राष्ट्रवादीतील अंतर्गत वादामुळे भामा-आसखेडला विलंब - जगदीश मुळीक - BJP Will give Bhama Askhed Water to Pune Assures Jagdish Mulik | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रवादीतील अंतर्गत वादामुळे भामा-आसखेडला विलंब - जगदीश मुळीक

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

राज्यात भाजपची सत्ता असताना पाच वर्षांत भामा-आसखेड पाणी प्रकल्पाचे ९५ टक्के काम पूर्ण करण्यात आले, मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अंतर्गत वादामुळे ही योजना पूर्ण होण्यास विलंब होत असल्याचा आरोप भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केला आहे

पुणे : राज्यात भाजपची सत्ता असताना पाच वर्षांत भामा-आसखेड पाणी प्रकल्पाचे ९५ टक्के काम पूर्ण करण्यात आले, मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अंतर्गत वादामुळे ही योजना पूर्ण होण्यास विलंब होत असून गेल्या वर्षभरात उर्वरीत ५ टक्के काम करण्यात सरकारला अपयश आले आहे. मात्र पुणेकरांना भामा-आसखेडचे पाणी देण्यास भाजप कटिबद्ध असून, त्यासाठी सर्वतोपरी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही भाजपचे शहराध्यक्ष माजी आमदार जगदीश मुळीक यांनी दिली. 

मुळीक म्हणाले, ''राष्ट्रवादीचे खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी पुणे आणि पिंपरीला भामा-आसखेडचे पाणी देणार नाही अशी सरळसरळ धमकी दिली आहे. भामा-आसखेड योजनेबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात एकवाक्यता नाही. स्थानिक आमदार केवळ बैठका घेण्याचा फार्स करीत आहेत. प्रत्यक्षात प्रकल्प पूर्ण करण्याच्या उद्देशाने कोणतीही ठोस पावले उचलली जात नाहीत. खरं तर आत्तापर्यंत पुणे-नगर रस्त्यावरील नागरिकांना भामा-आसखेडचे पाणी मिळाले असते. परंतु नियोजनाचा अभाव आणि स्थानिक आमदारांच्या राजकीय उदासिनतेमुळे प्रकल्प पूर्ण करण्यात अपयश आले आहे,''

''मुळीक पुढे म्हणाले, ''वडगावशेरी, चंदननगर, कळस, धानोरी, विश्रांतवाडी, येरवडा या शहराच्या पूर्व भागातील पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी सात वर्षांपासून भामा-आसखेडचे योजनेचे काम सुरू आहे. या प्रकल्पाची क्षमता २०० एमएलडी इतकी आहे. योजनेचा खर्च सुमारे ४१८ कोटी रुपये आहे. महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर योजनेला आवश्यक असणारा महापालिकेच्या वाट्याचा निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे योजनेला गती आली. मात्र योजनेतील प्रकल्पगग्रस्त शेतकर्‍यांना नुकसानभरपाई देण्याचा प्रश्‍न राज्यातील महाआघाडी सरकारला अपयश येत आहे. त्यामुळे प्रकल्पाला विलंब होत आहे.''
Edited By- Amit Golwalkar 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख