बीड शहराच्या विकासासाठी पाच कोटी निधी मिळवून आमदार संदीप क्षीरसागरांनी शब्द पाळला - Sandip Kshirsagar Tells about Development Funds | Politics Marathi News - Sarkarnama

बीड शहराच्या विकासासाठी पाच कोटी निधी मिळवून आमदार संदीप क्षीरसागरांनी शब्द पाळला

दत्ता देशमुख
शुक्रवार, 31 जुलै 2020

पाच कोटी रुपयांच्या निधीतून शहरातील विविध भागांत रस्ते व नाल्यांची कामे केली जाणार असल्याचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी सांगीतले. बीड शहरवासिय व मतदार संघातील नागरिकांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यास कटीबद्ध असल्याचेही श्री. क्षीरसागर म्हणाले.

बीड : बीड शहरातील विविध भागांत रस्ते व नाल्यांच्या बांधकामासाठी नगर विकास विभागाकडून वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून पाच कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. निवडणुकीत दिलेली आश्वासने पाळण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याचे आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले. नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे व याच विभागाचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या माध्यमातून हा निधी मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.

गेल्या तीस वर्षांच्या काळात जी विकास कामे पुर्ण झाली नाहीत, ती विकास कामे पुर्ण करण्यासाठीही आपण कटीबद्ध असल्याचे संदीप क्षीरसागर यांनी सांगितले. ते म्हणाले, "निवडणुकीत बीड शहरासह ग्रामीण भागातील विकासासाठी दिलेला शब्द आपण खरा करुन दाखविणार आहोत. शहरातील रस्ते व नाल्यांचे प्रश्न जटील झालेले आहेत. आतापर्यंत सत्ता भोगणाऱ्यांनी फक्त आश्वासने दिली. आपण मात्र विकासाचे काम करणार आहोत,''

ते पुढे म्हणाले, ''शहरातील नागरिकांच्या मागच्या काळात भेटी घेतल्यानंतर अनेक समस्या समोर आल्या. त्यामुळे आपण नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे पाठपुरावा केला. नगर विकास मंत्रालयाने वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून शहरातील विविध रस्ते व नाली कामांसाठी पाच कोटी रुपयांच्या मंजूरीचे आदेश देऊन तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव शासनास सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना सुचित करण्यात आले आहे,''

''या निधीतून जुना मोंढा भागातील अंतर्गत रस्ते व नाल्यांची कामे करण्यात येणार आहेत. त्याच बरोबर बालेपीर भागातील वार्ड क्रमांक ११ मधील मामु गल्ली, चाऊस गल्ली, आघाव गल्ली व इतर भागांतील कामांसाठीही एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. मोमीनपुरा भागातील जी. एन .फंक्शन हॉल ते आदित्य कॉलेज नाथापुर रोडपर्यंत रस्ता व नाली कामासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून स्वराज्य नगर भागातील व शिवाजीनगर भागातील रस्ता व नाली बांधकामासाठी प्रत्येकी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केले आहेत,'' अशी माहिती आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिली.

"बीड शहरातील जनतेने भरभरून दिलं आहे, शहरात जी विकास कामे कागदावर राबवली जायची ती विकास कामे उभा राहून सुभाष रोड सारखी दर्जेदार करून घेतली. निवडणूकीत शहरात नागरिकांच्या भेटी घेत असतांना अनेक समस्या डोळ्यांनी पाहिल्या आता त्याची पुर्तता करत असतांना थोडा वेळ लागेल. पाच कोटी रूपये मंजूर झाले असून शहराच्या विकासात कुठेही कमी पडणार नाही. निधीही अधिक खेचून आणेल आता नागरिकांना सुविधा मिळाव्यात यासाठी माझा अहोरात्र प्रयत्न असेल, शहराचा कायापालट करण्यासाठी सदैव कटीबद्ध आहोत'' असेही संदीप क्षीरसागर म्हणाले.

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख