेले नेते सचिन पायलट यांनी आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचे एका वृत्तसंस्थेशी बोलताना जाहीर केले आहे. 

राजस्थानमध्ये पायलट यांनी बंडाचे हत्यार उपसल्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरूनही हटविण्यात आले आहे. त्यांच्या बंडानंतर कोणताही समझोता करण्यास पक्षाने नकार दिला. पायलट यांना महत्त्व न देता मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याच मागे पक्ष खंबीरपणे उभा राहिला आहे. 

कॉंग्रेसचे दिवंगत नेते राजेश पायलट यांचे सचिन हे पुत्र आहेत. त्यांच्या पिताश्रीनीही कॉंग्रेससाठी जीवाचे रान केले होते. राजेश पायलट आणि माधवराव शिंदे या जोडीची जशी एकेकाळी देशभर चर्चा होत असे. तसेच त्यांच्या मुलांविषयी तेच होत राहिले. ज्योतिरादित्य आणि सचिन हे ग्लॅमर असलेले कॉंग्रेसमधील नेते होते. ते जेथे जातील तेथे गर्दी खेचणारे होते. त्यांचा राहुल गांधी इतकाच किंवा हवे तर काकणभर अधिकच चाहत्यांची संख्या होती. पायलट हे काहीसे शांत, संयमी आणि जमिनीवर पाय असणारे नेते आहेत. त्यांची पार्श्वभूमी घराणेशाहीची असली तरी वडलांनंतर त्यांनी पक्षात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. पक्षासाठी तेही गेहलोतांप्रमाणे कोणतीही जबाबदारी खांद्यावर घेण्यास नेहमीच तयार असत. 

वडील राजकारणी आणि तेही दिल्लीत असायचे. त्यामुळे त्यांचे शिक्षण आणि बालपणही तेथेच गेले. प्रारंभी एअर फोर्स बाल भारती शाळेत त्यानंतर सेंट स्टीफन महाविद्यालयात शिक्षण घेतले. पुढे अमेरिकेतही उच्च शिक्षण घेऊन आले. वडलांच्या अपघाती निधनानंतर ते राजकारणात आले. वयाच्या 26 वर्षी खासदार बनले. गरीब, कष्टकरी आणि शेतकरी हाच त्यांच्या राजकारणाचा नेहमीच भाग राहिला. 

राहुलबाबांचे विश्वासू 
राहुल गांधी कॉंग्रेसमध्ये सक्रिय होत असताना पुढे ते अध्यक्ष बनले. राहुलबाबांच्या टीममध्ये ते अतिशय विश्वासू नेते होते. राहुलबाबांची टीम मोदीसरकारला लक्ष्य करीत होती. 2014 मधील लोकसभा निवडणुकीत म्हणजेच मोदींच्या त्सुनामी लाटेत कॉंग्रेसचा पार धुव्वा उडाला होता. कॉंग्रेस कधी नव्हे इतकी अडचणीच आली होती. कॉंग्रेस संपली अशीच चर्चा सुरू होती. भाजपही आपल्यापरिने होता होईल तितके कॉंग्रेसचे खच्चीकरण करीत होती ते आजही सुरू आहे. कॉंग्रेसला कुठल्याच राज्यात नीट कारभार करू दिला जात नाही. मात्र वादळात, संकटात सापडलेल्या कॉंग्रेसला वाचविण्यासाठी राहुलबाबांनी आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली. मोदींना ते लक्ष्य करीत होते. त्यांच्याबरोबर ही जोडीही होती. त्याचा फायदा 2018 मध्ये झालेल्या पाच राज्याच्या निवडणुकीत कॉंग्रेसला झाला. 

मोदी लाटेनंतर राजस्थानात 
राजस्थानही कॉंग्रेसच्या हातात नव्हते. तेथे पुन्हा कॉंग्रेसला सत्ता मिळवून द्यायची असेल तर पायलटना राज्यात पाठविले पाहिजे असा विचार झाला. ते मोदी लाटेनंतर राजस्थानात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बनले. त्यांनी भाजप सरकारवर हल्ला करण्यास सुरवात केली. वसुंधराराजेंना कोंडीत पकडण्याबरोबर राज्यभर वातावरण ढवळून काढले. जनमत कॉंग्रेसकडे फिरविले. आज देशातील कोणताही राजकीय विश्‍लेषक किंवा तज्ज्ञ पायलटांची बाजू याच मुद्दयावर घेत असतो. त्यांनी राज्यात पक्षाला पुन्हा संजिवनी देण्यासाठी कष्ट घेतले पण, कष्टाचे चीज झाले नाही. 

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख