NCP Nashik Leader Purshottam kadlag criticized Nilesh Rane On Rohit Pawar issue | Sarkarnama

'राष्ट्रवादी'चे पुरुषोत्तम कडलग म्हणतात....राणेजी, रोहित पवारांच्या कामाची स्वतःशी तुलना करुन बघा

संपत देवगिरे
गुरुवार, 21 मे 2020

भाजप नेते निलेश राणे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर टिका करणे म्हणजे अतीच झाले. त्यांना गेल्या काही काळापासून कोणावरही टिका करण्याची सवय जडली आहे. यावेळी मात्र ते चुकलेच, कारण त्यांनी टिका केल्याने सामान्य नागरीकांचे मनोरंजन झाले आहे, अशी टिका नाशिकचे राष्ट्रवादीचे नेते पुरुषोत्तम कडलग यांनी केली आहे

 

नाशिक : ''भाजप नेते निलेश राणे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर टिका करणे म्हणजे अतीच झाले. त्यांना गेल्या काही काळापासून कोणावरही टिका करण्याची सवय जडली आहे. यावेळी मात्र ते चुकलेच, कारण त्यांनी टिका केल्याने सामान्य नागरीकांचे मनोरंजन झाले आहे. टिका करण्याआधी नुकत्याच आमदार झालेल्या रोहित पवार यांच्या कार्यकाळातील कामांची माहिती घ्यायला हवी होती. त्याची आपल्या कार्यकाळाशी तुलना करुन पहायला हवी होती,'' असे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी म्हटले आहे. 

श्री. कडलग यांनी राणे यांना सोशल मिडीयावरुन उत्तर दिले आहे. यात ते म्हणतात, ''राजकारणात टिका होतेच. काही लोकप्रतिनिधींचे कामकाज हे टिका करुनच चालते. हे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी जवळून पाहिले आहे. मात्र लोकांमध्ये राहून काम करणे, त्यांच्याशी एकरुप होने याची आजच्या काळात अधिक गरज आहे. हे लोकांनी ओळखले आहे. त्यामुळेच लोकसेवेची संस्कृती आमदार रोहित पवार यांच्या रक्तातच आहे. ती कोणाला सांगण्याची गरज पडत नाही. श्री. राणे यांनी केलेली टिका केवळ राष्ट्रवादी कॉंग्रेसलाच नव्हे तर लोकांनाही आवडलेली नाही.''

श्री. कडलग पुढे म्हणतात, ''टिका करण्याआधी जर राणे यांनी रोहीत पवारांच्या कार्यकाळातील कामांची तुलना आपल्या कार्यकाळाशी करून बघीतली असती तर बरे झाले असते. आपल्या मतदारसंघातील लोकांचा आपल्यावर कितपत व किती विश्वास राहिला आहे? हा प्रश्‍नच आहे. कारण असा विश्‍वास असता, तर आपण आपल्या पारंपारीक मतदारसंघात लोकसभेला पराभूत झाले नसते. खासदारकीला आपण का पडलो याचे उत्तर देखील तपासले असते तर बरे झाले असते. आपल्या घरातील मंडळी विधानसभेला निवडून आले किती? कारण आपली निवडणूक लढविण्याची पध्दत महाराष्ट्राला सर्वश्रृत आहे. त्यामुळे या सगळ्यांचा विचार करा, आणि जरा भानावर या.''

यांना टिका करण्याचा छंद...

''आपले कौशल्य पाहूनच भारतीय जनता पक्षाने आपल्याला पक्षात घेतले आहे. तुम्हाला उठसुठ ज्यांच्याशी काहीही संबंध नाही अशा लोकांवरही टिका करण्याचा छंद आहे. ज्या मतदारसंघात तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू मंत्र्याला रोहित पवारांनी ४५ हजार मतांनी पराभूत केले त्यांना आपण म्हणतात मतदारसंघावर लक्ष द्या. जेव्हा रोहित पवार आमदार नव्हते, तरीही त्यांनी दुष्काळामध्ये मतदारसंघातील जनतेसाठी पाणीपुरवठा केला. बारामती अँग्रो मार्फत वेगवेगळ्या योजना राबविल्या. कोरोनासारख्या महामारीमध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय कर्मचाऱ्यांसाठी मोफत सेनिटायजर पाठविणारे ते एकमेव असतील,'' असेही श्री. कडलग यांनी राणे यांना सुनावले आहे. 
... 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख