हसन मुश्रीफांनी बंटी पाटलांना मारला 'हा' टोमणा! - Hassan Mushriff Taunts Banti Patil over Flood Relief Fund Release | Politics Marathi News - Sarkarnama

हसन मुश्रीफांनी बंटी पाटलांना मारला 'हा' टोमणा!

अजित माद्याळे
गुरुवार, 11 जून 2020

अतिवृष्टी व पूरबाधितांना नुकसान भरपाईसाठी आणखीन ४१ कोटींचा निधी लागणार होता. हा निधी मिळावा म्हणून माझा पूर्वीपासूनच पाठपुरावा सुरू होता. परंतु पालकमंत्री पाटील यांनी आज हा निधी मंजूर करून आणल्याची बातमी दिली आहे. पूर्वीपासूनच माझा पाठपुरावा सुरू असल्याचे कदाचित बंटी पाटील यांना माहीत नसावे, असा टोला हसन मुश्रीफ यांनी लगावला आहे

गडहिंग्लज  : अतिवृष्टी आणि पूरबाधितांना नुकसान भरपाईसाठी आवश्‍यक असलेला ४१ कोटीच्या निधी मंजूरीसाठी पूर्वीपासूनच माझा पाठपुरावा सुरू आहे, कदाचित हे पालकमंत्री बंटी (सतेज) पाटील यांना माहीत नसावे, असा टोला हसन मुश्रीफ यांनी आज येथे पत्रकार परिषदेत हाणला.

या निधीसाठी पाठपुरावा करून ४१ कोटी मंजूर करून आणल्याची पालकमंत्री पाटील यांची बातमी प्रसिद्ध झाली आहे. या बातमीवर श्री. मुश्रीफ यांनी वरील वक्तव्य केले. ते म्हणाले, "अतिवृष्टी व पूरबाधितांना नुकसान भरपाईसाठी आणखीन ४१ कोटींचा निधी लागणार होता. हा निधी मिळावा म्हणून माझा पूर्वीपासूनच पाठपुरावा सुरू होता. परंतु पालकमंत्री पाटील यांनी आज हा निधी मंजूर करून आणल्याची बातमी दिली आहे. पूर्वीपासूनच माझा पाठपुरावा सुरू असल्याचे कदाचित बंटी पाटील यांना माहीत नसावे.''

सरपंचांना मुदतवाढ नाही

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याच्या मुद्यावर श्री. मुश्रीफ म्हणाले, "७३ व्या घटना दुरूस्तीमध्ये मुदतवाढीबाबतची तरतूद नाही. तसेच पूर्वीच्या सरकारने जिल्हा परिषदांना दिलेल्या मुदतवाढीला सुप्रिम कोर्टाने स्थगिती देवून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे मनात असूनही आम्ही ग्रामपंचायतींना मुदतवाढ देवू शकत नाही. परंतु, पती सरपंच असेल तर त्याच्या पत्नीला किंवा पत्नी सरपंच असेल तर तिच्या पतीला प्रशासक म्हणून नियुक्त करण्याचा विचार सरकारचा आहे. मात्र राज्यपाल याबाबत कोणता निर्णय घेतात हा महत्वाचा विषय आहे. तोपर्यंत राज्य कोरोनामुक्त झालाच तर लोकांनी निवडून दिलेले सदस्यच ग्रामपंचायतीवर येतील असाही एक प्रयत्न सुरू आहे. कायद्याने हात बांधल्याने मनात असूनही सरपंचांना मुदतवाढ देवू शकत नाही. याबद्दल मी सरपंचांची माफीही मागितली आहे,''

मी कुणावर बोलणार नाही

श्री. मुश्रीफ म्हणाले, ''केंद्रीय मंत्री राजनाथसिंहांनी आघाडी सरकारवर केलेल्या टिकेवर आमचे नेते शरद पवार यांनी उत्तर दिले आहे. यामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही उडी घेतली असून राज्य सरकार हे एक सर्कस असल्याचे पवारांनी कबूली दिल्याचे म्हटले आहे. वास्तविक काल त्यांचा वाढदिवस होता. अशा शुभदिनी असे वक्तव्य करणे बरे दिसत नाही. मी मात्र कोणावर न बोलण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या संधी आणि सत्तेचा उपयोग लोकांच्या कल्याणासाठी करण्याचा प्रयत्न आहे. जनतेने आयुष्यभर नाव काढावे असे काम करून दाखविण्याचा मानस आहे."

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख